Tuesday, October 30, 2018

ट्रॅजेडी ,कॉमेडी आणि डेव्हिड गॅरिक

ओळख कलाकृतींची

ट्रॅजेडी ,कॉमेडी आणि डेव्हिड गॅरिक

     डेव्हिड गॅरिक हा अठराव्या शतकातील इंग्लंडमधला एक प्रसिद्ध नाट्य-अभिनेता..खरं तर आपण त्याला नटसम्राट म्हणू शकू. अगदी सर्व प्रकारच्या भूमिका तो अगदी लीलया पेलायचा.अठराव्या शतकातल्या रंगभूमीवर त्यानं आपला कायमचा ठसा उमटवला.. भूमिका कशीही असो, डेव्हिड त्यात जीव ओतायचा.

      प्रसिद्ध इंग्रज चित्रकार 'जोशुआ रेनॉल्डस्' नावाच्या चित्रकारानं  ह्या गॅरिकचं एक चित्र काढलं. डेव्हिड विनोदी आणि गंभीर अशा दोन्ही उत्तम रित्या भूमिका पार पाडायचा..या चित्रकारानं गॅरिकला ओढताना दोन देवता दाखवल्या. प्राचीन ग्रीसमध्ये साहित्य, कला, विज्ञान यांच्या देवताना म्यूज म्हणतात. यापैकी एक 'थालीया' नावाची म्यूज आहे. ती 'कॉमेडी' (सुखात्मिका) आणि एका प्रकारच्या काव्याची देवता आहे. तर 'मेलपोमेन' नावाची एक म्यूज शोकांतिकेची देवता आहे.. रेनॉल्ड्सनं त्याला 'थालीया' आणि 'मेलपोमेन' या दोघींकडून ओढलं जाताना दाखवलंय..

      शोकांतिकेच्या देवतेनं ,मेलपोमेननं एका हातानं त्याला मनगटाला पकडलंय तर दुसरा हात वर करून ती त्याला काहीतरी सांगतेय.. तिचे कपडे निळ्या रंगाचे आहेत.. (तिचे हातावर असणारे कपडे, डोक्यावरचा पदर, शोक दर्शवतात.) चेहऱ्यावर गंभीर भाव आहेत तर पार्श्वभूमीला गडद रंगाची छटा आहे.त्याच्या कपड्याचा गडद भाग तिच्या बाजूलाच आहे. याउलट, दुसऱ्या बाजूला हसऱ्या चेहऱ्यानं 'थालीया' त्याला ओढत आहे.. थालीयाचे केस सोनेरी आहेत.. तिचे कपडे, तिची पार्श्वभूमी उजळ रंगाची आहे.

       गॅरीकच्या चेहऱ्यावरचे भाव फार सुचकरित्या प्रकट झाले आहेत.तो नट आहे , कलाकार आहे. त्यामुळे ट्रॅजेडी आणि कॉमेडी  दोन्हींमध्ये तो कुणालाही झुकते माप न देता समतोल साधण्याचा प्रयत्न करीत आहे.शोकांतिकेची देवता आणि सुखात्मिकेची देवता दोघीही त्याला ओढत आहेत.पण तो शोकांतिकेकडे बघून अतिशय उत्साहाने, आनंदाने बघतो आहे.म्हणजे एक नट कलाकार म्हणंन दोन्हींचा तो मेळ साधण्याचा प्रयत्न करीत आहे.




      रेनाॅल्ड्सच्या चित्रांपैकी या चित्राचा सर्वाधिक अभ्यास केला जातो.

- दुष्यंत पाटील

#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#माझीशाळामाझीभाषा
#कारागिरी

संदर्भ:


1 comment:

  1. चित्र सुंदर आहेच. पण विवेचनसुद्धा अगदी ओघवतं आणि सहज.

    ReplyDelete