Monday, September 2, 2019

लेखनिक गणपती

मुशाफिरी कलाविश्वातली


लेखनिक गणपती 

आजच्या काळातल्या मध्यप्रदेश आणि उत्तरप्रदेश मधल्या बुंदेलखंड भागात दहाव्या शतकात चंदेल घराण्याचं राज्य होतं. इ स ९२५ ते इ स ९५० च्या दरम्यान चंदेल घराण्यात एक पराक्रमी राजा होऊन गेला. त्याचं नाव होतं यशोवर्मन. सुरुवाळतीच्या काळात त्यानं गुर्जर-प्रतिहार राजाचं मांडलिकत्व स्वीकारलं होतं. पण ते झुगारून नंतर तो स्वतंत्र राजा झाला. आपल्या कारकिर्दीत त्यानं एक महत्वाचं मंदिर बांधायला सुरुवात केलीहे मंदिर होतं खजुराहोमधलं लक्ष्मण मंदिर.

या मंदिराच्या बाहेरच्या बाजूला बऱ्याच प्रकारची कोरलेली शिल्पं आहेत. यात देवदेवता तर पाहायला मिळतातच, पण त्या शिवाय शिकारीचे प्रसंग, नृत्याचे कोरलेले चित्रण, कुस्तीच्या स्पर्धा आणि सैनिकही दाखवलेले आहेत. एका ठिकाणी सभोवताली विद्यार्थी असणारे शिक्षकही दाखवण्यात आले आहेत. या सर्वांमध्ये महाभारताशी संबंधित असणारा एक प्रसंग दाखवणारी गणेशाची एक वैशिष्ट्यपूर्ण मूर्ती दाखवण्यात आलेली आहे. हा प्रसंग महाभारत घडून गेल्यानंतरचा आहे. 

आपले वंशज असणारे कौरव आणि पांडव यांची आयुष्ये संपल्यानंतरही वेदव्यास यांचं जीवन व्यवस्थित चालू होतं. याचं कारण म्हणजे महर्षी वेदव्यास हे मोठे तपस्वी होतेएके दिवशी व्यासमुनींचं असंच ध्यान चालू होतं, आणि त्यांच्या समोर ब्रह्मदेव प्रकट झाले. ब्रह्मदेवानं त्यांना महाभारताची कथा लिहायला सांगितली. सारं महाभारत व्यासांच्या डोळ्यासमोरच घडलं होतं, त्यामुळं त्यांना महाभारतातली सारी पात्रं, सारे प्रसंग पूर्णपणे माहीत होते. महाभारत लिहिण्यासाठी व्यासमुनींपेक्षा अधिक चांगला व्यक्ती मिळणंच शक्य नव्हतं.

Image credit: Rajenver [CC BY-SA 3.0 (https://creativecommons.org/licenses/by-sa/3.0)]
https://commons.wikimedia.org/wiki/File:Khajuraho_India,_Lakshman_Temple,_Sculpture_02.JPG

पण ब्रह्मदेवानं सांगितलेलं काम ऐकून व्यासमुनी विचारात पडले. कारण एकतर महाभारताची कथा अतिशय क्लिष्ट होती. आणि अशी क्लिष्ट आणि अतिदीर्घ असणारी कथा काव्यरुपात रचता रचता लिहिणं म्हणजे खरंच कठीण काम होतं. कुणीतरी आपल्याला ही महाभारताची कथा लिहायला मदत करावी असं व्यासमुनींना वाटत होतं. यावेळी ब्रह्मदेवानं व्यासमुनींना गणपतीची मदत घ्यायला सांगितलं.

व्यासमुनींनी गणपतीसाठी तपस्या सुरु केली. गणपती प्रसन्न झाला. गणपतीला पाहताच व्यासमुनींनी गणपतीला प्रणाम केला आणि आपल्या तपस्येचं कारण सांगितलं.

व्यासमुनी अतिशय शीघ्र रचना करत वेगानं महाभारत रचू शकतात ह्याची गणपतीला कल्पना होती. पण व्यासमुनींची परीक्षा पाहण्यासाठी गणपतीनं एक अट घातली. या अटीप्रमाणं व्यासमुनींनी रचलेले श्लोक  सांगायला सुरुवात केल्यानंतर गणपती लिहायला सुरुवात करणार होता. पण एखाद्या क्षणी गणपतीचं लिहून झाल्यावर व्यासमुनींनी पुढची रचना करेपर्यंत थांबावं लागलं तर मात्र लिहिण्याचं काम थांबवून गणपती सरळ निघून जाणार होता !!

महाभारत वेगानं रचण्याचा व्यासमुनींना आत्मविश्वास होता. पण गणपतीच्या लिहिण्याच्या प्रचंड वेगाचीही त्यांना कल्पना होती. गणपतीच्या लिहिण्याच्या वेगापेक्षा आपला रचण्याचा वेग जास्त असेल का हे त्यांना कळत नव्हतं. इतक्यात व्यासमुनींच्या डोक्यात काहीतरी विचार आला. त्यांनी गणपतीची अट लगेच मान्य केली. आणि त्यांनीही एक अट घातली. व्यासमुनींनी सांगितलेली कुठलीही गोष्ट गणपतीनं समजल्याशिवाय लिहू नये अशी ही अट होती.

अशा प्रकारे व्यासांनी महाभारत रचायला आणि गणपतीनं ते लिहायला सुरुवात केली. जेंव्हा जेंव्हा व्यासमुनींना थोडीशी विश्रांती घ्यावीशी वाटे किंवा थोडासा वेळ हवा असे तेंव्हा तेंव्हा ते क्लिष्ट अर्थाचं काव्य रचत. (याला कूट श्लोक असंही म्हणतात) त्याचा अर्थ समजायला गणपतीला वेळ लागे. यामुळं व्यासमुनींना विश्रांती मिळे. मग पुढची रचना ते आरामात करू शकत.

व्यासमुनींनी वेगानं महाभारत रचलं तर गणपतीनं ते सारं तितक्याच वेगानं लिहिलं. पण वेगानं लिहता लिहता एकदा गणपतीची लेखणी तुटली. पण गणपतीला थांबायचं नव्हतं. त्यानं आपला एक दात (हस्तिदंत) तोडून त्याचा लेखणी म्हणून वापर केला. त्यामुळंच गणपतीचा एक दात तुटलेला दाखवला जातो. (त्याचं एकदंत हे नावही यामुळंच पडलं).

महाभारतातलं हेच दृश्य खजुराहोमधल्या लक्ष्मण मंदिरात बघायला मिळतं. या गणपतीला आठ हात आहेत.  हा गणपती नृत्यमुद्रेत असून तो उजव्या मांडीवरच्या वस्त्रावर व्यासांनी रचलेलं महाभारत लिहतोय. व्यासांनी सांगितलेल्या शब्दांचा, रचनेचा अर्थ समजून घेण्यासाठी आवश्यक आणणारी एकाग्रता त्याच्या चेहऱ्यावर दिसत आहे.

लक्ष्मण मंदिरातलं हे गणपतीचं शिल्प खूप प्रसिद्ध आहे !!

दुष्यंत पाटील

#
ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#माझीशाळामाझीभाषा
#कारागिरी

संदर्भ:
“A Guide To Khajuraho” – B L Dhama
The Early Rulers of Khajuraho – Dr Sisir Kumar Mitra, Dr B C Sen
प्राचीन मंदिरे, मूर्ती आणि भावपूर्ण शिल्पे - उदयन इंदूरकर

No comments:

Post a Comment