Saturday, April 4, 2020

इकॅरस

मुशाफिरी कलाविश्वातली

इकॅरस

ग्रीक पुराणात कारागिरी करण्यात असामान्य कौशल्य असणारी एक व्यक्तिरेखा येते - डिडॅलस. लोकांना चमत्कार वाटावेत अशा गोष्टी तो बनवायचा. उदा. तिथं  नुकत्याच जन्मलेल्या राजकुमारीला त्यानं खेळण्यातला पक्षी भेट दिला होता. हा पक्षी सूर्य उगवला की चिवचिवाट करायचा !! साऱ्या नगरीत त्यानं बनवलेल्या या खेळण्याची चर्चा होती. अर्धं शरीर माणसाचं आणि अर्धं शरीर बैलाचं असणाऱ्या मिनोटौरसाठी त्यानं एक खास रचना असणारा तुरुंग बनवला होता. त्याच्या या असामान्य कौशल्यामुळं तो सर्वत्र प्रसिद्ध झाला होता.

डिडॅलससारख्या कारागिरानं जन्मभर फक्त आपल्यासाठीच काम करावं असं तिथल्या राजाला वाटायचं. त्यानं डिडॅलस आणि त्याचा मुलगा इकॅरस यांना समुद्राच्या बाजूला असणाऱ्या डोंगरावर उंच ठिकाणी असणाऱ्या गुहेमध्ये कैद केलं. अर्थात त्यांना खायला, प्यायला जे हवं ते मिळत होतं. कारागिरीसाठी आवश्यक असणारं सारं साहित्य त्याला पोहोचवलं जायचं. त्यामुळं डिडॅलसची गुहेत राहण्यासाठी काहीच तक्रार नव्हती. वर्षानुवर्षे तो चमत्कृतीपूर्ण गोष्टी बनवत राहिला. कधी कधी छोट्या इकॅरसला गुहेत राहायचा कंटाळा यायचा, पण आपल्या वडिलांना कामात मदत करण्यात तो पुन्हा रमून जायचा.

इकॅरस जसजसा मोठा होऊ लागला तसा त्याला त्या गुहेत राहण्याचा कंटाळा यायला लागला. तो अधूनमधून वडिलांना तसं बोलूनही दाखवायचा. सोळाव्या वाढदिवसाला मात्र त्याचा संयम सुटला. या गुहेमधल्या जीवनाला, तिथल्या राजाला आणि वडिलांना वैतागल्याचं त्यानं आपल्या वडिलांना बोलून दाखवलं. अर्थात नंतर त्यानं आपल्या वडिलांची माफी मागितली, पण गुहेत राहणं आपल्याला अजिबात पसंत नसल्याचा त्यानं पुनरुच्चार केला.

पुढच्या वेळी राजा भेटीला आल्यानंतर डिडॅलसनं त्याला आपला मुलगा आता मोठा झाल्याचं सांगितलं. आपल्या मुलाला गुहेतून बाहेर काढून एखादं वेगळं काम देण्याची त्यानं राजाला विनंती केली. राजानं त्याला यावर विचार करण्याचं आश्वासन दिलं. पण राजाच्या डोक्यात एक विचार घोळत होता - या मुलाला इतकी वर्षे वडिलांसोबत राहून अशीच असामान्य कारागिरी येत असेल तर? कुठल्याही परिस्थितीत असामान्य कारागिरांनी फक्त आपल्याकडंच काम करावं असं त्याला वाटायचं. त्यामुळं राजाला या मुलाला बाहेरचं जीवन जगू द्यायचं नव्हतं. काही आठवड्यांनंतर राजानं ठाम शब्दांत आपला निर्णय सांगितला - तो मुलालाही गुहेतून बाहेर पडू देणार नव्हता. डिडॅलसनं दुःखी अंत:करणानं आपल्या मुलाला राजाचा निर्णय सांगितला. राजाच्या निर्णयापुढं आपण काहीच करू शकत नसल्याचं त्यानं मुलाला समजावण्याचा खूप प्रयत्न केला. पण मुलाला ते समजत नव्हतं आणि समजून घेण्यासारखं त्याचं वयही नव्हतं. मुलाचा हताश चेहरा पाहून डीडॅलसला प्रचंड वाईट वाटलं. आपली असामान्य कारागिरी वापरून मुलाला आनंदी करण्याचा त्यानं निश्चय केला. पण नेमकं काय करायचं ते त्याला सुचत नव्हतं.

वसंत ऋतूत एके दिवशी डिडॅलस गुहेच्या तोंडाशी उभा होता. खाली खडकांवर आदळणाऱ्या लाटांकडं तो पाहत होता. सीगल पक्षी आकाशात भराऱ्या घेत होते. डोंगरावर बऱ्याच खडकांमध्ये त्यांनी आपली घरटी बनवली होती. घरट्यांमध्ये त्यांची अंडी आणि पिल्लं होती. डिडॅलस हे सारं पाहत असताना त्याचा मुलगा त्याच्या बाजूला आला आणि म्हणाला, "मी या साऱ्या पिल्लांचा खूप मत्सर करतो. कारण काही दिवसांतच त्यांचे पंख मजबूत होतील आणि मग ते उडू शकतील. मला मात्र या गुहेतून बाहेर पडताच येणार नाही."

मुलाचं हे बोलणं ऐकून वडिलांच्या डोक्यात एक कल्पना आली. आपली समस्या सुटणार असल्याचं आता त्यांना समाधान वाटत होतं.

डिडॅलसनं एक झाडू बनवला. त्यानं आपल्या मुलाला एक मोठं जाळं आणि हा झाडू दिला. आपल्या मुलाला त्यानं जाळ्याचा वापर करत पक्ष्यांच्या घरट्याकडं जायला सांगितलं. झाडूनं तिथली सारी पक्ष्यांची पिसं गोळा करून आणायला सांगितलं. हे काम आता त्याला दररोज करायचं होतं. मुलानंही एकेक पीस जमा करत साठा केला. या दरम्यान डिडॅलस मोठमोठ्या पंखांचे सांगाडे तयार करत होता. धातूंच्या नळ्या वापरात तो पंखांच्या २ जोड्या बनवत होता. आपल्या हवे त्या प्रकारे, हव्या त्या दिशेनं पंख हलवता येतील अशी रचना त्यानं केली होती. शेवटी मेणाचा वापर करत त्यानं सारी पिसं पंखांच्या सांगाड्यांना चिकटवली.

शेवटी तो दिवस उजाडला ज्या दिवशी हे पितापुत्र पंखांचा वापर करत गुहेतून उडून जाणार होते. वडिलांनी मुलाला खूप महत्वाचा सल्ला दिला, "हे बघ इकॅरस - उडताना आपल्याला खूप उंचावरून किंवा खालून उडता येणार नाही. खूप वरून उडालो तर सूर्याच्या उष्णतेनं आपल्या पंखांचं मेण वितळेल. याउलट खूप खालून उडालो तर समुद्राच्या पाण्याच्या बाष्पामुळं आपले पंख जाड होतील. त्यामुळं तू लक्षपूर्वक माझ्या मागून ये." पंखांवर नियंत्रण कसं ठेवायचं याविषयी त्यानं आपल्या मुलाला नीट समजावून सांगितलं.  

पण खरंतर मुलाचं वडिलांकडं लक्षच नव्हतं. आपली गुहेतून मुक्तता होणार, एखाद्या पक्ष्यासारखं आपण उडून जाणार या कल्पनेनंच तो अधीर झाला होता. दोघंजण गुहेच्या तोंडाशी आले. दोघांनीही पंख लावले होते. दोघांनीही हवेमध्ये झोकून दिलं. इकॅरसला हे सारं स्वप्नवत वाटत होतं. गुहेतल्या बंदिस्त जीवनाला आता पूर्णविराम मिळाला होता. इकॅरसला उडताना पाहून आजूबाजूचे पक्षी दूर जात होते आणि त्याचा एक विलक्षण आनंद इकॅरस अनुभवत होता. त्याचे वडील त्याला स्वत:च्या मागं यायला सांगत होते. पण इकॅरस आता वडिलांचा उपदेश ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. आपल्या पंखांनी उंच झेप घेण्यात त्याला एक खास आनंद मिळत होता.

वडील त्याला खाली येण्यासाठी ओरडून ओरडून सांगत होते, पण आता तो उडत उडत बराच वर गेला होता. उंच उडण्याचा थरार तो अनुभवत होता. वडिलांचे शब्द त्याला ऐकू येत नव्हते. थोड्या वेळानं इकॅरसला कसलातरी थेंब खांद्यावर पडल्याचं जाणवलं. त्याला एकामागोमाग एक थेंब खांद्यावर, दंडांवर पडत गेल्यानंतर काय चाललंय ते लक्षात आलं. तो खूप उंचावरून उडत होता आणि त्यामुळं त्याच्या पंखांमधलं मेण वितळत चाललं होतं. आता पंखांमधली एकेक पिसं खाली पडू लागली. इकॅरस आता खाली येऊ लागला आणि शेवटी सारी पिसं उडून गेली. इकॅरस खाली समुद्रात पडला.


या ग्रीक पुराणातल्या कथेवर ओवीड नावाच्या प्राचीन रोमन कवीनं केलेल्या काव्यात लिहिलंय की तो समुद्रात पडताना किनाऱ्यावर नांगरणी करणारा शेतकरी, मेंढपाळ आणि मासे पकडणारा माणूस होते.

सोबतचं चित्र पीटर ब्रुगेल्स नावाच्या डच चित्रकारानं १५६० मध्ये म्हणजे ४६० वर्षांपूर्वी काढलंय. या चित्रात आपल्याला समुद्रात पडलेला इकॅरस दिसतोय. (त्याचे फक्त पाय दिसतात.) समुद्रात जहाजं दिसतात. समुद्राच्या बाजूला डोंगर आहेत, समुद्रकिनाऱ्यावर मागच्या बाजूला एक नागरीही दिसते. चित्रात पुढच्या बाजूला नांगरणी करणारा एक शेतकरी, एक मेंढपाळ आणि मासा पकडण्यासाठी गळ टाकलेला एक माणूस दिसतो. 'आणि शेतकऱ्यानं आपली नांगरणी चालूच ठेवली..' अशा अर्थाची डच भाषेत एक म्हण आहे. त्याचा अर्थ आहे - दुसऱ्याच्या दुःखाकडं माणसं दुर्लक्ष करतात आणि आपली कामं चालूच ठेवतात. ही म्हण चित्रकारानं या चित्रात दाखवलीये.

पुराणातील प्रसंग जिवंत करून चित्रात दाखवायला ब्रुगेल्सला नक्कीच जमलंय. पण त्यानं डच म्हणही आपल्या चित्रात दाखवलीये. ब्रुगेल्सला आपल्या चित्रामध्ये म्हणी दाखवायला आवडायचं. बेल्जियमच्या कलासंग्रहालयात असणारं हे चित्र ब्रुगेल्सची मूळची कलाकृती आहे की त्याच काळात बनवली गेलेली नक्कल आहे याविषयी वादविवाद असले तरी हे चित्र मात्र अजूनही नक्कीच लोकप्रिय आहे !!

- दुष्यंत पाटील

#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#माझीशाळामाझीभाषा
#कारागिरी


🌺 
संदर्भ :

🌺 Image credit:
🍁Pieter Bruegel the Elder / Public domain

No comments:

Post a Comment