मुशाफिरी कलाविश्वातली
भारतमाता
तो पारतंत्र्याचा काळ होता. सर्वसाधारण
१९०५ च्या दरम्यानचा. इंग्रज
सरकारनं बंगालच्या फाळणीची योजना बनवली होती. ही फाळणी खरंतर
धर्माच्या आधारावर होती. पूर्व बंगालमध्ये (आजचा बांगलादेश) बहुसंख्य
लोक मुसलमान होते तर पश्चिम
बंगाल मध्ये हिंदू. इंग्रजांच्या 'तोडा आणि फोडा'
नीतीचाच हा एक भाग
होता. एकसंध बंगाल हा इंग्रजांविरुद्ध एक
मोठी ताकत बनू शकला
असता. पण फाळणीमुळं या
ताकतीचं विभाजन होणार होतं. नेमकं या कारणामुळंच काही
लोकांचा या फाळणीला विरोध
होता. यापैकी एक होते गुरु
रवींद्रनाथ टागोर यांचा पुतण्या असणारे अवनींद्रनाथ टागोर.
अवनींद्रनाथ
टागोर हे भारतातल्या आधुनिक
कलेचे जनक मानले जातात.
बंगालच्या फाळणीच्या कल्पनेनं ते अस्वस्थ झाले
होते. त्यांनी बंकिमचंद्र चॅटर्जी यांची प्रसिद्ध 'आनंदमठ' ही कादंबरी वाचली
होती आणि या कादंबरीचा
त्यांच्यावर खोल प्रभाव होता.
या कादंबरीत एक संकल्पना येते
- आपल्या देशाला मातृरूपात पाहण्याची. आनंदमठ ही कादंबरी, 'वंदे
मातरम' हे काव्य, त्यामधून
मिळणारी आपल्या मायभूमीकडं देवीरूपात पाहण्याची दृष्टी यामुळं अवनींद्रनाथ यांनी एक चित्रकृती बनवायला
सुरुवात केली. हे चित्र होतं
'भारतमाते'चं !!!
अवनींद्रनाथ
यांच्या सोबतच्या 'भारतमाता' या चित्रात आपल्याला
भगव्या वस्त्रात साध्वी असणारी भारतमाता दिसते. चेहऱ्यामागं असणाऱ्या तेजोमय प्रकाशवलयामुळं ती देवी वाटते.
पायाजवळ पावित्र्याचं प्रतीक असणारी शुभ्र कमळं दिसतात. तिच्या
चार हातांमध्ये आपल्याला जपमाळ, शुभ्र वस्त्रं, भाताच्या रोपट्याचा भाग आणि पुस्तक
दिसतं. आपल्या मायभूमीकडून आपल्याला अन्न (भात), वस्त्र/शुद्ध चारित्र्य (शुभ्र वस्त्र), आध्यात्मिक विचारधारा (जपमाळ) आणि ज्ञानाचा वारसा
(पुस्तक) मिळतो असं या चित्रातून
व्यक्त होतं. हे चित्र म्हणजे
अवनींद्रनाथ यांची बंगालच्या फाळणीवर प्रतिक्रिया होती. भारतमातेला मूर्त रूपात दाखवण्याचा हा पहिलाच प्रयत्न
मानला जातो. खरंतर अवनींद्रनाथ टागोर यांना सुरुवातीला भारतमातेचं नव्हे तर बंगमातेचं चित्रण
करायचं होतं असंही मानण्यात
येतं.
स्वामी
विवेकानंद यांच्या शिष्य असणाऱ्या भगिनी निवेदिता यांचे टागोर
कुटुंबियांशी निकटचे संबंध होते. 'भारतमाता' या चित्रात असणाऱ्या
शक्तीची कल्पना भगिनी निवेदिता यांना चित्र पाहताच आली. राष्ट्रवादाची भावना
सर्वत्र पसरवण्यासाठी हे चित्र काश्मीरपासून
कन्याकुमारीपर्यंत सर्वत्र फिरवण्याची भगिनी निवेदिता यांची इच्छा होती. त्या म्हणतात - "भारतीय
भाषेमध्ये हे चित्र सुरुवातीपासून
शेवटपर्यंत भारतीय हृदयाला साद घालतं. नव्या
शैलीमधली ही पहिलीच महान
कलाकृती आहे.. मला जर शक्य
असतं तर मी या
चित्राच्या हजारो प्रति तयार केल्या असत्या
आणि साऱ्या भारतभूमीत तोपर्यंत पसरवल्या असत्या जोपर्यंत केदारनाथपासून कन्याकुमारीपर्यंत प्रत्येक घरात, प्रत्येक शेतकऱ्याच्या झोपडीमध्ये, कारागिरांच्या घरांमध्ये कुठेतरी भिंतीवर हे चित्र लटकावलं
गेलं नसतं.. "
हे चित्र काढताना अवनींद्रनाथ
टागोर यांनी मुद्दामच पाश्चात्य शैलीचा वापर टाळला. चित्रकलेमध्ये
स्वदेशी शैलीमधील तंत्रं वापरायला सुरुवात अवनींद्रनाथ यांनीच केली आणि असं
करत त्यांनीच भारतीय आधुनिक कलेचा पाया घातला. (कलेत
'स्वदेशी चळवळ' आणली असली तरी
अवनींद्रनाथ टागोर यांना जगभरातल्या कलांमधली तंत्रं शिकण्यात त्यांना रस होता.) 'भारतमाता'
या चित्रात जपानी चित्रकलेचाही प्रभाव दिसतो. चित्राच्या कडा धूसर असणं
हे जपानी चित्रकलेचं वैशिष्ट्य. त्यांनी १९०३ मध्ये जपानी
चित्रकार योकोयामा ताईकां यांच्याकडून जपानी चित्रकलेमधली तंत्रं शिकली होती.
गेल्या
शंभर वर्षांमध्ये भारतमातेची अनेक वेगवेगळ्या रूपांमध्ये
चित्रणं केली गेलीत. पण
अवनींद्रनाथ यांचं मूळच्या चित्राचं महत्व मात्र आजही तसंच आहे.
आधुनिक भारतीय कलेच्या इतिहासात या चित्राचं महत्व
असामान्य आहे !!
- दुष्यंत पाटील
#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#माझीशाळामाझीभाषा
#कारागिरी
संदर्भ:
https://www.livehistoryindia.com/herstory/2018/04/17/bharat-mata---from-art-to-reality
https://en.wikipedia.org/wiki/Bharat_Mata_(painting)
Image Credit:
https://commons.wikimedia.org/wiki/File:Bharat_Mata_by_Abanindranath_Tagore.jpg
Abanindranath Tagore, Public domain, via Wikimedia Commons