Saturday, February 15, 2020

पोकर खेळणारी कुत्री


मुशाफिरी कलाविश्वातली

पोकर खेळणारी कुत्री

काही कलाकृती समीक्षकांच्या पसंतीस उतरत नाहीत पण सामान्य लोक मात्र त्या उचलून धरतात. आज आपण एका अशाच चित्रमालिकेतील चित्रं पाहणार आहोत ती याच प्रकारात मोडणारी आहेत. गंमतीदार चित्रांची ही मालिका त्या काळच्या समीक्षक मंडळींना तितकीशी पसंत पडली नव्हती. अर्थातच या चित्रांचे विषयही फारसे गंभीर नव्हते. पण या मालिकेतली चित्रं आजही प्रचंड लोकप्रिय आहेत. ही चित्रं 'अभिजात कलाकृती' या प्रकारात मोडत नसली तरी आज शंभरपेक्षा वर्षांनंतरही त्यांची लोकप्रियता वादातीत आहे.

ही चित्रमालिका समजून घेण्यासाठी त्या काळातली परिस्थिती समजणं उपयोगी ठरेल. ही चित्रं आहेत अमेरिकन चित्रकार कुलीज याची. एका शेतकरी कुटुंबात त्याचा जन्म झालेला होता. कुलीजनं चित्रकलेचं फारसं शिक्षण घेतलं नव्हतं. उपजीविकेसाठी त्यानं बऱ्याच ठिकाणी हातपाय मारून बघितले. त्यानं औषधांच्या दुकानात काम करण्याचा प्रयत्न केला. बँक आणि वर्तमानपत्र काढण्याचाही त्यानं प्रयत्न केला. पण त्याची मूळ आवड कलेची होती. त्यानं न्यूयॉर्कसारख्या मोठ्या शहरात येऊन चित्रकलेत आपलं नशीब अजमावण्याचा प्रयत्न केला. हा काळ होता १८७० च्या दशकातला.

कुलीजला कलागुणांना वाव देणारी नोकरी मिळाली ती एका वर्तमानपत्रात. त्याचं काम होतं व्यंगचित्रं, अर्कचित्रं काढायचं. अर्कचित्रातला प्रसंग जिवंत करण्यात त्याचा हातखंडा होता. अर्कचित्रं रंगवणं ही त्याची खासियत होती. खरंतर अर्कचित्रं रंगवण्याचं त्यानं पेटंटही मिळवलं होतं. त्याच्या अर्कचित्रांमध्ये माणसांसारखेच हावभाव व्यक्त करणारे प्राणी दिसायचे. ते इतके जिवंत भासायचे की माणसं जत्रेमध्ये वेशभूषा बदलून प्राणांच्या वेशात येतात त्याची आठवण यायची.

या कुलीजला नंतरच्या काळात (१९०३) एका जाहिरात कंपनीत नोकरी मिळाली. ही कंपनी काहीतरी जाहिरात असणारी कॅलेंडर्स तयार करायची. सिगारची जाहिरात करणारं कॅलेंडर तयार करण्याचं काम या कंपनीला मिळालं आणि ते काम आलं कुलीजकडं. कुलीजनं यावर जे काही काम केलं त्यामुळं त्या कॅलेंडरमधली चित्रं अजरामर झाली !!

ह्या कॅलेंडरसाठी त्यानं काही चित्रं काढली. या चित्रांमध्ये हातात सिगार असणारी आणि चेहऱ्यावर माणसांसारखे हावभाव असणारी कुत्री दिसत होती. यातल्या बहुतांश चित्रांमध्ये पोकर (पत्त्यांचा एक खेळ) खेळणारी कुत्री दिसत असल्यानं ही चित्रमालिका 'पोकर खेळणारी कुत्री' या नावानं ओळखली जाते. या मालिकेत एकुण १८ चित्रं असली तरी त्यातल्या फक्त ११ चित्रांमध्ये पोकर खेळणारी कुत्री दिसतात.

टेबलवर मांडलेला पत्त्यांचा डाव, भोवती गंभीर चेहरे करून खेळ खेळणारी कुत्री, दारूच्या बाटल्या, ग्लास हे सारं त्यानं चित्रांमध्ये इतकं परिणामकारकरित्या दाखवलंय की ही कॅलेंडर्स अमेरिकेत प्रचंड लोकप्रिय होऊन अक्षरश: घरोघरी पोहोचली. ही सारी चित्रं खूप गंमतीदार वाटायची. नंतरच्या काळातही ही चित्रं लोकांच्या टी-शर्टवर, घरांमध्ये दिवाणखान्यात अशा वेगवेगळ्या ठिकाणी दिसू लागली.

या मालिकेतली दोन खूप लोकप्रिय असणारी चित्रं आपण पाहणार आहोत. यातलं पहिलं चित्र आहे 'कसोटीक्षणीचा मित्र' (A friend in need). यात टेबलभोवती बसलेली एकूण कुत्री पत्ते खेळताना दिसतात. यात समोर आणि बाजूला असणारी पाच कुत्री मोठी कुत्री आहेत. पाठमोरी बसलेली दोन कुत्री छोटी आहेत. साऱ्या  कुत्र्यांच्या चेहऱ्यावर कमालीचे गंभीर भाव आहेत. प्रत्येक कुत्र्याच्या समोर एक मद्याचा ग्लासही दिसतोय. सुंदर वातावरणनिर्मिती केल्याचं जाणवतं. यात पाठमोऱ्या बसलेल्या कुत्र्यांमध्ये चांगली मैत्री दिसते. यापैकी एक कुत्रा दुसऱ्याला पत्त्यातलं एक पान गुपचूपपणे कुणाच्याही लक्षात येणार नाही अशा पद्धतीनं देताना दिसतोय !! चित्रमालिकेतलं सर्वात जास्त लोकप्रिय ठरलेलं हे चित्र !!



सोबत दिलेल्या चित्रांतलं दुसरं चित्र आहे 'धाडसी थाप' (A bold bluff). यातला एक कुत्रा हातातल्या पत्त्यांवर एक धाडसी आणि खोटं वक्तव्य करतोय. पण त्याच्या चेहऱ्यावर गंभीर हावभाव आहेत. तो खोटं बोललेलं कुणाला समजलं तर त्याच्यावर डाव उलटू शकतो. पण आपल्या चेहऱ्यावर खोटं बोलत असल्याचा तो कसलाही हावभाव येऊ देत नाही. समोरची सारी कुत्री त्याच्या चेहऱ्यावरचे हावभाव बारकाईनं पाहताना दिसतात !!



इतकी लोकप्रिय ठरलेल्या चित्रमालिकेच्या या चित्रकाराच्या घरात मात्र या चित्रांचं खुप कौतुक नव्हतं. कारण त्याच्या बायकोला आणि मुलीला कुत्र्यांपेक्षा मांजरंच आवडायची !!

- दुष्यंत पाटील

#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#माझीशाळामाझीभाषा
#कारागिरी

संदर्भ :

🌹https://mymodernmet.com/dogs-playing-poker-painting/
🌹https://www.artsy.net/article/artsy-editorial-painting-dogs-playing-poker-endured-100-years
🌹https://www.mentalfloss.com/article/64108/15-things-you-should-know-about-dogs-playing-poker
🌹https://www.1st-art-gallery.com/Cassius-Marcellus-Coolidge/Dogs-Playing-Poker.html
🌹https://www.nytimes.com/2002/06/14/nyregion/artist-s-fame-is-fleeting-but-dog-poker-is-forever.html
🌹https://en.wikipedia.org/wiki/Cassius_Marcellus_Coolidge
🌹http://www.hellenicaworld.com/Art/Paintings/en/CassiusMarcellusCoolidge.html

🍁Image Credit:
🌹Cassius Marcellus Coolidge [Public domain]

No comments:

Post a Comment