Monday, November 19, 2018

हे जग एक रंगभूमी आहे

ओळख कलाकृतींची

हे जग एक रंगभूमी आहे..

"हे सारं जग म्हणजे एक रंगभूमी आहे.." ह्या शब्दांनी सुरु होणार शेक्सपिअरच्या एका नाट्यातील जगप्रसिद्ध स्वगत आहे..  हे नाटक आहे 'as you like it'.. शेक्सपिअर जगाला रंगभूमीची उपमा देताना इथल्या माणसांची तुलना अभिनेत्यांशी करतो..  माणसाला इथं एक प्रकारे ७ भूमिका पार पाडाव्या लागतात..  १७९८ ते १८०१ च्या दरम्यान रॉबर्ट स्मर्क नावाच्या एका चित्रकारानं ह्या विषयावर एक चित्रमालिका काढली.. त्यानं माणसाच्या आयुष्यातल्या शेक्सपिअरनं सांगितलेल्या ७ अवस्थांवर ७ चित्रं काढली..

ह्या जगात प्रवेश केल्यानंतर माणूस पहिली भूमिका पार पाडतो ती लहान बाळाची..  बाळ संपूर्णपणे परावलंबी असते...  बाळ वरचेवर रडत असते आणि ते दाईच्या अंगावर ओकारीही करू शकते.. पहिल्या चित्रात आपल्याला दाईनं बाळाला घेतलेलं दिसतंय.. 


नंतरची भूमिका असते शाळकरी मुलाची.. बाळ असतानाचं स्वातंत्र्य आता संपून जातं.. आता  त्याची आयुष्यात शिस्त ह्या प्रकाराची ओळख होते.. शेक्सपिअरच्या काळातल्या शाळा खूप कडक असायच्या.. इच्छा असो व नसो ह्या वयात मुलांना शाळेत जावं लागायचं.. दुसऱ्या चित्रात आपल्याला शाळेत जाणारा मुलगा दिसतोय.. 


यानंतर आयुष्यातलं किशोर वय सुरु होतं.. हे वय असतं प्रेमकविता रचण्याचं.. शेक्सपिअरच्या काळात 'रोमिओ आणि ज्युलिएट' हे प्रेमिकांचे आदर्श होते.. तिसऱ्या चित्रात आपल्याला प्रेमकाव्य लिहिणारा किशोर दिसतोय.. 


पुढच्या वयाची तुलना शेक्सपिअरनं सैनिकांशी केलीये.. ह्या वयात माणूस गरम रक्ताचा असतो.. स्वतःची प्रतिमा बनवण्यासाठी तो धडपडत असतो.. या वयात त्याला युद्धाची आवड असते.. स्वभाव काहीसा बंडखोर वृत्तीचा असतो.. ह्या वयात माणूस महत्वाकांक्षी असतो आणि तो कसलीही जोखीम पत्करायला घाबरत नाही.. चौथ्या चित्रात आपल्याला एक सैनिक दिसतोय..


माणासाच्या या पुढच्या वयाची तुलना शेक्सपिअरनं न्यायमूर्तीशी केलीये.. आयुष्यात बरेच खडतर अनुभवांनी माणसाला आता शहाणपण आलेलं असतं.. पूर्वीसारखं आता गरम रक्त आणि बंडखोर वृत्ती राहिलेली नसते.. आयुष्यातल्या वास्तवाचा आता त्यानं स्वीकार केलेला असतो.. पाचव्या चित्रात आपल्याला अनुभवाचे बोल व्यक्त करणारी व्यक्ती दिसतीये..


या नंतरच्या वयात बऱ्याच समस्या सुरु होतात.. पूर्वीसारखा त्याला आदर आणि मान मिळत नाही.. स्वतःच्या चिंतांच्या विश्वात तो गुरफटून जातो.. आपण कसं दिसतो याकडंही तो आता फारसं लक्ष देत नाही.. या वयात त्याची स्मरणशक्तीही कमी होते.. ह्या वयात तो इतरांकडून चेष्टेचा विषय बनतो..  सहाव्या चित्रात आपल्याला ह्या वयातल्या व्यक्ती दिसताहेत..


ह्या नंतरचं वय म्हणजे आयुष्यातला शेवटचा टप्पा.. ह्या वयात माणूस पुन्हा एकदा परावलंबी बनतो.. त्याचा जगाशी संवाद एक प्रकारे थांबतो.. सातव्या चित्रात आपल्याला खूप वयोवृद्ध माणूस दिसतोय.. बाजूला टेबलवर औषधं दिसत आहेत.. टेबलच्या बाजूला कुबड्याही आहेत.. वयोवृद्ध माणसाचे डोळे काम करत नाहीयेत असं वाटतं..


ज्या कल्पकतेनं शेक्सपिअरनं माणसाच्या जीवनावर भाष्य केलं, त्याला ह्या चित्रकारानं कॅनव्हासवर आणताना न्याय दिला हे मानावं लागेल !!

- दुष्यंत पाटील
#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#माझीशाळामाझीभाषा
#कारागिरी
संदर्भ:

http://www.sl.nsw.gov.au/learning/shakespeares-seven-ages-man

https://www.thoughtco.com/shakespeares-seven-ages-of-man-2831433

https://www.revolvy.com/page/The-Seven-Ages-of-Man-%28painting-series%29



No comments:

Post a Comment