Saturday, April 18, 2020

जिव्हाळा


मुशाफिरी कलाविश्वातली

जिव्हाळा                                             

उंच उंच पर्वत, त्यावर असणारे निळे जलाशय, निरव शांतता, मोहक निसर्गसौंदर्य असं सारं असणाऱ्या ठिकाणी निवांतपणे सुट्टी घालवणं कुणाला आवडणार नाही ? इंग्लंडमध्ये निसर्गसौंदर्यासाठी प्रसिद्ध असणाऱ्या लेक डिस्ट्रिक्ट या भागात हे सारंच सापडतं. त्यामुळं पूर्वीपासूनच इंग्लंडमधला हा भाग पर्यटकांचं आकर्षण ठरला आहे.

दोनशे वर्षांपूर्वी म्हणजे एकोणिसाव्या शतकाच्या सुरुवातीला इंग्लंडमधला एक कलाकार या लेक डिस्ट्रिक्टमध्ये सुट्टी घालवण्याकरिता निघाला होता. त्याचं नाव होतं चार्ल्स गॉग. चार्ल्सचं वय अवघं २१ वर्षे होतं. निसर्गसौंदर्यात रममाण होत निवांत वेळ घालवणं त्याला मनापासून आवडायचं. गेली तीन वर्षे त्यानं इथंच येऊन सुट्टी घालवली होती. काही गरजेच्या वस्तू आणि आणि मासे पकडायचा गळ घेऊन तो निघाला होता. पर्वतावर असणाऱ्या तलावातल्या पाण्यात गळ टाकून निवांत माशाची वाट पाहण्यात त्याला एक प्रकारची मजा यायची. त्याच्या सोबतीला दुसरं कुणीच नव्हतं, फक्त त्याची विश्वासू, लळा लावणारी त्याची कुत्री फॉक्सी होती.

विशेष म्हणजे तो हा पर्वत चढून जाणार होता. कुठल्याही हेतूशिवाय, कामाशिवाय निखळ आनंद, मजा म्हणून गिर्यारोहण करणं ही त्या काळात नवीनच गोष्ट होती. पण गिर्यारोहण करण्याकरता जी खास प्रकारची साधनं लागतात, जे विशिष्ट प्रकारचे कपडे लागतात त्यातलं चार्ल्सकडं काहीच नव्हतं. ज्या ठिकाणी चार्ल्स निघाला होता तिथं गिर्यारोहण करणं ही सोपी गोष्ट नव्हती. मार्गदर्शनासाठी एखादा गाईड सोबत असणं अतिशय गरजेचं होतं. खरंतर चार्ल्सचं तिथल्या एका स्थानिक गाईडसोबत बोलणंही झालं होतं. हा गाईड चार्ल्ससोबत गिर्यारोहण करताना सोबत येणार होता. तो गाईड सैन्यात कामाला होता आणि ऐन वेळी त्याला प्रशिक्षणासाठी बोलावण्यात आल्यानं तो चार्ल्ससोबत येऊ शकला नाही.

शेवटी गाईडशिवायचं चार्ल्स आणि त्याची कुत्री फॉक्सी पर्वतावर निघाले. मध्ये काही अवघड स्वरूपाच्या कडा होत्या. पण पुढं काय झालं ते कुणाला समजलंच नाही - पण तो पर्वतावर तो पोहोचलाच नाही. पर्वतावर त्याची कुणीही वाट बघत नव्हतं त्यामुळं कुणाच्याही लक्षात आलंच नाही.

चार्ल्स गिर्यारोहणाला निघाला तो दिवस होता १७ एप्रिल १८०५. जवळपास तीन महिन्यांनी २७ जुलैला एका गुराख्यानं पर्वतावर जाण्याच्या मार्गावर कुत्र्याचं भुंकणं ऐकलं. पर्वताच्या मार्गावर अशा दुर्गम ठिकाणी कुत्र्याचं भुंकणं त्याला विचित्रसं वाटलं. म्हणून गुराख्यानं जवळ जाऊन पाहिलं. चार्ल्सची हाडं आणि कपड्यांचे जीर्ण धागे त्याला तिथं दिसले. पण महत्वाची गोष्ट म्हणजे फॉक्सीनं आपल्या धन्याची साथ अजूनही सोडली नव्हती !

काही जणांच्या मते गुराख्यानं दुरून चालत जाणाऱ्या लोकांना हाक मारून बोलावलं. काहींच्या मते गुराखी परत जाऊन काही लोकांना घेऊन आला. चार्ल्सच्या हाडांसोबत त्याच्या इतरही काही वस्तू (मासे पकडण्याचा गळ, सोनेरी घड्याळ, चष्मा, पेन्सिल वगैरे) तिथं सापडल्या. या तीन महिन्यांच्या काळात फॉक्सीनं एका पिल्लाला जन्मही दिला होता, पण ते पिल्लू इथं वाचू शकलं नव्हतं. चार्ल्सच्या टोपी फाटून दोन तुकडे झाले होते. एका उंच कडेवरून पडल्यामुळं डोक्याला इजा होऊन चार्ल्सचा मृत्यू झाला असावा असा अंदाज बांधण्यात आला.

अशा दुर्गम ठिकाणी फॉक्सी जगलीच कशी हा प्रश्न अनेकांना पडत होता. पण तिचं धन्यावरचं प्रेम मात्र सर्वांच्या कौतुकाचा विषय बनत चाललं होतं. फॉक्सीच्या स्वामीनिष्ठेनं मोठमोठ्या कवींना साद घातली. विख्यात इंग्लिश कवी विल्ल्यम वर्ड्सवर्थ आणि सर वॉल्टर स्कॉट यांनी या घटनेनं प्रेरित होऊन सुंदर कविता रचल्याएखादं कथानक सांगितल्याप्रमाणं वर्ड्सवर्थ आपल्याला कवितेतून चार्ल्सची कहाणी उलगडत जातो. या कवितेतलं एक कडवं खूप सुंदर आहे:

But hear a wonder, for whose sake
This lamentable Tale I tell!
A lasting monument of words
This wonder merits well.
The Dog, which still was hovering nigh,
Repeating the same timid cry,
This Dog had been through three months' space
A Dweller in that savage place.

या घटनेनं, चार्ल्स आणि फॉक्सी यांच्या नात्यानं फक्त कवींनाच साद घातली नाही तर चित्रकारांनीही या विषयावर चित्रं काढली. यातलं सर्वात प्रसिद्ध असणारं चित्र आहे सर एडविन लँडसीअर यांनी काढलेलं. आपण पूर्वी लँडसीअर यांनी काढलेली 'मॅन प्रपोजेस् गॉड डिस्पोजेस्' (https://dushyantwrites.blogspot.com/2018/08/blog-post.html) आणि 'ट्रायल बाय ज्युरी' (https://dushyantwrites.blogspot.com/2019/09/blog-post_23.html)  ही चित्रं पाहिलीच आहेत. प्राण्यांची चित्रं काढण्यात त्यांचा हातखंडा होता.


लँडसीअर यांच्या या चित्राचं नाव आहेattachment’ (जिव्हाळा). आपला मालक जग सोडून गेल्यानंतरही दुर्गम ठिकाणी इतका काळ त्याच्या शरीराचे रक्षण करणाऱ्या फॉक्सीचं हे चित्र आहे. प्रत्यक्षात तीन महिन्यांनंतर चार्ल्सची फक्त हाडंच उरली होती पण या चित्रात मात्र चित्रकारानं त्याचं (प्राण नसणारं) शरीर चांगल्या अवस्थेत दाखवलंय. या चित्रात चार्ल्स डोंगरच्या कडेलगत पडलेला दिसतोय तर मागच्या बाजूला भयाण खोल दरी दिसतीये. दरीच्या पलीकडं असणाऱ्या पर्वताचा रंग धूसर करडा दाखवत चित्रकारानं चित्रात खोलीचा आभास परिणामकारक निर्माण केलाय. आपल्या धन्याच्या छातीवर पुढचे पाय ठेवत फॉक्सी मोठ्या जिव्हाळ्यानं चार्ल्सकडं पाहताना दिसत आहे. चित्रामध्ये  मळकट पिवळसर आणि काळसर रंगांचा वापर करत चित्रकारानं चित्रात दुःखाच्या छटा आणल्या आहेत.

आजही आपल्याला लेक डिस्ट्रिक्टमध्ये त्या ठिकाणी चार्ल्सची कबर दिसते आणि त्यावर विल्ल्यम वर्ड्सवर्थच्या कवितेतल्या काही ओळी लिहिलेल्या दिसतात.

- दुष्यंत पाटील

#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#माझीशाळामाझीभाषा
#कारागिरी


🌺 संदर्भ :


🌺 Image credit:
Edwin Henry Landseer / Public domain



2 comments: