Saturday, July 18, 2020

यक्ष आणि शेतकरी


मुशाफिरी कलाविश्वातली

यक्ष आणि शेतकरी

इसापनीतीत एक छान कथा येते - यक्ष आणि माणूस यांची. (खरंतर मूळ कथेत यक्ष या पात्राऐवजी satyr म्हणजे ग्रीक पुराणातील घोड्याचे कान, घोड्यासारखी शेपटी, पाय पण माणसाचे धड असणारा अरण्यातील एक प्रकारचा देव येतो. )

कथेत माणसाची आणि यक्षाची मैत्री होते. ते दोघे अरण्यात तसंच माणसाच्या घरी वरचेवर भेटू लागतात.

एके दिवशी संध्याकाळी माणूस आणि यक्ष अरण्यातून चालत निघालेले असतात. कडाक्याची थंडी पडलेली असते. माणूस चालता चालता आपल्या बोटांवर फुंकर घालत असतो.

यक्षाला प्रश्न पडतो. तो माणसाला विचारतो, " मित्रा, तू हे काय करतो आहेस ?"

माणूस म्हणतो, " मी  माझ्या बोटांना ऊब देण्याचा प्रयत्न करतोय."

नंतर ते दोघे माणसाच्या घरी पोहोचतात. घरी लापशी बनवली जात असते. माणूस आणि यक्ष जेवणासाठी टेबलावर बसतात. समोर वाफाळणारी गरमागरम लापशी येते.

आता तो माणूस लापशी पिण्यापुर्वी लापशीवर पुन्हा फुंकर मारतो. यक्ष गोंधळतो. तो पुन्हा विचारतो, " तू हे काय करत आहेस ?"

माणूस उत्तर देतो, "मी लापशी थंड करण्याचा प्रयत्न करतोय."

हे ऐकून यक्ष तिथून उठतो आणि निघून जातो. तो जाताना म्हणतो, "एकाच प्रकारच्या श्वासातून गरम आणि थंड फुंकर घालणारी व्यक्ती माझा मित्र होऊ शकत नाही !"

(वैज्ञानिक सत्य थोडंसं बाजूला ठेवू.) कथेचं तात्पर्य आहे की एकाच गोष्टीवर वेळ पडेल त्याप्रमाणं दोन्ही बाजूनं बोलणाऱ्या व्यक्तींशी शहाण्या माणसानं दोस्ती करू नये.

काही वेळा या गोष्टीत थोडेफार बदलही दिसतात. गोष्टीतला माणूस प्रवासी किंवा शेतकरी असल्याचे वाचावयास मिळते.  

सतराव्या शतकाच्या पूर्वार्धात जेकब जॉर्डन नावाचा एक चित्रकार होऊन गेला. त्यानं इसापनीतीतल्या या गोष्टीवर आधारित सात चित्रं काढलीत. गंमत म्हणजे त्यानं साऱ्या चित्रांमध्ये एकच प्रसंग दाखवलाय - तो म्हणजे लापशी फुंकण्याचे कारण समजल्यावर यक्ष उठून जातानाचा प्रसंग. जेकबनं साऱ्या चित्रांमध्ये लापशी पिणारा माणूस शेतकरी दाखवलाय. साऱ्या चित्रांमध्ये त्यानं शेतकऱ्याचं कुटुंबही दाखवलंय. सोबत दिसणारं चित्र हे याच चित्रांपैकी एक.


सोबतच्या चित्रामध्ये शेतकऱ्याच्या घरात आढळणाऱ्या साऱ्या गोष्टी दिसत आहेत. चित्रातला यक्ष अचानक उठून, हात उंचावून काहीतरी सांगत उठताना दिसतोय. चित्रामध्ये कमी जागेमध्ये जास्त पात्रं बसवल्याचं जाणवतं. शेतकऱ्याचं घर असल्यानं बैल, कोंबडी, कुत्रा आणि मांजर हे प्राणीही चित्रात दिसतात. याशिवाय शेतकऱ्याच्या कुटुंबातील विविध वयोगटातील व्यक्तीही दिसतात. चित्रातला शेतकरी चमच्यानं लापशी पीत यक्षाच्या बोलण्याकडं लक्ष देताना दिसतोय. त्याच्या डाव्या हातात लापशीची मोठी वाटी दिसत आहे. त्याच्या मागं एक लहान मुलगा आहे. त्याच्या बाजूला एक वृद्ध स्त्री दिसते. तिच्या हातात एक लहान मुलगी दिसतीये. वृद्ध स्त्री यक्षाच्या बोलण्याकडं लक्ष देताना दिसत आहे तर चित्रातली लहान मुलं आपल्याच विचारात आहेत. यक्षाच्या मागं एक तरुण स्त्री दिसते. टेबलावर खाण्यासाठी ठेवलेली फळंही दिसतात. भिंतीवर अडकलेलं पितळेचं भांडं कौशल्यपूर्ण पद्धतीनं रंगवण्यात आलंय.

चित्रात प्रकाशयोजनेत एक प्रकारचा समतोल साधलेला दिसतोय. उजवीकडं वर अंधार आहे तर डावीकडंही कडेला अंधार दिसतोय. चित्रात मध्यभागी मात्र टेबलावरचे शुभ्र कापड आणि लहान मुलीचे पांढरे कपडे आणि गोरा चेहरा उठून दिसतो. चेहऱ्यावरच्या हावभावांमुळं, शेतकऱ्याच्या आणि यक्षाच्या दाखवलेल्या देहीबोलीमुळं आणि चित्रात दाखवलेल्या तपशीलांमुळं हे चित्र एकदम जिवंत झालंय.

१६२० च्या दशकात जेकबच्या चित्रांमध्ये काही गोष्टी वारंवार आढळतात - त्या म्हणजे मजबूत बांधा असणारी माणसं (बहुतेक वेळा शेतकरी), एखाद्या कथानकाचं कल्पकतेनं केलेलं सादरीकरण आणि चित्रांमध्ये दिसणारे भरगच्च तपशील. याच गोष्टी आपल्याला सोबतच्या चित्रातही प्रकर्षानं जाणवतात.

हे चित्र जेकब आपल्या सहाय्यक चित्रकारांना आणि शिष्यांना चित्रकला शिकवताना वापरायचा असं मानण्यात येतं, याचं कारण म्हणजे हाच प्रसंग दाखवला गेलेली त्यानं काढलेली सात वेगवेगळी चित्रं. या चित्रांवर त्याचं नाव दिसत नाही.

हे चित्र आकारानं मोठं आहे. (आकार १७४ से. मी. X २०५ से. मी.) हे चित्र सध्या जर्मनीतल्या म्युनिकमधल्या एका कलासंग्रहालयात आहे.

- दुष्यंत पाटील

#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#माझीशाळामाझीभाषा
#कारागिरी

🌺 संदर्भ :
Image Credit:
Jacob Jordaens / Public domain

No comments:

Post a Comment