मुशाफिरी कलाविश्वातली
गांधार कला – ३
गांधार कला – ३
गांधार कला - १ :
गांधार कला - २ :
गांधारमध्ये वेगवेगळे व्यापारी मार्ग येऊन मिळत होते. युरोपमधून येणारा मार्ग मेसोपोटेमिया, इराण, अफगाणिस्तानमधून गांधारला मिळत होता. तर दुसरीकडं चीनमधून येणारा सिल्क रूट गांधारमध्ये येत होता. पूर्वेला गांधार भारताला जोडला गेला होता. वेगवेगळ्या देशांमधून येणारे हे सारे व्यापारी मार्ग एका अर्थानं वेगवेगळ्या देशांमधल्या संस्कृतींनाही जोडत होते. या व्यापारी मार्गांवर (किंवा व्यापारी मार्गांपासून जवळ) वसलेल्या शहरांमध्ये 'गांधार कला' विपुल प्रमाणात पाहायला मिळते. इतर संस्कृतींशी संबंध आल्यानं गांधार कलेत आपल्याला ग्रीक, रोमन, पर्शियन, भारतीय कलेचा मिलाफ झालेला दिसतो. भारतातल्या मथुरा आणि सारनाथ इथल्या कलांचाही प्रभाव गांधार कलेत दिसतो.
कबरीच्या बांधकामावर केलेल्या कलेला 'मोर्च्युअरी आर्ट' असं म्हणतात. रोमन लोकांच्या कबरीवर एक कोरीव कलेची एक विशिष्ट प्रकारची सजावट दिसून येते. नेमकी अशीच कोरीव कला गांधारमधल्या एखादी कथा सांगणाऱ्या शिल्पात (narrative art) दिसून येते. एखादी दैवी गोष्ट दाखवायची असेल तर, किंवा सजावट दाखवायची असेल तर गांधार कलेत ग्रीक आणि इराणी कलेतून काही गोष्टी घेतलेल्या दिसतात.
हे लोक शिल्पं नेमकं कशाची बनवायचे? ही शिल्पं बनवताना वालुकाश्म, शिस्ट (सुभाजा), स्लेट नावाचा पाषाण आणि स्टको (चुनेगच्ची) वापरायचे. सोनं आणि तांब्याच्या धातूंमधलं कोरीव कामदेखील याठिकाणी मिळालेलं आहे. हे शिल्प बनवताना नेमकं कोणत्या प्रकारचं शिल्प बनवायचं आहे, यावर ते कोणतं माध्यम वापरून बनवायचं ते ठरायचं. काही काही ठिकाणी फर्निचरमध्ये हस्तिदंतावरचं कोरीव कामही पाहायला मिळतं. ह्या प्रकारचं फर्निचर मुख्यत्वेकरून राजवाड्यांमध्ये पाहायला मिळतं. (जिथं गांधार आणि मथुरा अशा दोन्ही ठिकाणांच्या कला दिसतात)
गांधार कलेच्या शैलीची आपण काही वैशिष्टयं पाहू. गांधार शिल्पांमध्ये आपल्याला एक प्रकारची नैसर्गिकता दिसते. म्हणजे शिल्पामधले आकार, प्रमाण, वस्त्रांवरच्या वळ्या अगदी नैसर्गिक वाटतात. शिल्पांमधली शरीरं अगदी आदर्श प्रकारे प्रमाणबद्ध दाखवली आहेत. शरीराचं आदर्श सौन्दर्य दाखवण्याची पद्धत अभिजात ग्रीक कलेतून घेतलेली दिसते. (आपण जर यांची तुलना मथुरा किंवा सांची, भारहूत इथल्या शिल्पाशी केली तर मथुरा/सांची/भारहूत इथली शिल्पं कमी नैसर्गिक वाटतात आणि इथं शरीराच्या प्रमाणापेक्षा कलाकृतीच्या विषयाला जास्त महत्व दिलेलं दिसतं.) गांधारमधल्या शिल्पांमधली शरीरं तारुण्यातली आणि मजबूत दाखवली आहेत. (कारण आदर्श/प्रमाणबद्ध शरीर हे तारुण्यात असतं.) पुरुषांच्या शिल्पांमध्ये शरीरसौष्ठव उठून दिसतं. यात स्नायू, रक्तवाहिन्या यासारखे तपशील स्पष्टपणे दाखवले आहेत. पुरुषांमध्ये छाती आणि पोट V आकारात ना दाखवता काहीसं चौरसाकृती दाखवलेलं दिसतं. बहुतेकवेळा केस कुरळेच दाखवलेले दिसतात. चेहऱ्यावर नाक, ओठ वगैरे अवयव अतिशय रेखीव पद्धतीनं दाखवलेले दिसतात.
हरिती आणि पंचिक
सोबत दिलेल्या चित्रात आपल्याला बौद्ध पुराणातली 'हरिती'नावाची यक्षिणी आणि तिचा पंचिक नावाचा यक्ष पती दिसतोय. पुराणकथेप्रमाणं ही हरिती आजच्या बिहारमधल्या नालंदेजवळच्या राजगीर नावाच्या ठिकाणी राहायची. ती सुरुवातीला राक्षसीण होती. तिला ५०० मुलं होती. ती (आणि तिची मुलं) नरमांसभक्षण करायचे. ती इतरांच्या मुलांना ठार मारायची आणि स्वतः खायची, तसंच आपल्या मुलांना खायला द्यायची. हे भयानक काम करताना ती इतर १० राक्षसिणींची मदतही घ्यायची.
स्वतःची मुलं गमावण्याची यातना भोगणाऱ्या माता गौतम बुद्धांकडे गेल्या. त्यांनी आपली कहाणी बुद्धांना सांगितली. बुद्धांनी हरितीच्या५०० मुलांपैकी सर्वात लहान असणारा मुलगी (काही कथांप्रमाणे सर्वात लहान मुलगी) पळवून लपविला. पुत्रवियोगाच्या वेदनेनं हरितीनं आपल्या पुत्राचा साऱ्या ब्रह्माण्डात शोध घेतला. दुर्दैवानं तिला तिचा मुलगा सापडला नाही. शेवटी ती बुद्धांकडं आली. बुद्धांनी तिला विचारलं की जर ५०० मुलांपैकी एकाला गमावल्यानं तिला इतकं दु:ख होत असेल तर ज्यांची एकुलती एक मुलं हरितीनं संपवली होती त्यांची अवस्था कशी असेल ?
हरितीला आपल्या चुकीची जाणीव झाली. तिनं भविष्यात कुठल्याही मुलाला ना मारण्याची शपथ घेतली. मुलांचं मांस खाण्याऐवजी डाळिंबं खाण्याचा तिनं निश्चय केला. यानंतर हरिती लहान मुलांची आणि बाळांना जन्म देणाऱ्या मातांची रक्षणकर्ती बनली. बुद्धांनी तिला आजाऱ्याला बरं करण्याची शक्ती, दुष्टशक्तींपासून वाचण्याची शक्ती दिली.
गांधार कलेचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे यामधली शिल्पं ही कुठल्या ना कुठल्या वास्तूचा भाग असल्याचं दिसून येतं. म्हणजे ही शिल्पं भारतात सापडतात त्याप्रमाणं स्वतंत्र बनवलेली शिल्पं नसतात. बरीचशी शिल्पं एखाद्या बौद्ध वास्तूशी संबंधित कलेचं भाग असल्याचं दिसून येतं. उदा. बौद्ध स्तूप किंवा बौद्ध विहार यांचा भाग असणारी शिल्पं.
बुद्ध किंवा बोधीसत्व यांच्या शिल्पांमध्ये प्रत्येक भौगोलिक भागात एक प्रकारची समानता दिसून येते. उदाहरणार्थ स्वात खोऱ्यातल्या बुद्धांच्या मूर्त्यांमध्ये प्रमाण, मुद्रा, कुरळे केस, बसण्याची पद्धत वैगेरे गोष्टी (काही काळाकरता) एकसारख्याच दिसतात. किंवा दुसऱ्या शब्दांत सांगायचं झालं तर शिल्पाची रचना त्या त्या भागात त्या त्या कालखंडात कॉपी केलेली दिसते.
या गांधार शिल्पांमधले विषय बहुतेकवेळा बौद्ध धर्माशी संबंधित दिसतात. यात बुद्ध, बोधिसत्व यांच्या प्रतिमा, बुद्धांच्या आयुष्यातले प्रसंग दाखवणारी शिल्पं यांचा समावेश होतो. गांधार कलेत आपल्याला ग्रीक-रोमन लोकांच्या झ्यूअस, अपोलो, एथिना यासारख्या प्रमुख देवतांची शिल्पंही आढळतात. याशिवाय आपल्याला राजघराण्यातल्या लोकांची शिल्पंही दिसतात. बुद्धांच्या बहुतेक साऱ्या प्रतिमा उभारलेल्या अवस्थेतल्या आहेत. त्यामध्ये बऱ्याचदा एक पाय थोडासा वाकलेला दिसतो. बुद्धांच्या प्रतिमेत अजूनही काही गोष्टी आढळून येतात. त्या आपण पुढच्या भागात पाहू.
- दुष्यंत पाटील
#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#माझीशाळामाझीभाषा
#कारागिरी
संदर्भ:
🍀 https://en.wikipedia.org/wiki/Greco-Buddhist_art
🍀 Gandhara sculptures from Pakistan museums – Benjamin Rowland
🍀 https://youtu.be/anBKOzsuPaw
No comments:
Post a Comment