Saturday, December 1, 2018

शवविच्छेदन करणारा कलाकार

कुतूहल कलाविश्वातलं

शवविच्छेदन करणारा कलाकार !!

इटलीतल्या फ्लोरेन्स शहरामधल्या एका इस्पितळात १५०७-०८ च्या दरम्यान एक कलाकार एक वृध्दाशी गप्पा मारत होता.. हा वृद्ध होता १०० वर्षांचा.. खरंतर अशक्तपणाशिवाय त्याला दुसरा काहीच त्रास होत नव्हता.. आणि हा वृद्ध कुठलाही त्रास न होता सहजपणे मृत्यू पावला.. कलाकाराला या वृद्धाचं शवविच्छेदन करून इतक्या छान प्रकारे आलेल्या मृत्यूचं कारण समजून घ्यायचं होतं.. आणि त्यानं वृद्धाच्या मृतदेहाचं शवविच्छेदन केलं सुद्धा.. ह्या कलाकारानं पूर्वीही शवविच्छेदनं  केली होती.. पण मानवी शरीराचा अभ्यास करण्याचं त्याचं पूर्वीपासूनच असणारं स्वप्न ह्या प्रसंगानंतर अजूनच बळकट झालं..

ह्या कलाकाराला पूर्वीपासूनच वाटायचं की एखाद्या चांगल्या चित्रकाराला चित्रामध्ये २ प्रमुख गोष्टी दाखवाव्या लागायच्या. एक म्हणजे मानवी शरीर आणि दुसरं म्हणजे त्याच्या अंतर्मनातले विचार.. त्याच्या मते यापैकी मानवी शरीर काढणं सोपं होतं पण अंतर्मनातले विचार दाखवणं मात्र कठीण.. त्याच्या मते अंतर्मनातले विचार हे इशाऱ्यांमधून आणि पायांच्या हालचालींमधून व्यक्त कराव्या लागायच्या.. हे इशारे आणि हालचाली अचूकपणे दाखवण्यासाठीच ह्या चित्रकारानं शरीररचनाशास्त्राचा गंभीरपणे अभ्यास सुरु केला होता.. यासाठीच त्यानं माणसांच्या आणि प्राण्यांच्या प्रेतांचं विच्छेदन करायला सुरुवात केली होती.. तो शवविच्छेदनाचं काम रात्रीच करायचा.. हे काम तो मेणबत्तीच्या प्रकाशात करायचा.. दुर्गंधाचा त्रास कमी करण्यासाठी तो तोंडाला आणि नाकाला कापड बांधायचा..

सुरुवातीला त्यानं शवविच्छेदनातून स्नायूंचा आणि सांगाड्याचा अभ्यास केला.. पण नंतर नंतर त्यानं शरीरातले आतले अवयव काम कसे करतात याचाही शोध घेण्याचा प्रयत्न केला.. मेंदू, हृदय आणि फुफ्फुसं यासारख्या आतल्या अवयवांचाही त्यानं अभ्यास केला.. ही त्यावेळच्या शास्त्रामधली खूपच मोठी कामगिरी होती.. स्नायूंच्या मागे लपलेले भाग दाखवताना तो तुटक रेषांचा वापर करायचा.. शरीराच्या भागांचं त्रिमितीय पद्धतीनं त्यानंच पहिल्यांदा चित्रण केलं.. तो जिवंत असताना त्यानं आपला हा शरीररचनाशास्त्राचा अभ्यास कधीही प्रकाशित केला नाही पण त्याच्या मृत्यूनंतर मात्र त्याचं हे काम वैद्यकीय शास्त्रात खूप मोलाचं ठरलं..

जन्मभरात त्यानं एकंदर ३० मानवी मृतदेहांचं शव विच्छेदन केलं.. १५१०-११ च्या हिवाळ्यात त्यानं एक शरीररचनाशास्त्राच्या प्राध्यापकासोबत ह्या विषयावर काम केलं.. त्यानं ह्या काळात शरीररचनाशास्त्रातल्या २४० आकृत्या काढल्या आणि जवळपास १३००० शब्दांमध्ये माहिती लिहिली.. मानवी शरीररचनेवर प्रकाश टाकणारी ही माहिती आहे.. पाठीच्या कण्याच्या रचनेची माहिती इतक्या अचूकपणे मांडणारा तो पहिलाच !! 


हाताचा अभ्यास


माणसाच्या आणि कुत्र्याच्या पायाची रचना 

अस्वलाच्या पायाची रचना 

हा कलाकार होता जगविख्यात प्रतिभावंत लिओनार्दो दा विंची !!

- दुष्यंत पाटील

#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#माझीशाळामाझीभाषा
#कारागिरी

संदर्भ:

http://www.bbc.com/culture/story/20130828-leonardo-da-vinci-the-anatomist

https://www.biography.com/people/leonardo-da-vinci-40396

https://www.britannica.com/biography/Leonardo-da-Vinci/Anatomical-studies-and-drawings

https://www.italian-renaissance-art.com/leonardo-drawings.html

No comments:

Post a Comment