Saturday, April 11, 2020

अँकराईट

मुशाफिरी कलाविश्वातली

अँकराईट

माणूस सतत आपल्या इच्छा-आकांक्षांच्या आणि स्वप्नांच्या मागं धावत असतो. साऱ्या इच्छा आणि स्वप्नं कधी पूर्ण होत नाहीत. पण माणसाचं हे अविरत धावणं मात्र  चालूच असतं. हे धावणं चालू असताना तो कित्येकदा जखमी होतो. कित्येकदा त्याला हेही कळत असतं की आपण ज्या गोष्टीच्या मागं धावतोय ती आपल्याला कधीच मिळणार नाही. तरीही धावायचं काही तो सोडत नाही.

पण हे धावणं सोडून देण्याची आणि मन:शांती मिळवण्याची संकल्पना बऱ्याच संस्कृतींमध्ये दिसून येते. माणूस जेंव्हा मनापासून ऐहिक गोष्टींच्या मागं धावायचं बंद करतो, तेंव्हा त्याला या जगाविषयी आणि जगातल्या गोष्टींविषयी 'वैराग्य' निर्माण होते. असा माणूस संसाराकडं पाठ फिरवून सत्याचा शोध किंवा ईश्वराची आराधना करू लागतो. थोड्याफार बदलानं ही संकल्पना आपल्या वेगवेगळ्या ठिकाणी पाहायला मिळते.

पाश्चात्य विश्वात मध्ययुगात अशाच प्रकारची पण अत्यंत कठोर अशी एक संकल्पना होती - 'अँकराईट'. हे अँकराईट लोक ऐहिक जीवनाचा संपूर्ण त्याग करायचे. एका बंदिस्त खोलीत जीवन जगत हे लोक ईश्वराची प्रार्थना करायचे. प्रार्थनेत सामर्थ्य असतं ह्या गोष्टीवर त्यांचा पूर्ण विश्वास होता. एका धार्मिक विधीनंतर त्यांना खोलीमध्ये बंदिस्त करण्यात यायचं. हा धार्मिक विधी एक प्रकारे अंत्यविधीसारखाच होता आणि या विधीनंतर ते लोक बाहेरच्या जगासाठी मृत झाल्याचं समजलं जायचं. एकदा अँकराईट झाल्यानंतर असे लोक जर बंद खोलीतून पळून गेले तर मात्र त्यांना पकडून परत आणलं जायचं. पळून जाणाऱ्या (आणि नंतर पकडून परत आणल्या जाणाऱ्या) लोकांची अर्थातच प्रचंड अवहेलना व्हायची. (काही वेळेला त्यांना जाळण्यात यायचं.) स्त्री आणि पुरुष दोघांनाही अँकराईट होता यायचं. पण काही कारणानं पुरूषांपेक्षा स्त्रियाच जास्त प्रमाणात अँकराईट होताना दिसायच्या.

या अँकराईट लोकांना खोलीतून बाहेर पडणं शक्य नसायचं. ही बंदिस्त खोली चर्चच्या शेजारीच असायची. खोलीला बहुतेक वेळेला तीन खिडक्या असायच्या. एका खिडकीतून चर्च त्यांना चर्च दिसायचं. त्यांना खोलीमध्ये अन्नही खिडकीमधूनच मिळायचे. बाहेरच्या जगातल्या कुणाला त्यांच्याशी बोलण्याची इच्छा असेल तर ते या खिडकीमधूनच संवाद साधायचे.

गंमत म्हणजे एकांतवासासाठी हे लोक अँकराईट बनायचे पण प्रत्यक्षात बाहेरचे खूप सारे लोक त्यांना भेटण्याचा प्रयत्न करायचे. बाहेरच्या जगातले लोक आध्यात्मिक मार्गदर्शन मिळवण्यासाठी या अँकराईट लोकांकडे यायचे. आपल्या समस्या सांगायचे. दगडांच्या मजबूत भिंतींनी समाजापासून हे लोक दूर झाले असले तरी बऱ्याचदा समाजाचा केंद्रबिंदू तेच असायचे. एक आदर्श समाज निर्माण होण्याचं गर्भस्थान म्हणून त्यांची खोली ओळखली जायची.

ऑस्ट्रियामध्ये जन्मलेल्या एका थिओडोर एक्सेंतोविच नावाच्या एका चित्रकारानं जर्मनीमध्ये म्युनिक इथं कलेचं शिक्षण घेत असताना अँकराईटचं जीवन आपल्या चित्रकलेच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न केला. अर्थात हे चित्र त्यानं खरोखरच्या अँकराईटचं काढलेलं नाही. एका मॉडेलला अँकराईट बनवून त्यानं हे चित्र काढलंय. ऐहिक जीवनाविषयी विरक्ती आणि आध्यात्मिक जीवनाची ओढ या चित्रात जाणवते. अगदी कमी गोष्टींसह हा अँकराईट बंदिस्त खोलीत जीवन जगताना दिसतोय. जगापासून दूर गेलेला हा अँकराईट जीवनाविषयीचं काहीतरी तत्वज्ञान असणारं पुस्तक वाचण्यात गुंग झाल्यासारखा वाटतोय. विरक्त आयुष्य जगत असल्यामुळं जीवनाचं तत्वज्ञान सहजपणे कळत असावं असं दिसतंय. त्याच्या देहबोलीवरून तो चिंतन करत पुस्तक वाचत असल्यासारखं भासतंय. या चित्राचं त्या काळात बरंच कौतुक करण्यात आलं. हे  तैलचित्र सध्या पोलंडमध्ये वॉर्सा इथल्या राष्ट्रीय कलासंग्रहालयात आहे. चित्राचा आकार १२९ सेमी X ९० सेमी इतका आहे.



थिओडोर एक्सेंतोविच हे चित्र काढत असताना त्याचा मित्र फ्रॅन्झ एझमॉन्ड त्याच मॉडेलचं एका वेगळ्या बाजूनं चित्र काढत होता. त्यानं काढलेलं चित्रही तितकंच सुंदर आहे. या चित्रातला अँकराईट आपल्याला अर्धवट दिसतो.   


ही चित्रं चित्रकारांनी विद्यार्थीदशेत काढली असली तरी दोन्ही चित्रांमध्ये विरक्तीचं आयुष्य जगणाऱ्या अँकराईटच्या आयुष्याचे अंतरंग जाणवल्यावाचून राहत नाहीत !!

- दुष्यंत पाटील

#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#माझीशाळामाझीभाषा
#कारागिरी


🌺 संदर्भ :

https://en.wikipedia.org/wiki/Anchorite
https://eclecticlight.co/2018/01/26/among-the-hutsuls-the-oils-and-pastels-of-teodor-axentowicz/
http://art-in-space.blogspot.com/2020/03/teodor-axentowicz-anchorite-1881.html
🌺 Image credit:
Teodor Axentowicz / Public domain
Franz Ejsmond / Public domain

No comments:

Post a Comment