Saturday, November 24, 2018

चिनी टेरॅकोटा सैन्य

कुतूहल कलाविश्वातलं

चिनी टेरॅकोटा सैन्य

१९७४ मधली गोष्ट. चीनमधल्या 'झिआन्' नावाच्या शहराबाहेर काही लोक विहीर खोदत होते. विहीर खोदता खोदता त्यांना एक आश्चर्यकारक गोष्ट जमिनीत सापडली..

त्यांना मानवी आकाराचा युद्ध करण्यास सज्ज असणारा टेरॅकोटा मातीचा सैनिक त्यांना जमिनीत सापडला. त्यांनी सरकारी अधिकाऱ्यांना ही माहिती दिली.. मग काही काळात उत्खननतज्ञ मंडळी तिथं पोहोचली.. उत्खनन केल्यानंतर याठिकाणी जे काही सापडलं ते एक उत्खननातलं एक खूप मोठं आश्चर्य ठरणार होतं!!

या उत्खननात त्यांना अक्षरशः हजारो मातीचे सैनिक मिळाले. प्रत्येकाच्या चेहऱ्याची ठेवण वेगवेगळी,  चेहऱ्यावरचे हावभाव वेगवेगळे होते. या सैन्यात प्रत्येक सैनिकाची जागा आपापल्या हुद्द्याप्रमाणं ठरली होती. ह्या सैन्याचा आज जरी रंग गेला असला तरी एके काळी हे रंगवलेले होते याची कल्पना येते. उत्खननात त्यांच्या तलवारी, धनुष्यबाण आणि इतर शस्त्रंही सापडली आहेत. आपल्याला इथं मातीचे घोडे आणि लाकडी/सिरॅमिक रथही पाहावयास मिळतात.

काय होता हा सारा प्रकार? एवढ्या मोठ्या प्रमाणात मातीचं सैन्य कुणी, कधी आणि का बनवलं होतं?

हे सारं काम तब्बल 'सव्वादोन हजार'वर्षांपूर्वीचं होतं !! चीनच्या पहिल्या सम्राटानं हे सारं काम करवून घेतलं होतं. आपल्या कारकिर्दीत या सम्राटानं छोटी छोटी राज्यं एकत्र केली. राज्यांमध्ये बऱ्याच क्रांतिकारी सुधारणा घडवल्या. चीनची भिंत बांधण्याचा पहिला प्रयत्न ह्याच सम्राटानं केला!

वयाच्या तेराव्या वर्षी या सम्राटानं गादीवर येताच आपल्या कबरीचं काम सुरू केलं होतं. मृत्यूनंतरच्या जीवनामध्ये त्याला ह्या कबरीतल्या प्रतिकृती असणाऱ्या ह्या सैन्याची साथ मिळणार होती. जवळपास सात लाख कारागीर ही कबर बनवण्याचं काम कित्येक वर्षं करत होते असं मानण्यात येतं. सम्राटाच्या मृत्यूनंतर हे काम थांबवण्यात आलं.

या कबरीत जवळपास आठ हजार सैनिक असावेत असा अंदाज आहे. एका प्राचीन लेखाप्रमाणं - 'ह्या कबरीत राजवाड्यांच्या, कचेऱ्यांच्या प्रतिकृती आहेत. ह्यात नक्षीकाम असणारी बरीचशी मौल्यवान रत्नं, दुर्मिळ वस्तू आणि सुंदर नक्षीकाम असणारी भांडीही आहेत. त्या भागातल्या नद्या, झरे यांच्याही प्रतिकृती आहेत. पाणी दर्शवण्यासाठी पारा वापरला गेलाय.' आज कबरीत पारा सापडत नसला तरी तिथल्या मातीत पाऱ्याचं प्रमाण जास्त आढळलंय. यावरून प्राचीन लेखातल्या किमान काही गोष्टी तरी सत्य असल्याचं मानण्यात येतं. कबरीच्या आजूबाजूला प्रायोगिक तत्वावर खोदलेल्या खड्ड्यांमध्ये नर्तक, संगीत वादक मंडळी यांच्या आपली कला सादर करतानाच्या प्रतिकृती सापडल्या आहेत. नंतर मात्र हे खोदकाम थांबवण्यात आलं. प्राचीन कबर (खोदकाम न करता) जशी आहे त्या अवस्थेत ठेवणं योग्य असल्याचं सांगण्यात येतं. (खरंतर कबरीचं खोदकाम केलंच गेलेलं नाही, आजपर्यंतचं सारं उत्खनन आजूबाजूचंच आहे.)

ही कबर म्हणजे जगातलं खूप मोठं आश्चर्य आहे हे मात्र निश्चित !! 



- दुष्यंत पाटील

#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#माझीशाळामाझीभाषा
#कारागिरी

संदर्भ:

https://mymodernmet.com/terracotta-warriors/

https://en.m.wikipedia.org/wiki/Terracotta_Army?wprov=sfla1

https://www.nationalgeographic.com/archaeology-and-history/archaeology/emperor-qin/

No comments:

Post a Comment