Tuesday, September 17, 2019

उत्तर-पश्चिम मार्ग



मुशाफिरी कलाविश्वातली

उत्तर-पश्चिम मार्ग

एकोणिसाव्या शतकातल्या उत्तरार्धातली गोष्ट. या काळात जगातल्या बऱ्याच ठिकाणी इंग्रजांचं राज्य होतं. इंग्रज लोक दर्यावर्दी होते, धाडसी होते, हुशारही होते. पण एका मोहिमेत मात्र त्यांना यश मिळालं नव्हतं.

युरोपमधून अमेरिकेत जाण्यासाठीचा अटलांटिक महासागरातून असणारा मार्ग सर्वांना माहीत होताच, पण युरोपच्या उत्तर भागातून आर्क्टिक समुद्रातून कॅनडाकडं जाण्याचा (किंवा खरं तर थेट प्रशांत महासागरात जाण्याचा) समुद्री मार्ग लोक शोधत होते. आर्क्टिक भागातली जीवघेणी थंडी आणि बऱ्याच महिन्यांची रात्र लक्षात घेता हे एक महाकठीण काम होतं. हा मार्ग शोधण्याचे बरेच प्रयत्नही झाले होते, पण ते वाईट प्रकारे फसले होते. या मार्गानं जाण्याचा प्रयत्न करणं म्हणजे मृत्यूला मिठी मारणं असं सारे लोक मानायला लागले होते.

१८४५ मध्ये अनुभवी इंग्रज कप्तान 'जॉन फ्रँकलीन' याच्या नेतृत्वाखाली एक मोहीम झाली होती. ती इतक्या वाईट प्रकारे फसली होती की या मोहिमेवरच्या लोकांचं पुढं काय झालं हेही कुणाला कळतच नव्हतं. या मोहिमेतली जहाजं बर्फामध्ये अडकली होती आणि माणसं पुढच्या काळात त्या बर्फाळ प्रदेशात वेगवेगळ्या कारणानं मृत्युमुखी पडली होती. यावर आधारित एक कलाकृती 'मॅन प्रपोजेस् गॉड डिस्पोजेस्' पूर्वी आपण पाहिलीच आहे.

फ्रँकलिनच्या मोहिमेचं पुढं काय झालं ह्याची धाकधूक साऱ्याच इंग्रजांना होती. १८५० मध्ये कप्तान मॅकल्युअर यांच्या नेतृत्वाखाली एक शोध मोहीम निघाली. ह्या मोहिमेत ध्रुवीय प्रदेशात हरवलेल्या जहाजाचा आणि माणसांचा बराच शोध घेण्याचा प्रयत्न झाला. शोध मोहिमेतल्या जहाजाचं नाव होत 'एच एम एस इन्व्हेस्टिगेटर'. या लोकांनी समुद्रात आणि बर्फाळ प्रदेशात आपल्या माणसांचा काही ठावठिकाणा लागतो का हे पाहण्याचा बराच प्रयत्न केला. 'एच एम एस इन्व्हेस्टिगेटर' हेदेखील अखेरीस जहाजाची ध्रुवीय प्रदेशात बर्फात अडकलं. मोहिमेतल्या लोकांची सुटका 'एच एम एस रेझोल्यूट' नावाच्या जहाजानं केली आणि नंतर 'एच एम एस रेझोल्यूट' हे जहाजही शेवटी बर्फात अडकलं !! पण शोध मोहिमेतल्या लोकांनी जवळपास चार-पाच वर्षे ध्रुवीय प्रदेशात शोध घेण्याचं कठीण, आव्हानात्मक काम केलं होतं.

पुढं इंग्रजांनी १८७४ - ७५ च्या दरम्यान पुन्हा एकदा हा मार्ग शोधण्यासाठी एका मोहिमेची आखणी केली. ही मोहीम 'ब्रिटिश आर्क्टिक एक्स्पेडिशन' नावानं ओळखली जाते. या मोहिमेची आखणी चालू असताना या मोहिमेकडं साऱ्या जनतेचं लक्ष वळू लागलं. महान इंग्रज चित्रकारांपैकी एक असणाऱ्या जॉन मिलैस याच्या संवेदनशील कलाकार मनाला ही घटना साद घालत होती. एका वृद्ध खलाशाशी गप्पा मारताना चित्रकाराला खलाशाचं एक वाक्य खोल परिणाम करून गेलं होतं. वृद्ध खलाशी म्हणाला होता, "हे होऊ शकतं (हा मार्ग शोधला जाऊ शकतो) आणि तो इंग्लंडने शोधायला हवा."  या विषयावर चित्र काढण्याची कल्पना मिलैसच्या डोक्यात घोळू लागली.

आता मिलैस चित्र काढण्यासाठी मॉडेल्सच्या शोधात होता. एका अर्कचित्रं काढणाऱ्या (caricaturist) मित्राच्या अंत्ययात्रेत त्याला ट्रेलोनी नावाचा वृद्ध खलाशी भेटला. मिलैसला आपल्या चित्रासाठी तो मॉडेल म्हणून पसंत पडला. पण 'ट्रेलोनी'ला मॉडेल म्हणून काम करण्यात बिलकुल रस नव्हता. काहीतरी करून त्याचं मन वळवावं लागणार होतं. 'ट्रेलोनी' या काळात तुर्किश बाथ या प्रकाराचा खूप प्रचार करत होता. शेवटी मिलैसच्या पत्नीनं त्याला ६ वेळा तुर्किश बाथमध्ये जाण्याचं आश्वासन दिल्यावर तो मॉडेलिंगसाठी तिच्या पतीकडं ६ वेळा येण्यासाठी तयार झाला !!! व्यावसायिक मॉडेल असणाऱ्या 'सौ एलिस' यांची त्या चित्रातल्या स्त्रीच्या पात्रासाठी मॉडेल म्हणून निवड करण्यात आली.



या मॉडेल्सना घेऊन मिलैसनं १८७४ मध्ये सोबत दाखवलेलं चित्र काढलं. चित्राला नाव दिलं 'दि नॉर्थ वेस्ट पॅसेज'. चित्रात आपल्याला एक वृद्ध खलाशी आणि त्याची कन्या दिसतीये. वृद्ध खलाशी कॅनवासमधून थेट बाहेर बघतोय असं वाटतं. या खलाशांच्या नजरेत एक प्रकारची चमक आहे. मुलीच्या हातात एक जाडी वही आहे. यात त्या वृद्ध खलाशाच्या आठवणी लिहिलेल्या असाव्यात असं वाटतं. (अर्थात ती त्याची समुद्रातल्या प्रवासाची दैनंदिनी असावी.) मागच्या टेबलवर एक नकाशा पडलेला दिसतो. हा नकाशाच  ह्या चित्राचा संबंध आर्क्टिक मोहिमेशी जोडतो. हा नकाशा कॅनडाच्या उत्तर किनाऱ्याचा आहे. या प्रदेशाचा नकाशा बनवण्याचं काम वर नमूद केलेल्या मॅकल्युअरच्या शोध मोहिमेत झालं होतं. त्यामुळं चित्रातला खलाशी त्या शोध मोहिमेतील असावा असं सुचवण्यात आलंय. चार-पाच वर्षाच्या खडतर आठवणी या वहीत असाव्यात अशी कल्पना चित्र पाहणाऱ्याला लगेच येते. साहसाची, खडतर अनुभवांना सामोरं जाण्याची इंग्रजांची परंपरा आहे असं मिलैसनं एक प्रकारे या चित्रात सूचित केलंय. टेबलच्या मागच्या बाजूला भिंतीवर अडकलेलं एक चित्र अर्धवट दिसतंय. हे चित्र बर्फात अडलेल्या एका जहाजाचं आहे. आणि ते 'एच एम एस इन्व्हेस्टिगेटर' जहाजासारखं दिसतं असं मानलं जातं !!

मिलैसनं सुरुवातीला या चित्रात खलाशाची नातवंडंही दाखवली होती. (या नातवंडांसाठी मॉडेल्स म्हणून त्यानं स्वत:ची मुलंच घेतली होती). पण चित्रात जे नेमकं दाखवायचं होतं ते त्या चित्रात दिसत नव्हतं असं त्याला वाटलं. त्यामुळं त्यानं नंतर मुलांना वगळून पुन्हा एकदा चित्र काढलं.

हे चित्र नंतर प्रदर्शनात ठेवण्यात आलं. चित्रासाठी मॉडेल म्हणून काम करणारा ट्रेलोनी चित्र पाहून संतापालाच ! कारण या चित्रात त्याच्या बाजूला मद्याचा ग्लास दाखवण्यात आलेला होता !

हे चित्र इंग्लंडमध्ये प्रचंड गाजलं ! या चित्राच्या कित्येक प्रती ब्रिटिशांच्या घरी दिसू लागल्या ! मिलैसच्या मुलानं नंतरच्या काळात लिहिलंय की दक्षिण आफ्रिकेतल्या एका झोपडीत देखील त्यानं या चित्राची एक प्रत पाहिली ! खरं तर हे चित्र इंग्रजांची साहसी आणि वीर दर्यावर्दी म्हणून प्रतिमा दाखवणारं असल्यानेच इतकं लोकप्रिय झालं होतं !!

- दुष्यंत पाटील

#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#माझीशाळामाझीभाषा
#कारागिरी

संदर्भ :

🍁Sir John Everett Millais - by Baldry, A. L. (Alfred Lys), published in 1908

No comments:

Post a Comment