Tuesday, March 5, 2019

सम्राट कनिष्क

ओळख कलाकृतींची 

सम्राट कनिष्क

'कुशाण' घराण्यातला एक महान सम्राट म्हणजे 'सम्राट कनिष्क'. आजच्या काळातलं उझबेकीस्तान, ताजिकीस्तान, पाकिस्तान, अफगाणिस्तान, चीनचा काही भाग आणि भारतातला उत्तर भाग या ठिकाणी त्याचं साम्राज्य पसरलं होतं. आपल्या कारकिर्दीत यानं बौद्धधर्माचा प्रचंड प्रसार केला. हा सम्राट कलेचा आश्रयदाता होता. त्याच्या साम्राज्याची राजधानी पुरुषपूर (आजच्या काळातलं पाकिस्तानातलं पेशावर) हे शहर होतं.

सोबतच्या चित्रात आपल्याला सम्राट कनिष्कचं एक व्यक्तिशिल्प दिसतंय. पहिल्या शतकाच्या उत्तरार्धात किंवा दुसऱ्या शतकाच्या पूर्वार्धात बनलेलं हे शिल्प मिळालं मथुरा इथं! दुर्दैवानं हे शिल्प तुटल्यामुळं त्याचं मस्तक आणि हात आज शिल्पमध्ये नाहीत. पण तरीही आपण खात्रीनं सांगू शकतो की हे शिल्प कनिष्कचंच आहे. याचं कारण म्हणजे यातल्या अंगरख्यावर ब्राह्मी लिपीमध्ये 'महाराजाधिराज कनिष्क' असं लिहिलंय. खरंतर कनिष्क राजाचंच अजून एक असंच शिल्प सापडलंय ज्यामध्ये कनिष्कला दाढी आणि डोक्यावर उंच टोपी आहे.


कनिष्कच्या एका हातात म्यानासहित तलवार आहे तर दुसऱ्या हातात धातूचं जड असणारं एक शस्त्र (इं. Mace) आहे. या शिल्पामध्ये कनिष्कचे पाय एकमेकांपासून दूर अशा काही प्रकारे दाखवले आहेत की जणु काही तो कुठंतरी उंच ठिकाणी उभा राहून आपल्या विस्तीर्ण साम्राज्याकडं पहात असावा. त्याची वस्त्रं (पायघोळ अंगरखा) आणि जाडजूड बूट हे त्याच्या मूळच्या वसतिस्थानाचं (म्हणजे मध्य आशियाचा पूर्व भाग) असावं असं मानण्यात येतं. हे कपडे मध्य आशियातल्या त्या काळच्या भटक्या लोकांच्या कपड्यांशी जास्त मिळतेजुळते आहेत.

नंतरच्या काळात बौद्ध धर्माचा कट्टर पुरस्कर्ता बनून बौद्ध धर्माचा प्रचार करणारा हा राजा या शिल्पात मात्र एका योद्ध्याप्रमाणं उभारलेला दिसतो.अशी ठासून उभा राहण्याची पध्दत तो राजपुरूष असल्याचं मनावर बिंबवते.

हे शिल्प तांबड्या वालुकाश्मात (pink sandstone) बनवलं असून त्याची उंची १.७० मीटर आहे. हे शिल्प सध्या मथुरेमधल्या एका प्राचीन वस्तूंच्या संग्रहालयात आहे.

- दुष्यंत पाटील

#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#माझीशाळामाझीभाषा
#कारागिरी

संदर्भ:
            
भारतीय कलेचा इतिहास - प्रा. जयप्रकाश जगताप
➤ Ancient Arts of Central Asia - Tamara Talbot Rice
➤ प्राचीन कलाभारती - म श्री माटे
➤ हिंदुस्थानचा सोपपत्तिक इतिहास - प्रा. राजाराम विनायक ओतूरकर

1 comment:

  1. कलेचा इतिहास रंजक करून मराठीतून सामान्यांपर्यंत पोहोचवण्याचे फार महत्त्वाचे काम आपण करीत आहात.खूप खूप धन्यवाद आणि शुभेच्छा!

    ReplyDelete