Sunday, July 12, 2020

पिकासोच्या आयुष्यातला निळा कालखंड

मुशाफिरी कलाविश्वातली


पिकासोच्या आयुष्यातला निळा कालखंड

कार्लोस कॅसागेमॅसचा जन्म १८८० मध्ये स्पेनमधली बार्सिलोना इथं एका सुसंस्कृत कुटुंबात झाला. त्याचे वडील विद्वान होते. त्यांचं स्वतःचं मोठं ग्रंथालय होतं. ते सात भाषांमध्ये संवाद साधू शकायचे. त्यांची आर्थिक स्थिती चांगली होती.

कार्लोसची पिकासोशी ओळख झाली ती वयाच्या विसाव्या वर्षी. याकाळात पिकासोचंही वय सर्वसाधारण वीसच्या आसपासच होतं. पिकासोला विश्वविख्यात चित्रकार म्हणून अजून ओळखलं जायला अजून बरीच वर्षे बाकी होती. ओळख झाल्यानंतर लगेचच त्यांची एकमेकांशी चांगली मैत्री झाली. दोघांनीही स्पेनमध्ये बराच  प्रवास केला. बार्सिलोनाला परतल्यानंतर त्यांनी चित्रकलेच्या साधनेसाठी एकाच स्टुडिओमध्ये काम केलं. या काळात पिकासोनं आपल्या मित्राची म्हणजे कार्लोसची बरीचशी चित्रं काढलीत. खरंतर कार्लोस एक चित्रकार तर होताच पण तो एक कवीही होता. मात्र त्याला नैराश्यानं (depression) ग्रासून टाकलं होतं. शिवाय त्याला नपुंसकत्वही होते. या काळात पिकासो आणि कार्लोस वेश्यांकडंही जायचे. तिथं गेल्यावर कार्लोस फक्तच आपला मित्र पिकासो येईपर्यंत वाट बघत बसायचा.

फेब्रुवारी १९०० मध्ये पिकासोनं स्वत:च्या चित्रांचं एक प्रदर्शन भरवलं होतं. त्यातल्या एका चित्राची पॅरिसमध्ये ऑक्टोबरमध्ये होणार असणाऱ्या प्रसिद्ध प्रदर्शनासाठी निवड झाली. ऑक्टोबरमध्ये पिकासो पॅरिसला गेला. त्याच्यासोबत त्याचा मित्र कार्लोसही होताच. तिथं त्यांनी एक स्टुडिओही भाड्यानं घेतला. या ठिकाणी जर्मेन, तिची बहीण आणि ऑडेट या तिघी जणी मॉडेल म्हणून यायच्या. यातल्या जर्मेनच्या प्रेमात कार्लोस पटकन पडला. जर्मेनवर खूप प्रेम असलं तरी तो स्वतः नपुंसक असल्यानं त्यांच्यात नातं प्रस्थापित होणां शक्य नव्हतं. यामुळं कार्लोस अजूनच नैराश्यात गेला. कार्लोस आत्महत्येची भाषा बोलू लागला. पिकासोनं त्याला स्पेनला परत जायचं सुचवलं.

दोघंही पॅरिसहून स्पेनला परत आले. पण कार्लोसच्या डोक्यातून जर्मेन जात नव्हती. तो तिला दररोज एकापेक्षा जास्त पत्रं लिहायचा.

पिकासो आपल्या गावी असताना कार्लोस एक दिवस अचानक बार्सिलोनाहून पॅरिसला गेला. त्याला जर्मेनला भेटायचं होतं. पॅरिसला गेल्यावर त्यानं जर्मेनला पुन्हा एकदा स्वतःसोबत राहण्यासाठी विचारणा केली. तिनं स्पष्टच नकार दिला. मग त्यानं स्पेनला परतण्याचं ठरवलं. पण, पॅरिस सोडण्यापूर्वी त्यानं तिथल्या ओळखीच्या लोकांना एक पार्टी देण्याचा बेत केला. पार्टीत त्यानं जर्मेनला आपल्याशी लग्न करण्याविषयी शेवटची विचारणा केली. तिनं त्याला नकार दिला. यानंतर त्यानं एक पिस्तूल काढली आणि तिच्यावर गोळी झाडली. तिला गोळी लागली नाही पण ती जमिनीवर पडली. यानंतर त्यानं स्वतःवर एक गोळी झाडली. कार्लोस थोड्या वेळानं मृत्यू झाला.

या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पिकासोच्या मनावर अत्यंत खोल परिणाम झाला. २-३ महिन्यांनंतर तो पॅरिसला आला. ज्या स्टुडिओत तो कार्लोससोबत  राहायचा तिथंच तो राहू लागला. जिथं कार्लोसनं आत्महत्या केली त्या ठिकाणाला तो भेट देऊ लागला. हा त्याच्यासाठी अतिशय नैराश्याचा काळ होता. १९०१ ते १९०४ हा काळ पिकासोच्या आयुष्यातला निळा कालखंड म्हणून ओळखला जातो. या काळातली जवळपास त्याची सारी चित्रं निळ्या रंगाच्या वेगवेगळ्या छटांमध्ये दिसतात. पिकासो म्हणतो की कार्लोसच्या मृत्यूची बातमी कळाल्यानंतर त्यानं "निळ्या" चित्रांना सुरुवात केली.

आता पिकासो नैराश्याच्या गर्तेत खोल जाऊ लागला. पूर्वी तो सर्व लोकांमध्ये मिसळायचा. आता तो एकटा एकटा राहू लागला. त्याच्या चित्रांमध्ये आता गरीब लोकांचं जीवन, वेश्यांचं जीवन असे विषय जास्त येऊ लागले. (या काळातल्या पिकासोच्या चित्रांमध्ये अंध लोकही बऱ्यापैकी दिसतात.) लोकांनी त्याच्या चित्रांकडे पाठ फिरवायला सुरुवात केली. जीवनातल्या वेदना दाखवणारी ही 'निळी' चित्रं विकत घेऊन स्वत:च्या घरात भिंतीवर लावायला कुणीच तयार नव्हतं.

कार्लोसच्या मृत्यूच्या घटनेशिवाय पिकासोच्या मनावर परिणाम करणारी अजून एक घटना होती. ती म्हणजे त्यानं सेंट लॅझर तुरूंगाला दिलेली भेट. हा स्त्रियांचा तुरुंग होता. इथं पिकासोच्या स्त्रियांच्या आयुष्यातल्या वेदना, नैराश्य जवळून पाहायला मिळालं.


या काळात पिकासोनं काढलेलं एक चित्र म्हणजे 'हाताची घडी घातलेली स्त्री'. चित्रातली स्त्री सेंट लॅझर तुरूंगातली स्त्री असावी असं मानण्यात येतं. काहींच्या मते या स्त्रीनं आत्महत्येचा प्रयत्न केलेला होता. चित्र स्पष्टपणे निळ्या रंगाच्या छटांमध्ये दिसतं. चित्रातली स्त्री नैराश्यात गेलेली दिसते. ती शून्यात पाहताना दिसते. अतिशय साधं दिसणारं हे चित्र मनाला भेदून जातं. चित्रातल्या स्त्रीची आयुष्यातली निराशा आपल्याला जाणवल्यावाचून राहत नाही.

त्या काळात पिकासोची असली चित्रं विकत घ्यायला कुणीच तयार नव्हतं. आज मात्र हे चित्र जगातल्या सर्वात महागड्या चित्रांपैकी एक म्हणून ओळखलं जातं !! हे चित्र २००० साली साडेपाच कोटी अमेरिकन डॉलर्सना विकलं गेलं !!


 - दुष्यंत पाटील


#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#माझीशाळामाझीभाषा
#कारागिरी

🌺 संदर्भ :
http://www.pablopicasso.net/blue-period/
https://en.wikipedia.org/wiki/Carles_Casagemas
https://www.masterworksfineart.com/artists/pablo-picasso/blue-period
https://www.pablopicasso.org/femme-aux-bras-croises.jsp
http://www.pablopicasso.net/femme-aux-bras-croises/
https://bonjourparis.com/history/picasso-and-the-womens-prison-of-saint-lazare/

Image Credit:
https://en.wikipedia.org/wiki/File:Pablo_Picasso,_1901-02,_Femme_aux_Bras_Crois%C3%A9s,_Woman_with_Folded_Arms_(Madchenbildnis),_oil_on_canvas,_81_%C3%97_58_cm_(32_%C3%97_23_in).jpg

No comments:

Post a Comment