Saturday, November 17, 2018

आराधना करणारा पुरूष

कुतूहल कलाविश्वातलं

आराधना करणारा पुरुष

प्राचीन सुमेरियामधली गोष्ट.. काळ सर्वसाधारण ४५०० ते ५००० वर्षांपूर्वीचा.. याकाळात सुमेरियामध्ये (म्हणजे आजच्या इराक मध्ये) वेगवेगळ्या देवतांची मंदिरे होती.. ह्या सुमेरियन लोकांची एक प्रथा होती - जेंव्हा दैनंदिन कामं करण्यामध्ये ही मंडळी व्यस्त असत तेंव्हा ते स्वतःच्या वतीनं मंदिरामध्ये एक छोटीशी मूर्ती ठेवत.. ही मूर्ती असायची देवाची आराधना करणाऱ्या माणसाची.. त्यांची अशी समजूत होती की मूर्तीचा मालक मंदिरात नसला तरी ही मूर्ती जोपर्यंत मंदिरात आहे तोपर्यंत देवाची आराधना चालूच राहील.. ह्या अशा मूर्ती फक्त श्रीमंत लोकांकडेच नव्हे तर सर्वसामान्य लोकांकडेही असायच्या..  ह्या मूर्ती खूप कठीण अशा खडकापासून बनवल्या जायच्या नाहीत.. तिथं विपुल प्रमाणात मिळणाऱ्या दगडापासून ह्या बनवल्या जायच्या.. ह्याचा अर्थ दीर्घ काळ टिकवण्याच्या उद्देशानं ह्या बनवल्या नव्हत्या.. इराकमध्ये ह्या मूर्ती भरपूर प्रमाणात सापडल्या आहेत..

आपण चित्रात दिलेल्या मूर्तीकडं थोडंसं जवळून पाहू.. आपल्याला जाणवणारी पहिली गोष्ट म्हणजे ही मूर्ती अगदी प्रमाणबद्ध, वास्तव माणसाशी जुळणारी अशी नाही आहे.. माणसाचे वेगवेगळे अवयव यात भौमितिक आकार वापरत दाखवण्याचा प्रयत्न केलाय.. उदा. केसांच्या ऐवजी लाटा दाखवण्यात आलेत..  दाढी आणि केस लाटांच्या स्वरूपात छातीपर्यंत आलेले दाखवले आहेत.. त्यामुळं ह्या माणसाची हनुवटी किंवा गळा आपल्याला दिसत नाही.. त्याचं डोकं काहीसं घनगोलाकार आहे.. भुवया अर्धवर्तुळाकृती आहेत.. ओठाच्या ऐवजी दोन आयत दाखवण्यात आलेले आहेत..  नाक अगदी त्रिकोणी आहे..  भुवयांखाली मोठे मोठे केलेले डोळे आहेत.. मोठमोठाले डोळे दीर्घकाळ चालणारी आराधना सुचवतात..

मूर्तीमधल्या माणसाचे दंड उरलेल्या हातापेक्षा जाड आहेत.. आराधना करण्यासाठी हात जोडलेले आहेत.. शरीराचा हातखालचा भाग दंडगोलाकृती दाखवला आहे.. आणि या दंडगोलातला वरचा निम्मा भाग गुळगुळीत आहे तर खालच्या निम्म्या भागावर उभ्या रेषा आहेत.. काही लोकांच्या मते ते कापड मेंढीच्या चामड्यापासून बनलंय.. हे खरं असेल तर ही मूर्ती एखाद्या पुजाऱ्याची असावी असं मानण्यात येतं..

अशा आराधना करणाऱ्या माणसांच्या वेगवेगळ्या आकाराच्या मूर्ती सापडल्या आहेत.. समाजात असणाऱ्या वेगवेगळ्या स्थानाप्रमाणं ह्या मूर्तींचे आकार लहान मोठे असावेत असं मानण्यात येतं.. आराधना करणाऱ्या पुरुष आणि स्त्री अशा दोघांच्याही मूर्ती आढळून येतात.. काही काही मूर्तींवर त्या ज्या व्यक्तीला दर्शवितात त्यांच्याविषयी (म्हणजेच मूर्तींच्या मालकांविषयी) थोडक्यात माहिती कोरण्यात आलेली आहे.

ही मूर्ती सध्या न्यूयॉर्क मधल्या  The Metropolitan Museum of Art मध्ये आहे. 


- दुष्यंत पाटील

#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#माझीशाळामाझीभाषा
#कारागिरी

संदर्भ:

https://www.metmuseum.org/toah/works-of-art/40.156/

https://anmriblog.wordpress.com/2014/10/23/standing-male-worshiper/

No comments:

Post a Comment