Tuesday, April 2, 2019

गांधार कला - २

मुशाफिरी कलाविश्वातली

गांधार कला - २

मागचा भाग: गांधार कला - १ 

यातल्या डिमीट्रीयसनं आपलं राज्य पंजाब आणि सिंधपर्यंत वाढवलं. त्याच्या कारकिर्दीत बनवल्या गेलेल्या नाण्यांवर ग्रीक आणि प्राकृत अशा दोन्ही भाषा वापरलेल्या दिसतात. या नाण्यांवरची लिपी ग्रीक आणि खरोष्ठी आहे. आजच्या काळातलं पाकिस्तानातल्या पंजाबमधलं 'सियालकोट' हे त्याच्या राज्याच्या राजधानीचं शहर होतं. या ग्रीक घराण्यातल्या राजांची नावं त्या काळच्या सापडलेल्या नाण्यांवरूनच समजतात. 

या घराण्यातला सर्वात प्रसिद्ध राजा म्हणजे मिनँडर (मिलिंद). यांच्या काळातही राजधानी सियालकोटलाच होती. त्याच्या कारकिर्दीतल्या सापडलेल्या नाण्यांवर वेगवेगळ्या वयांमधला मिलिंद पाहायला मिळतो. यावरून त्यानं बरीच वर्षे राज्य केल्याचं स्पष्ट होतं. या राजाचं राज्य पश्चिमेला काबूलपासून पूर्वेला मथुरेपर्यंत होतं. मिलिन्दनं नागसेन नावाच्या बौद्ध भिक्षूला बरेचसे प्रश्न विचारले. नागसेननं या प्रश्नांना दिलेली उत्तरं 'मिलिंद पन्हा' या नावाच्या ग्रंथामध्ये आहेत. बौद्ध धार्मिक साहित्यात हा एक महत्वाचा ग्रंथ मानला जातो. मिलिन्दनं नंतरच्या काळात बौद्ध धर्माचा स्वीकार केला. मिलिन्दनं बौद्ध धर्माच्या प्रसाराला बरीच चालना दिली. मिलिन्दनंतर ग्रीक घराण्यात कुणी फारसा प्रभावी राजा झाला नाही. मिलिंदच्या मृत्यूनंतर सर्वसाधारण शंभरेक वर्षे ग्रीकांची सत्ता चालली.

Jnzl's Public Domain Photos [Public domain]
https://commons.wikimedia.org/wiki/File:Gandharan_sculpture_-_head_of_a_bodhisattva_front_view.jpg

यानंतर गांधारवर पल्लव (इराणी लोक) आणि शक (मध्य आशियातून आलेले लोक) यांचं काही काळ राज्य होतं. यांचं राज्य फार काळ चाललं नाही. पण यानंतर आलेल्या कुशाण लोकांचं राज्य मात्र बराच काळ टिकलं.

कुशाण मध्यआशियामधून आले होते. गांधारचं राज्य त्यांनी जिंकलं. कडफैसेस (पहिला) नावाच्या राजानं गांधारचा ताबा मिळवला. अर्थातच त्याच्या राज्यात इतरही प्रांत येत होते. या नंतर आलेल्या कडफैसेस (दुसरा) यानं कुशाण साम्राज्य मथुरेपर्यंत वाढवलं. हिंदू धर्मातल्या शैव पंथाचा त्यानं स्वीकार केला. (तो नाण्यांवर स्वतःचा उल्लेख 'महेश्वर'असा करत असे.) त्यानं चीन आणि रोम यांच्याशी चांगले संबंध राखले.

कुशाण साम्राज्यातला सर्वात महत्वाचा राजा म्हणजे कनिष्क. तो यशस्वी योद्धा असल्याचे, आणि त्यानं बरीचशी युध्दं केल्याचे उल्लेख प्राचीन चिनी, तिबेटीय आणि भारतीय ग्रंथांमध्ये आढळतात. 

  कनिष्कचं भारताच्या सांस्कृतिक इतिहासात बरंचंसं योगदान आहे. त्यानं काश्मीर जिंकून तिथं बऱ्याचशा वास्तू उभारल्या. तिथं कनिष्कपूर नावाचं एक नगरही बसवलं. कनिष्कनं पाटलीपुत्र जिंकल्यावर त्याला तिथं अश्वघोष नावाचा एक महान बौद्ध तत्वज्ञ भेटला. कनिष्कच्या दरबारात याला खूप महत्त्वाचं स्थान मिळालं. कनिष्कनं नंतर चीनमध्येही आपलं साम्राज्य वाढवलं. कनिष्क हा बौद्ध धर्माचा खूप मोठा अाश्रयदाता होता. आपल्या कारकिर्दीत त्यानं  वेगवेगळ्या ठिकाणी बरेचशे बौद्ध स्तूप, चैत्य आणि विहार बांधले. नागार्जुन, अश्वघोष आणि वसुमित्र यासारख्या बौद्ध विद्वानांना त्यानं आश्रय दिला. चीन, तिबेट, जपान आणि मध्य आशिया या ठिकाणी त्यानं बौद्ध धर्मप्रसारक पाठवले. याच्याच कारकीर्दीत काश्मीरमधल्या कुंदनवन इथं बौध्दांची चौथी धर्मपरिषद भरली. यात वसुमित्र अध्यक्ष तर अश्वघोष उपाध्यक्ष होते.

याच काळात बौद्ध धर्मातल्या महायान पंथाच्या तत्वज्ञानाला अंतिम आकार देण्यात आला. कनिष्कनं संस्कृत साहित्यालाही चालना दिली, त्यामुळं या काळात उत्कृष्ट संस्कृत साहित्यही निर्माण झाले.

कनिष्कची राजधानी पुरुषपूर (आजचं पाकिस्तानमधलं पेशावर) ही होती. त्याच्या राज्यात पुरुषपूर शिवाय दुसरं महत्वाचं असणारं शहर म्हणजे मथुरा!

इ. स .पू पहिल्या शतकात बॅक्टरीया (गांधारच्या वायव्येस असणारा प्रदेश) इथं राहणाऱ्या सिकंदरच्या ग्रीक वंशजांना शकांनी हाकलून लावलं. हे ग्रीक लोक मग गांधारमध्ये येऊन स्थिरावले. गांधारमध्ये आढळणाऱ्या ग्रीक कलेचा प्रभाव असणाऱ्या गांधार शैलीतल्या कलाकृती दिसायला सुरुवात होते ती याच काळापासून !! आणि आपण बघितल्याप्रमाणं इथं ह्या काळात बौद्ध धर्माचा चांगला प्रसार झाला होता. यामुळं गांधार शैलीत आपल्याला बौद्ध धर्मातल्या कलाकृती बघायला मिळतात.

- दुष्यंत पाटील

#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#माझीशाळामाझीभाषा
#कारागिरी

संदर्भ:

🍀 History and culture of ancient Gandhara and western Himalayas – B K Kaul deambi (Ajantha publishing house 1985)

🍀 Gandhara sculptures from Pakistan museums – Benjamin Rowland

🍀 Hellenism in Ancient India – Gauranga Nath Banerjee (BUTTERWORTH & Co. (INDIA), LTD 1920)

3 comments: