Monday, November 26, 2018

शंभर अश्व

ओळख कलाकृतींची

शंभर अश्व


१६८८ मध्ये इटलीमधल्या मिलान शहरात एका मुलाचा जन्म झाला.. घरची परिस्थिती चांगली होती.. त्यामुळं त्याला घरी खास शिकवणी सुरु करण्यात आली.. पुढं हा मुलगा पेंटिंग स्टुडिओमध्ये जाऊन चित्रकलाही शिकला.. वयाच्या १९ व्या वर्षी त्यानं ख्रिस्ती मिशनरी व्हायचं ठरवलं.. त्यानं मिशनरी लोकांच्या सोसायटीमध्ये प्रवेश केला..  मिशनरी कामासाठी त्याला चीनमध्ये पाठवण्यात आलं.. त्याला पाठवण्यात वेगळीकडं आलं होतं पण तो बीजिंगमध्ये येऊन पोहोचला.. तिथल्या सम्राटावर त्याची चांगलीच छाप पडली ती त्याच्या कलेतल्या प्रतिभेमुळं.. त्याचं नाव होतं गुइस्पी कॅस्टिगलिओने पण इथं चीनमध्ये त्यानं नविन नाव स्वीकारलं - 'लँग शायनिंग'.. बीजिंगमध्ये तो स्थायिक झाला ते जन्मभरासाठी !!

त्याची चित्रकला म्हणजे युरोपियन आणि चिनी चित्रकलेचं एक मिश्रण होतं.. चिनी लोकांना रूचतील असे बदल त्यानं युरोपियन शैलीत करत आपली कला तिथं सादर केली.. तिथल्या कलाकारांना त्यानं पाश्चात्य कलेतली कित्येक तंत्रं शिकवली.. व्यक्तिचित्रं आणि प्राण्यांची चित्रं ह्यासाठी तो प्रसिद्ध होता.. आज त्याची बहुतेक सारी चित्रं बीजिंग आणि ताईपेई इथल्या वस्तुसंग्रहालयात आहेत..

त्याचं एक सुप्रसिद्ध चित्र म्हणजे 'शंभर अश्व' !! शाई आणि रंग वापरून त्यानं हे चित्र रंगवलंय रेशमी कापडावर.. हे रेशमी कापड जवळपास ८ मीटर लांब होतं.. रेशमी कापडावर रंगकाम करणं अवघड होतं  कारण तिथं एकदा रंग दिला की पुन्हा त्यात बदल करणं शक्य नवहतं. आठ मीटर कापडावर रंगकाम करणं खरंच चिकाटीचं काम होतं आणि ह्या चित्रकाराला चित्र पूर्ण करण्यास तब्बल पाच वर्षे लागली..त्यात काही चूक होऊ नये म्हणून त्यानं तेच चित्र आधी कागदावर काढलं.. यात त्यानं शेडींगची पाश्चात्य तंत्रं वापरली आहेत.. पण चित्रासाठी सारं साहित्य चिनी आहे.. चित्रातले अश्व कमी जास्त अंतरावर आहेत हे भासवण्यासाठी त्यानं पाश्चात्य तंत्र वापरलंय.. चित्रामध्ये त्यानं शंभर अश्व वेगवेगळ्या स्थितीमध्ये दाखवले आहेत.. चित्रात आपल्याला बारीक सारीक तपशीलासह झाडं दिसत आहेत.. दूरचे डोंगर धूसर दिसत आहेत.. उजव्या बाजूला नदीही दिसत आहे.. 

भाग १  (डावीकडून पहिला)


भाग २ (डावीकडून दुसरा )

भाग ३ (डावीकडून तिसरा)

भाग ४ (उजवीकडचा )

हे चित्र चीनमधल्या चित्रकलेच्या इतिहासातली एक अजरामर कलाकृती बनलं !!

- दुष्यंत पाटील

#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#माझीशाळामाझीभाषा
#कारागिरी

संदर्भ:

https://archive.shine.cn/sunday/now-and-then/One-Hundred-Horses/shdaily.shtml

https://www.metmuseum.org/toah/works-of-art/1991.134/

http://theme.npm.edu.tw/npmawards/langshining/pages/one_hundred_horses/en/index.html

http://www.comuseum.com/painting/masters/lang-shining/one-hundred-horses/

http://www.arthistoryarchive.com/arthistory/asian/Giuseppe-Castiglione.html

http://www.comuseum.com/painting/masters/lang-shining/one-hundred-horses/

No comments:

Post a Comment