मुशाफिरी कलाविश्वातली
अकबर, तानसेन आणि स्वामी हरिदास
सम्राट
अकबरच्या दरबारातील नवरत्नांपैकी एक म्हणजे तानसेन.
तानसेन हे भारतीय शास्त्रीय
संगीतातलं एक अजरामर नाव.
त्याच्याविषयी अनेक दंतकथा प्रसिद्ध
आहेत. असं म्हणतात की
तो मल्हार राग गायला लागला
की आकाशात मेघ दाटून यायचे
आणि पाऊस पडायला लागायचा
! तो दीपक राग गायला
लागला की दिवे आपोआप
प्रज्वलित व्हायचे !!
तानसेन गाताना सारे लोक मंत्रमुग्ध व्हायचे. अकबर तानसेनच्या गायनानं
खूपच प्रभावित व्हायचा. एक दिवस अकबरानं
तानसेनचं कौतुक करत तानसेनला विचारलं, "तुझे
गुरु तुझ्याइतकंच सुंदर गातात का?". तानसेन
म्हणाला, "कृपया माझी तुलना माझ्या
गुरूंशी करू नका. मी
त्यांच्यासमोर काहीच नाही. ते गायक नाहीत
तर ते स्वतः:च
संगीत आहेत." तानसेनच्या गुरूंचं नाव 'स्वामी हरिदास'
असं होतं. तानसेननं आपल्या गुरुविषयी माहिती दिल्यावर अकबराची उत्सुकता वाढली. अकबरानं स्वामी हरिदासांना भेटण्याची इच्छा व्यक्त केली. पण तानसेननं सांगितलं
की ते अकबरच्या आदेशावरून दरबारात
येण्याची शक्यता शून्य होती. स्वामी हरिदास अरण्यात एका छोट्याशा झोपडीत
राहायचे. आणि ते स्वत:ला इच्छा
होईल तेंव्हाच गायचे. त्यांना गायनाचा आदेश कुणीच देऊ
शकत नव्हतं. अकबर मात्र काहीच ऐकण्याच्या
मनस्थितीतच नव्हता. अकबर म्हणाला, "आपण
दोघं अरण्यात जाऊ. हवं तर मी वेष
बदलून तुझा सेवक बनून
तुझ्यासोबत येईन. पण
मला त्यांचं संगीत ऐकायचंच आहे."
तानसेन
आणि सेवकाच्या वेषातील अकबर अरण्यात निघाले.
स्वामी हरिदास जिथं राहायचे तिथं
ते पोहोचले. स्वामी हरिदास एका वृक्षाखाली शांत
बसले होते. तानसेन आपल्या गुरूसमोर येऊन येऊन बसला.
सेवकाच्या वेषातल्या अकबराला त्यानं धीर धरायला आधीच
सांगितलं होतं. आधी तो स्वत:
गाणार होता. आपल्या गुरूंसमोर त्यानं गायला सुरुवात केली. तानसेननं गाताना जाणूनबुजून एक चूक केली.
स्वामी हरिदासांनी त्याला योग्य प्रकारे कसं गायचं ते
सांगताना त्याला स्वत: गाऊन दाखवलं. मागे उभा असणारा अकबर मंत्रमुग्ध झाला. स्वामी हरिदास यांचं गायन खरंच जादू
करणारं होतं. त्यांचं गायन संपल्यावर अकबरला
एक प्रकारची समाधी भंग झाल्यासारखं वाटलं.
यानंतर
अकबर आणि तानसेन अरण्यातून
राजधानीत परत आले. अकबराच्या
डोक्यातून स्वामी हरिदासांच्या गायनाचा जादुई अनुभव जातच नव्हता. न
राहवून एक दिवस त्यानं
तानसेनला विचारलं, "तुझे गुरु जो
राग गात होते तो
राग तुला माहीत आहे
का? तो राग तुला
गाता येईल का?". तानसेनला
तो राग अर्थातच
माहीत होता. त्यानं अकबराच्या इच्छेप्रमाणं तो राग गाण्याचं
मान्य केलं. त्यानं तो राग अकबराला
गाउनही दाखवला, पण अकबराला काही तो
जादुई अनुभव आला नाही. अकबर
अस्वस्थ झाला. त्यानं तानसेनला विचारलं, "तुझ्या गुरूंच्या गायनात जी जादू आहे
ती तुझ्यात नाही. असं का?". तानसेननं
उत्तर दिलं, "याचं कारण म्हणजे
मी तुमच्यासाठी म्हणजे लोकांच्या सम्राटासाठी गातो. पण ते विश्वाच्या
सम्राटासाठी म्हणजे परमेश्वरासाठी गातात." अकबर नि:शब्द
झाला.
चित्रकारानं
चित्रातल्या तिन्ही व्यक्तींच्या बाजूला त्यांची नावं लिहिली आहेत.
अकबर,
तानसेन यांचे पांढरे शुभ्र कपडे आणि पार्श्वभूमीला
असणारा वृक्षांचा हिरवा तर आकाशाचा काळा
रंग यांच्यातल्या विसंगतीनं एक खास परिणाम साधलेला
आहे. हिरवीगार वनराई, विविध पक्षी आणि पांढरी शुभ्र
फुले यामुळं चित्र पाहताना एक प्रकारच्या शांतीचा
अनुभव येतो. अकबर सामान्य वेषात
असला तरी तो सम्राट
आहे हे दाखवण्यासाठी त्यानं
मोठ्या चतुराईनं त्याच्या डोक्यावर चक्रासारखे सूर्यफूल दाखवलं आहे. त्याच्या दोन्ही
बाजूला (आणि वर) केळीची
झाडं अशी दाखवली आहेत
की दरबारातल्या त्याच्या आसनाच्या वर असणाऱ्या छत्राची
आठवण व्हावी.
त्या काळच्या चित्रांमध्ये देवनागरीमध्ये चित्रामधील पात्रांची नावं लिहिण्याची पध्दत दिसत नाही. त्यांची नावं चित्रात नंतर टाकलेली दिसतात.
त्या काळच्या चित्रांमध्ये देवनागरीमध्ये चित्रामधील पात्रांची नावं लिहिण्याची पध्दत दिसत नाही. त्यांची नावं चित्रात नंतर टाकलेली दिसतात.
राजस्थानी शैलीतलं हे चित्र सध्या नवी दिल्लीत असणाऱ्या
राष्ट्रीय कलासंग्रहालयात आहे. चित्राचा आकार
२५ से. मी. X ३१
से. मी. असा आहे.
भारतीय शास्त्रीय संगीताचं स्वरूप या छोट्याशा चित्रातून
खूप परिणामकारकरित्या दाखवल्याचं नक्कीच जाणवतं !!
- दुष्यंत पाटील
#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#माझीशाळामाझीभाषा
#कारागिरी
🌺 संदर्भ :
🌸http://www.nationalmuseumindia.gov.in/prodCollections.asp?pid=21&id=3&lk=dp3#:~:text=As%20the%20tradition%20has%20it,court%20and%20performed%20for%20him
🌸https://southasia.typepad.com/south_asia_daily/2013/05/akbar-tansen-and-swami-haridas.html
🌸https://www.thehindu.com/features/friday-review/music/The-Tansen-legacy/article14958498.ece
🌸https://angel1900.wordpress.com/2013/11/09/akbar-visiting-guru-haridas/
🌻 Image Credit:
🌸https://commons.wikimedia.org/wiki/File:Akbar_and_Tansen_visit_Haridas.jpg
🌸unknown painter in Rajasthani miniature style / Public domain
No comments:
Post a Comment