Saturday, July 25, 2020

पुस्तकी कीडा


मुशाफिरी कलाविश्वातली

पुस्तकी कीडा

वाचनाच्या महत्वाबद्दल जितकं लिहावं ते कमीच. वाचन करताना आपण एका वेगळ्याच विश्वात बुडून जातो. आणि या विश्वातून बाहेर येताना आपल्या ज्ञानात भर पडलेली असते. आणि नोकरी, पैसा, आरोग्य यासारख्या गोष्टी आपल्याला सोडून गेल्या तरी आपल्यासोबत कायम राहते ते ज्ञान !!

काही लोकांना वाचनाचं प्रचंड वेड असतं. दिवस रात्र जसा वेळ मिळेल तसं हे लोक अधाशासारखं वाचत असतात. एखाद्या विषयाचं वाचन करताना त्यात खोल बुडायला त्यांना आवडतं. अशा लोकांसाठी 'पुस्तकी कीडा' हा शब्द बऱ्याचदा वापरला जातो. काही शतकांपूर्वी युरोपमध्ये bookworm (पुस्तकी कीडा) हा शब्द नकारात्मक अर्थानं वापरला जायचा, पण नंतरच्या काळात मात्र या शब्दातली नकारात्मकता निघून गेली.

सोबतच्या चित्राचं नाव आहे 'पुस्तकी कीडा' आणि हे चित्र काढलं गेलं १८५० च्या आसपास. १८४८ हे वर्ष युरोपमध्ये क्रांतीचं वर्ष म्हणून ओळखलं जातं. या वर्षी युरोपमध्ये बऱ्याच ठिकाणी राजेशाहीचा शेवट झाला होता. त्यामुळं आता युरोपमध्ये नवीन विचारांचं वारं वाहू लागलं होतं. एका बाजूला लोकांचा वाचनावरचा भर वाढत होता तर दुसऱ्या बाजूला वाचनात बुडणाऱ्या विद्वान मंडळींची (आयुष्यातल्या क्षुल्लक गोष्टींकडं दुर्लक्ष केल्यामुळं) 'पुस्तकी कीडा' म्हणत तर उडवली जायची.


चित्रात आपल्याला ग्रंथालयातलं एक दृश्य दिसतं. उतारवयातला एक माणूस उंच शिडीवर चढून हातात एक पुस्तक घेऊन वाचताना दिसतोय. त्याची दृष्टी अधू झाल्याचं दिसतंय. एकुण वेशभुषेवरून (विशेषतः पायातल्या गुढघ्यापर्यंतच्या विशिष्ट कपड्यावरून) हा राजाच्या दरबारामध्ये उच्चपदावर काम करत असावा असं वाटतं. तो पुस्तक डोळ्याजवळ घेऊन वाचण्याचा प्रयत्न करतोय. काहीतरी वाचताना तो पूर्णपणे बुडून गेलेला दिसतोय. त्याच्या दुसऱ्या हातात, काखेत आणि पायांमध्येही पुस्तकं दिसतात. खिशातून अव्यवस्थितपणे बाहेर आलेला रुमाल त्याचे क्षुल्लक गोष्टींविषयी नसणारे भान दाखवतो. ग्रंथालयाच्या वरच्या बाजूला काढलेल्या चित्रांमुळं हे ग्रंथालय त्या काळातही खूप जुनं असल्याचं दिसतं. चित्रात डाव्या बाजूला खाली पृथ्वी दिसते. अर्थातच पृथ्वीकडं त्याचं लक्ष नाही. आजूबाजूला जगात काय चाललंय याकडं लक्ष न देता तो जुन्या पुस्तकांच्या दुनियेत रमलाय.

चित्रातल्या माणसावर एक प्रकाशझोत पडलेला दिसतोय. ज्ञानानं माणसाचं उजळून जाणारं व्यक्तिमत्व यातून दर्शवलंय. गंमत म्हणजे हा माणूस जमिनीपासून बराच वर आलाय. अर्थात वाचनाच्या वेडामुळं तो एका वरच्या पातळीवर आलाय. चित्रात जमीन दिसतच नाही. तो जमिनीपासून बराच वर आलाय !!  तो ग्रंथालयातल्या ज्या विभागात उभा आहे तो विभाग आहे "metaphysics". Metaphysics म्हणजे उच्च प्रकारचं तत्वज्ञान. यात गोष्टींचं अस्तित्व, काळ, मन आणि जडद्रव्ये यातला संबंध यासारख्या अमूर्त संकल्पनांचा अभ्यास केला जातो. चित्रातला माणूस या विषयात बुडून गेलाय.

चित्रात मध्यभागी असणाऱ्या या माणसाकडं आपलं लक्ष सहजच वेधलं जातं. त्यात त्याच्यावर पडलेल्या प्रकाशामुळं आणि त्याच्या चारही बाजूला असलेल्या अंधारामुळं एक खास परिणाम साधला गेलाय. चित्रातल्या उभ्या रेषा स्थिरता दर्शवतात. या चित्रात आपल्याला ग्रंथालयाच्या कपाटाच्या उंच आणि उभ्या रेषा हाच परिणाम साधतात.

हे चित्र काढलंय कार्ल स्पिट्झवेग या जर्मन चित्रकारानं. काही फेरफार करून त्यानं हे चित्र एकूण ३ वेळा काढलं. यातलं पहिलं चित्र १८५० तर शेवटचं १८८४ मध्ये काढलं गेलं. शेवटला काढलं गेलेलं चित्र सध्या अमेरिकेमधल्या एक अभियांत्रिकी महाविद्यालयात आहे. वर दिल्याप्रमाणं, सोबतचं चित्र १८५० मध्ये काढलं गेलं होतं. ते सध्या जर्मनीमधल्या एका कलासंग्रहालयात आहे. ४९.५ से मी X २६.८ से मी या आकाराचं हे तैलचित्र आहे.

आपल्या विश्वात बुडून गेलेला वाचणारा माणूस यात प्रभावीपणे दाखवला गेल्यामुळं हे चित्र यशस्वी ठरतं. आजही या चित्राच्या प्रती लोक विकत घेताना दिसतात.

- दुष्यंत पाटील

#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#माझीशाळामाझीभाषा
#कारागिरी

🌺 संदर्भ :
Image Credit:


2 comments: