Monday, November 12, 2018

तराजू घेतलेली स्त्री

ओळख कलाकृतींची

तराजू घेतलेली स्त्री

सतराव्या शतकातला एक महान डच चित्रकार म्हणजे 'वेर्मीर' . 'तराजू घेतलेली स्त्री' हे त्याचं खोल अर्थ असणारं चित्र.

ह्या चित्रात निळं जॅकेट घातलेली एक स्त्री खोलीच्या कोपऱ्यात एका टेबलासमोर एकटीच उभी आहे. तिच्या उजव्या हातात एक (रिकामाच असणारा) तराजू आहे आणि ती खाली पाहत तो तराजू स्थिर होण्याची वाट बघत आहे. खोलीच्या मागील भिंतीवर तिच्या मागे, गडद रंगातलं 'अंतिम न्यायनिवाडा' (The last judgement) या विषयावरचं एक पेंटिंग आहे.  तिच्या समोरच एक आरसाही आहे. एक निळ्या रंगाचे कापड, दागिन्यांच्या उघडलेल्या पेट्या, दोन मोत्यांच्या माळा आणि एक सोनेरी साखळी आपल्याला टेबलवर दिसते. ह्या स्त्रीच्या चेहऱ्यावर एक प्रकारचे निर्विकार भाव दिसतात अन् एक प्रकारची मानसिक शांती जाणवते.

ह्या चित्राला अर्थ प्राप्त होतो ते मागे भिंतीवरच्या चित्रामुळं. ते चित्र आहे 'अंतिम न्यायनिवाडा' या विषयावरचं. तराजूचं आणि न्यायनिवाड्याचं एक खास नातं आहे. दोन्हींमध्ये समतोलाला प्रचंड महत्व आहे. ख्रिस्ती धर्माप्रमाणं या अंतिम न्यायनिवाड्याच्या दिवशी परमेश्वर प्रत्येकानं केलेल्या पापपुण्याप्रमाणं प्रत्येकाला न्याय देतो. स्त्रीच्या डोक्याच्या उजव्या बाजूला भिंतीवर टांगलेल्या चित्राच्या आत आपल्याला पुण्यकर्म केलेले लोक दिसतात तर डाव्या बाजूला पाप केल्यानं शिक्षा मिळालेले लोक दिसतात. स्त्रीच्या समोर भौतिक वैभवाचं प्रतीक असणार्‍या गोष्टी आहेत. आणि तिच्या मागं पापपुण्याप्रमाणं परमेश्वराकडून होणार्‍या न्यायनिवाड्याचं प्रतीक आहे; ह्या अंतिम न्यायनिवाड्याचं भान ठेवत ती तराजूमध्ये (भौतिक जीवनात) समतोल साधण्याचा प्रयत्न करत आहे. 



हे चित्र सध्या आहे वॉशिंग्टन (अमेरिका) इथल्या नॅशनल गॅलरी ऑफ आर्ट या वस्तुसंग्रहालयात.

- दुष्यंत पाटील
#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#माझीशाळामाझीभाषा
#कारागिरी
संदर्भ:

https://artsandculture.google.com/asset/woman-holding-a-balance/-wHFDKu7-mhjtQ

https://www.nga.gov/collection/art-object-page.1236.html

https://en.wikipedia.org/wiki/Woman_Holding_a_Balance

https://www.khanacademy.org/humanities/monarchy-enlightenment/baroque-art1/holland/v/vermeer-woman-with-balance

1 comment:

  1. नेहमीप्रमाणेच मस्त! असा तराजू आणि अर्जुनाच्या हातातील धनुष्य दोन्हीत विलक्षण साम्य आहे असं वाटलं एकदम. एक बाजूला त्यालाही जीवनाचं सार समजावून सांगणारे भगवंत आहेत, समोर त्याचे ह्या जन्माचे आप्त स्वकीय लढण्यासाठी तयार! आणि हा डोक्यातला गुंता सोडवत बसला आहे. विचाराला खूप खाद्य मिळालं. धन्यवाद.

    ReplyDelete