Saturday, March 23, 2019

गांधार कला - १


मुशाफिरी कलाविश्वातली

गांधार कला - १

भारतातल्या कलेच्या इतिहासातल्या अतिशय प्राचीन शैलींपैकी एक म्हणजे 'गांधार शैली.' गांधार शैली खऱ्या अर्थानं भरभराटीस आली ती इ.स.पू. पहिल्या शतकापासून ते इ.स. पाचव्या शतकापर्यंत.
या शैलीची खासियत म्हणजे यात झालेला भारतीय कलेचा आणि ग्रीक कलेचा मिलाफ. ग्रीक शैलीमध्ये बनवल्या गेलेल्या शिल्पाचे विषय पूर्णतः भारतीय (बौद्धधर्मीय) असल्याचे यात आपल्याला आढळून येतात. भगवान बुद्धांची पहिली प्रतिमा बनवली गेली ती या गांधार कलेमध्येच !! पौर्वात्य आणि पाश्चिमात्य कलांचा संगम असणारी अशी ही शैली विकसित होण्यामागच्या कारणांचा उलगडा आपल्याला गांधार प्रदेशाच्या इतिहासात (आणि भूगोलातसुद्धा) होतो. गांधार कला आणि गांधार शैलीतल्या कलाकृती जवळून पाहण्यापूर्वी आपण थोडासा गांधार प्रदेशाचा इतिहास पाहूया.

'गांधार' म्हणजे आजचं अफगाणिस्तानमधलं 'कंदाहार' असं मानलं जातं. गांधारचा उल्लेख आपल्याला थेट ऋग्वेदात मिळतो. गांधारमध्ये राहणाऱ्या लोकांचा 'गंधारी' असा उल्लेख ऋग्वेदात दिसतो. म्हणजे ‘गांधार’ प्रदेश ऋग्वेदासारखाच अतिप्राचीन आहे. ऋग्वेदाप्रमाणंच अथर्ववेद, पुराणं वगैरे ग्रंथांतही गांधारचा उल्लेख आहे. हे लोक सुवासी वनस्पती आणि मसाले यांचा व्यापार करायचे आणि सुवासिक वनस्पती स्वत:च्या अंगाला चोळायचे. म्हणूनच या लोकांचं नाव 'गंधारी' असं पडलं असं समजलं जातं !! 'गांधार'चा उल्लेख रामायण आणि महाभारतातही येतो. गांधारमधलं 'तक्षशिला' हे शहर भरतानं वसवल्याचा उल्लेख रामायणात येतो तर महाभारतातले गांधारचे शकुनी आणि गांधारी आपल्या सर्वांनाच परिचयाचे आहेत.

सोबत दिलेला इ.स.पू.सहाव्या शतकातला भारताचा नकाशा पहा. यातल्या सीमारेषा अर्थातच धूसर आहेत. आजच्या पाकिस्तानचा उत्तर-वायव्य भाग आणि अफगाणिस्तानचा पूर्व भाग मिळून हा 'गांधार' बनलेला यात दिसतो. 'तक्षशिला'आणि 'पुष्कलावती' ही शहरं या गांधारमध्ये आपल्याला दिसतात. या काळात भारतामध्ये १६ महाजनपदं होती. महाजनपद म्हणजे त्या काळच्या एखाद्या स्वतंत्र राज्यासारखं मानता येईल. या महाजनपदांपैकी भारतातलं सर्वात जास्त पश्चिमेला असणारं महाजनपद म्हणजे गांधार. या गांधारमधली महत्त्वाची तीन शहरं म्हणजे 'तक्षशिला, पुष्कलावती आणि पुरुषपूर (आजच्या काळातलं पाकिस्तानमधलं पेशावर). 'स्वात' आणि 'काबूल'या दोन मोठ्या नद्यांचा जिथं संगम होतो तिथं 'पुष्कलावती' हे शहर वसलं होतं. खरं तर अजूनही इथं ज्या ठिकाणी नद्यांचा संगम होतो तो भाग 'प्रांग' या नावानं ओळखला जातो आणि प्रांग हा शब्द संस्कृत प्रयाग (दोन नद्यांचा संगम होणारं पवित्र स्थान) या शब्दापासून आला असावा. स्थानिक लोक अजूनही या ठिकाणाला पवित्र ठिकाण मानतात.


Image credit:
Avantiputra7 [CC BY-SA 3.0 (https://creativecommons.org/licenses/by-sa/3.0)]
https://commons.wikimedia.org/wiki/File:Mahajanapadas_(c._500_BCE).png

इ.स.पू. सहाव्या शतकात या  'पुक्कूसती' नावाचा राजा राज्य करायचा. मगधमधल्या 'बिंबिसार' राजाचा हा समकालीन होता. ह्या शतकाच्या उत्तरार्धात गांधार देश इराणी (पर्शियन) साम्राज्यात सामील झालेला दिसतो. या काळात गांधार सागवानच्या वृक्षांसाठीही प्रसिद्ध असावं असं दिसतं. इराणचा सम्राट 'दरायस'(Darius) याचा राजवाडा बांधण्यासाठी गांधारमधून सागवान वृक्ष आणल्याचा उल्लेख आढळतो.

इ .स. पू चौथ्या शतकात सिकंदरानं गांधारवर आक्रमण केलं. या काळात गांधारच्या पूर्व भागावर 'अंभी' राजाचं राज्य होतं तर पश्चिम भागावर 'अस्तकराजा' राज्य करत होता. हे ग्रीक लोक खूप मोठ्या प्रमाणावर इथं वास्तव्य करून राहिले नाहीत पण भविष्यातल्या गांधार कलेच्या शैलीची मूळं आपल्याला इथंच सापडतात.

सिकंदर निघून गेल्यावर काही वर्षांतच हा प्रदेश चंद्रगुप्त मौर्यानं जिंकला. मौर्यांचं या प्रदेशावरचं राज्य सम्राट अशोकाच्या काळातही चालूच राहिलं. या काळात 'तक्षशिला' ही गांधारची राजधानी होती असं बौद्ध जातककथांवरून आणि त्या वेळच्या ग्रीक लिखाणावरून दिसतं. कित्येक शतकं कला आणि विज्ञान यांच्या शिक्षणासाठी प्रसिद्ध असणारं ऐतिहासिक विद्यापीठ इथं होतं.

इ. स. पूर्वीची २ शतके गांधारवर पुन्हा ग्रीक लोकांची सत्ता होती.डिमीट्रीयस नावाच्या राजापासून ही सुरुवात होते. ह्या काळाला यवन युग (hellinistic era) म्हणता येईल. हा डिमीट्रीयस आपल्याकडं धर्ममित या नावानं ओळखला जातो. या काळातला सर्वात महत्वाचा राजा म्हणजे मिनँडर (आपल्याकडं हा मिलिंद म्हणून ओळखला जातो.) ह्यानं बौद्ध धर्म स्वीकारला असं मानलं जातं. ज्ञात असणारी बुद्धांची पहिली प्रतिमा या मिलिंदच्याच काळात बनवली गेली असं मानलं जातं. या राज्यातच गांधार कला बहरायला सुरुवात झाली.

- दुष्यंत पाटील

#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#माझीशाळामाझीभाषा
#
कारागिरी


संदर्भ:

🍀 History and culture of ancient Gandhara and western Himalayas – B K Kaul deambi (Ajantha publishing house 1985)

🍀 Gandhara sculptures from Pakistan museums – Benjamin Rowland

🍀 Hellenism in Ancient India – Gauranga Nath Banerjee (BUTTERWORTH & Co. (INDIA), LTD 1920)


No comments:

Post a Comment