मुशाफिरी कलाविश्वातली
नार्सिसस
स्वत:ला कुणीतरी महान समजणारी माणसं
काहीवेळा आपल्या
पाहण्यात येतात. इतरांनी स्वत:चं सतत
कौतुक करत राहावं असं
त्यांना प्रामाणिकपणे वाटतं !! गंमत म्हणजे इतरांच्या
सुखदुःखांशी, भावनांशी यांना
काहीच देणंघेणं नसतं. त्यांचं कौतुक करण्याऐवजी कुणी त्यांच्यावर टीका
केली तर मात्र ते
प्रचंड अस्वस्थ होतात. इतरांनी त्यांच्यावर केलेली थोडीशी टीकाही त्यांना सहनच होत नाही.
खरंतर
ही सारी लक्षणं एका
मानसिक विकाराच्या लक्षणांशी जुळतात. या विकाराचं नाव
आहे 'नार्सिस्टिक पर्सनॅलिटी डिसऑर्डर'.
हा मनोविकार असणाऱ्या लोकांच्या डोक्यात स्वत:विषयी अवास्तव
कल्पना असतात. इतरांना ते तुच्छ समजतात.
त्यांना वाटत असतं की
ते असामान्य आहेत आणि केवळ
असामान्य माणसंच त्यांना ओळखू शकतात. स्वत:च्या कर्तृत्वाविषयी बोलताना
ते बऱ्याचदा अतिशयोक्ती करतात किंवा सरळ खोटं बोलतात.
नाती किंवा व्यावसायिक आयुष्य याविषयी बोलतानाही ते स्वत:चं
महानपण सांगायला सोडत नाहीत.
‘नार्सिस्टिक
पर्सनॅलिटी डिसऑर्डर’ ह्या मनोविकाराचं नाव ग्रीक
पुराणातल्या एका व्यक्तिरेखेवरून पडलं. ह्या व्यक्तिरेखेचं नाव होतं 'नार्सिसस'. स्वत:च्याच
प्रेमात पडलेल्या नार्सिससची कथा पाहिली तर ‘नार्सिस्टिक पर्सनॅलिटी डिसऑर्डर’
विकाराला त्याचं नाव का दिलं गेलं याचं उत्तर मिळतं.
नार्सिसस हा
ग्रीक पुराणातील एक शिकारी. हा दिसायला अतिशय देखणा होता. बऱ्याच तरुणी त्याच्या प्रेमात
पडायच्या. पण तो प्रत्येकीलाच तुच्छ समजायचा. त्यामुळं त्यानं कुणा तरुणीला पसंत करण्याचा
प्रश्नच यायचा नाही !!
एके दिवशी शिकारीसाठी
तो अरण्यात गेला. अरण्यात राहणारी एक सुंदरी त्याला पाहताक्षणीच त्याच्या प्रेमात पडली.
या सुंदरीचं नाव होतं एको (echo) म्हणजे प्रतिध्वनी. तिनं त्याचा पाठलाग केला पण त्याच्याशी
बोलण्याची तिची हिम्मत झाली नाही. त्यानं हरणांची शिकार केली. तिच्या पावलांचा आवाज
त्याला जाणवला. त्यानं विचारलं, "कोण आहे ते?" तिनंही आपल्या नावाप्रमाणं
फक्त प्रतिध्वनी दिला, "कोण आहे ते ?". शेवटी ती त्याच्या समोर आली आणि त्याला
प्रेमानं मिठी मारण्यासाठी त्याच्या जवळ गेली. त्यानं तिचा तिटकारा करत तिला ढकलून
दिलं. नार्सिससच्या आठवणीत ती क्षय पावत गेली.
शेवटी तिचा फक्त आवाज उरला !!
एकोला भेटल्यानंतर
नार्सिसस पुढे गेला. त्याला खूप तहान लागली. त्याला निश्चल असणारं थोडंसं पाणी दिसलं.
पाणी पिण्यासाठी तो जवळ गेला. पाण्यात पाहताच त्याला स्वत:चं प्रतिबिंब दिसलं. ते त्याला
इतकं आवडलं की तो स्वत:च्याच प्रेमात पडला आणि प्रतिबिंबाकडं पाहतच राहिला. निश्चल
पाण्यात दिसणारं आपलं प्रतिबिंब नष्ट होऊ नये म्हणून त्यानं पाणीही पिलं नाही !! शेवटी
तो तहानेनं मृत्यू पावला पण पाण्यात दिसणाऱ्या आपल्या देखण्या प्रतिबिंबाला त्यानं
धक्का पोहोचू दिला नाही !!
त्यामुळंच वेड्यासारखं
स्वत:च्याच प्रेमात पडणाऱ्या या नार्सिससचं एका मानसिक विकाराला नाव देण्यात आलं.
नार्सिससची
चित्रं बऱ्याच जणांनी काढली. त्याचं वेड्यासारखं स्वत:वर प्रेम करणं आपल्या कलाकृतीत
व्यक्त करण्याचा प्रयत्न बऱ्याच जणांनी केला. पण या साऱ्यांमध्ये जास्त प्रसिद्ध आहे
ते कॅरॅवॅजियोचं चित्र. या चित्राला आता जवळपास सव्वाचारशे वर्षे झालीत. हे चित्र १५९४
ते १५९६ च्या दरम्यान काढलं गेलं. गडद काळ्या रंगाच्या पार्श्वभूमीवर या चित्रात नार्सिससवर
प्रकाशझोत पडल्यासारखं वाटतं. त्यामुळं तो अधिकच तेजस्वी दिसतो. चित्रकारानं रंगसंगतीचा
वापर आपल्याला हवा तो परिणाम साधण्यासाठी खूप कौशल्यानं केलेला दिसतो. चित्राच्या वरच्या
भागात नार्सिसस तर खालच्या भागात त्याचं प्रतिबिंब यामुळं चित्रात एक प्रकारे समतोल
साधला गेलाय. स्वत:चं प्रतिबिंब पाहण्यात नार्सिसस पूर्णपणे हरवून गेलेला दिसतो.
कॅरॅवॅजियोनं
हे चित्र तैलरंगांचा वापर करत कॅनव्हासवर
काढलंय. चित्राचा आकार ११० सेमी
X ९२ सेमी इतका आहे.
रोममधल्या एका कलासंग्रहालायात हे
चित्र पाहायला मिळतं. तहान लागूनही पाणी
न पिता स्वत:चं
प्रतिबिंब पाहणाऱ्या नार्सिससचा वेडेपणा मात्र चित्रकारानं या चित्रात अतिशय
प्रभावीपणे दाखवलाय !!
- दुष्यंत पाटील
#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#माझीशाळामाझीभाषा
#कारागिरी
🌺 संदर्भ :
#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#माझीशाळामाझीभाषा
#कारागिरी
🌺 संदर्भ :
https://psychcentral.com/lib/narcissus-and-echo-the-myth-and-tragedy-of-relationships-with-narcissists/
https://www.psychologytoday.com/intl/basics/narcissism
https://www.ancient.eu/Narcissus/
https://www.psychologytoday.com/us/blog/hide-and-seek/201803/who-was-narcissus
🌺 Image
Credit:
Caravaggio / Public domain
No comments:
Post a Comment