Tuesday, April 23, 2019

बामियानच्या बुद्धमूर्ती

मुशाफिरी कलाविश्वातली

बामियानच्या बुद्धमूर्ती 

अफगाणिस्तानमध्ये मध्य भागात एक शहर आहे - बामियान. बामियान शब्दाचा अर्थ होतो लखलखणाऱ्या प्रकाशाचं ठिकाण. या बामियानच्या स्थानाचं एक खास भौगोलिक वैशिष्ट्य आहे. प्राचीन काळात रोमन साम्राज्य, भारत, मध्य आशिया आणि चीन या सर्व भागातून येणारे रस्ते या बामियानमध्ये मिळत होते. त्यामुळं त्या काळात खूप साऱ्या प्रवाशांसाठी बामियान हे एक प्रवासात विश्रांती घ्यायचं ठिकाण होतं. याच ठिकाणी ग्रीक आणि बौद्ध कलेचा मिलाफ झाला असं मानण्यात येतं. पूर्व आणि पश्चिम यांना जोडणाऱ्या सिल्क रूटवर  बामियान वसलेलं होतं. आजूबाजूच्या ओसाड प्रदेशापेक्षा बामियानचा प्रदेश बऱ्यापैकी सुपीक होता. यामुळं व्यापारी आणि धर्मप्रचारक यांना प्रवासात थांबण्यासाठी बामियानला पसंती असायची. पहिल्या सहस्रकाच्या मध्यामध्ये बामियानमध्ये राहणारे बहुतेक सारे व्यापारी आणि धर्मप्रसारक हे बौद्ध धर्माचेच होते. कुशाणांच्या काळात पसरलेला बुद्ध धर्म या काळात बामियानमध्ये चांगला रुजलेला होता.

बौद्ध भिक्शू कुठंही आणि केव्हाही आराधना करू शकायचे. यातूनच बौद्ध वास्तुकलेतल्या गुहांची सुरुवात झाली. आजही बामियानमध्ये डोंगरामध्ये १३०० मीटर अंतरामध्ये जवळपास १००० गुहा आहेत. या गुहा ज्या डोंगरामध्ये आहेत तिथंच अतिभव्य अशा बुद्धाच्या मूर्ती बनवल्या गेल्या होत्या. अलीकडं (२००१ मध्ये) या अतिभव्य शिल्पं नष्ट करण्यात आली. पण नष्ट होईपर्यंत ही शिल्पं जगातल्या सर्वात मोठ्या असणाऱ्या मूर्ती मानल्या जायच्या. बौद्ध आणि इतर धर्मातल्या प्रवाशांसाठी ही महाकाय शिल्पं एक महत्वाचं आकर्षण ठरत होती. या मुर्त्या बनवण्याचं काम नेमकं कुणी सांगितलं, कोणत्या शिल्पकार लोकांनी ह्या मूर्त्या बनवल्या हे मात्र आज कुणालाच माहीत नाही. पण त्याकाळात असणाऱ्या बौद्ध धर्माच्या अस्तित्त्वाची या शिल्पांमुळे कल्पना येते.

 बामियानमधल्या बुद्धमूर्तींचं १८३२ मधलं एक रेखाटन 
Image credit:
Alexander Burnes [Public domain]
https://commons.wikimedia.org/wiki/File:Bamiyan_Buddhas_Burnes.jpg


या दोन बुद्धांच्या मुर्त्यांपैकी मोठी असणारी मूर्ती तब्बल १७५ फुटांची होती तर लहान मूर्ती १२० फुटांची होती. मोठी असणारी मूर्ती 'वैरोचन' बुद्धाची (वैश्विक बुद्ध) तर छोटी मूर्ती 'शाक्यमुनी'बुद्धांची (म्हणजे गौतम बुद्ध) मानण्यात येते. ह्या मुर्त्या डोंगरात खोदल्या असल्या तरी मोठ्या मूर्तीच्या भोवती प्रदक्षिणा घालण्याची सोय होती. ह्या मुर्त्यांच्या कलेवर भारतीय, ग्रीक आणि मध्य आशियातल्या कलांचा प्रभाव होता.  डोक्यावरचे कुरळे केस आणि शरीरावरचं वळ्या असणारं वस्त्र यावर ग्रीक कलेचा अतिशय स्पष्ट असणारा प्रभाव दिसत होता. ग्रीक कलेची शैली आणि कलेचा भारतीय विषय यांचा मिलाफ हे या मूर्तींचं वैशिष्ट्य होतं.

चिनी प्रवासी युवान त्सांग सातव्या शतकाच्या मध्यात प्रवास करताना बामियानमध्ये थांबला होता. त्याच्या लिखाणावरून आपल्याला ह्या मुर्त्या त्या काळात कशा दिसायच्या याची कल्पना येते. युवान त्सांग म्हणतो: “इथं (बौद्ध भिक्षूंचे) कित्येक मठ आहेत, हजारो भिक्षु आहेत. हे भिक्षु हीनयानातल्या लोकोत्तर पंथाच्या पद्धतीनं आराधना करतात. शहराच्या उत्तरपूर्व दिशेला पर्वतात बनवलेली उभ्या  बुद्धाची दगडाची मूर्ती आहे. ही मूर्ती १४० ते १५० फूट उंचीची आहे. मूर्तीचा रंग चमकदार सोनेरी आहे आणि त्यावर कित्येक सुंदर रत्नेही आहेत. देशाच्या या आधीच्या राजानं बांधलेला (भिक्षुकांसाठीचा) मठ पूर्व दिशेला आहे. मठाच्या पूर्व दिशेला बुद्धांची शंभर फुटांहून उंच तांब्याची उभी मूर्ती आहे. तांब्याचे वेगवेगळे तुकडे बनवून (casting करून), त्यांना जोडून (welding करून) ही मूर्ती बनवण्यात आली आहे.”

युवान त्सांगच्या बुद्धांच्या मूर्तींच्या वर्णनावरून हे स्पष्ट होतं की एके काळी या बुद्धमूर्ती रंग, धातू आणि रत्ने यांनी सजवलेल्या होत्या. कालांतरानं ही सारीच सजावट काढून टाकण्यात आली. दोन मूर्तींपैकी लहान असणारी मूर्ती त्या काळात तांब्याची दिसत असली तरी आजच्या विद्वानांच्या मते ती पूर्णपणे तांब्याची नव्हती. त्या मूर्तीला रंगच अशा प्रकारे दिला होता की ती तांब्याची असल्यासारखं वाटत होतं. काहींच्या मते या अतिभव्य मूर्तींच्या चेहऱ्यावर लाकडी मुखवटे बसवण्यात आले होते. या सुंदर, महाकाय आणि डोळे दिपवून टाकणाऱ्या मूर्तींकडे पाहताना रस्त्यांवरून जाणाऱ्या बौद्ध भक्तांना कसे वाटत असेल याची आपण कल्पना करू शकतो.

२००१ मध्ये मात्र इतिहासाचा महान वारसा असणाऱ्या या मुर्त्या नष्ट करण्याचे आदेश तालिबानी नेता मुल्ला ओमर यानं तालिबानच्या अनुयायांना दिले. दोन्ही मुर्त्या या काळात पूर्णपणे नष्ट करण्यात आल्या. या बुद्धमूर्ती प्रचंड मजबूत असल्यानं त्यांना नष्ट करणं तालिबानच्या लोकांना खूप अवघड गेलं. त्यांना ह्या मुर्त्या नष्ट करायला कित्येक आठवडे लागले. सुरुवातीला त्यांनी विमानविरोधी (anti aircraft guns ) वापरून पाहिल्या, पण त्यांनी फारसा फरकच पडला नाही. मग या लोकांनी स्फोटकांचा वापर करत मुर्त्या नष्ट करायला सुरुवात केली. मुर्त्यांची डोक्यांमध्ये भोके पाडून त्यात स्फोटकं उडवण्यात आली.

या मुर्त्या नष्ट होणं हे साऱ्या जगासाठी खूप मोठं नुकसान होतं यात मात्र कुणालाच शंका नाही.

- दुष्यंत पाटील

#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#माझीशाळामाझीभाषा
#कारागिरी

संदर्भ:


🍀 https://www.khanacademy.org/humanities/ap-art-history/west-and-central-asia/a/bamiyan-buddhas

🍀 https://en.wikipedia.org/wiki/Buddhas_of_Bamyan

🍀 https://www.learnreligions.com/vairocana-buddha-450134

No comments:

Post a Comment