Tuesday, February 26, 2019

गंगावतरण

कुतूहल कलाविश्वातलं 

गंगावतरण

सर्वसाधारण सातव्या शतकाच्या मध्यात तामिळनाडूमध्ये पल्लव घराण्यात नरसिंहवर्मन (पहिला) नावाच्या राजाचं राज्य होतं. आपल्या वडिलांसारखंच (महेंद्रवर्मन - पहिला) नरसिंहवर्मनचंही कलेवर प्रेम होतं. इ. स. ६४२ मध्ये चालुक्य घराण्यातला महान राजा पुलकेशी (दुसरा) याच्याकडून झालेल्या पराभवाचा त्यानं बदला घेतला. पुलकेशीवर मिळवलेला विजय साजरा करण्यासाठी त्यानं भव्य कलाकृती बनवली. महाबलीपुरम (आजच्या तामिळनाडूमधल्या कांचीपुरम जिल्ह्यातलं किनाऱ्यावरचं एक ठिकाण) या ठिकाणी भव्य पाषाणावर कोरीव काम करून ही कलाकृती बनवण्यात आली.

या ठिकाणी दोन भव्य शिलांवर कोरीव काम करण्यात आलंय. पुराणातल्या भगीरथानं पृथ्वीवर गंगा आणल्याच्या कथेचं चित्रण या कोरीव कामात पाहायला मिळतं. काहींच्या मते अर्जुनानं घोर साधना करून शिवाकडून पशुपती अस्त्र मिळवल्याच्या कथेचं हे चित्रण आहे. या कोरीव कामात दाखवलेली दृश्यं दोन्ही कथांसाठी तितकीच लागू पडतात.

या कोरीव कामाचा एकूण आकार १५ मी X ३० मी इतका महाकाय आहे. गंगेला पृथ्वीवर आणण्याचा (किंवा अर्जुनाला पशुपती अस्त्र मिळण्याचा) प्रसंग देवी, देवता, किन्नर, गंधर्व, नागलोक, अप्सरा आणि गणलोक पाहताना या शिल्पकृतीत आपल्याला पाहायला मिळतात. वन्य आणि पाळीव पशूही हे दृश्य पाहताना दिसतात. कोरलेल्या एकूण आकृतींची संख्या जवळपास १४६ आहे.

डावीकडच्या शिळेवर ,उजवीकडच्या भागात आपल्याला एका पायावर उभा असणारा (आणि डोक्यावर हात जोडलेला) भगीरथ दिसतो. त्याच्या डावीकडं पशुपती अस्त्र हातात घेतलेला शंकर दिसतो. दोन शिलांच्या मधल्या जागेचा वापर वाहणारी गंगा दर्शवण्यासाठी केलेला आहे. एके काळी वरच्या बाजूला पाण्याची टाकी होती. या टाकीमधून पाणी खाली यायचं. ते स्वर्गातून पृथ्वीवर येणाऱ्या गंगेसारखं भासायचं. वाहत्या पाण्याच्या ठिकाणी आपल्याला कोरलेल्या नागदेवता दिसतात.



Image credit:
Bernard Gagnon [CC BY-SA 3.0 (https://creativecommons.org/licenses/by-sa/3.0)]
https://commons.wikimedia.org/wiki/File:Descent_of_the_Ganges_01.jpg

उजव्या बाजूच्या शिळेवर, खालच्या बाजूला आपल्याला हत्तींचा कळप गंगेचं पाणी पिण्यासाठी गंगेकडं येताना दिसतोय. यात हत्तींसोबत त्यांची पिल्लंही आहेत. हे कोरलेले हत्ती खरोखरच्या हत्तीच्या आकाराचे आहेत. हत्तींशिवाय यामध्ये आपल्याला हरणं, माकडे, सिंह वगैरे प्राणीही दिसतात.

शंकराच्या आजूबाजूला दिसणारे बुटके जीव म्हणजे वालकिल्य मुनी. ह्यांची उंची कमी असून ते सदैव शंकराजवळ असायचे. ह्याच शिळेवर वरच्या बाजूला सर्वात डावीकडून तिसऱ्या आणि चौथ्या ठिकाणी दिसणारी जोडी 'किन्नर' या प्रकारात मोडते. (हे उजवीकडच्या शिळेवरही दिसतात.) पुरुष किन्नरानं काहीतरी वाद्य घेतलंय तर त्याच्या मागं असणारी स्त्री किन्नर टाळ वाजवत आहे. या किन्नर मंडळींचं निम्मं शरीर मानवी तर निम्मं शरीर पक्ष्यांचं असायचं. या ठिकाणी किन्नरांचे पाय पक्ष्यांचे दाखवण्यात आलेले आहेत.

'युनेस्को'नं ह्या ठिकाणाला जागतिक वारशाचं स्थळ म्हणून घोषित केलंय.

- दुष्यंत पाटील

#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#माझीशाळामाझीभाषा
#कारागिरी

संदर्भ:

Frontline Volume 24 - Issue 25 :: Dec. 22, 2007-Jan. 04, 2008

भारतीय कलेचा इतिहास - प्रा. जयप्रकाश जगताप

https://en.wikipedia.org/wiki/Descent_of_the_Ganges_(Mahabalipuram)   

No comments:

Post a Comment