Saturday, October 13, 2018

स्वात खोऱ्यातलं दुर्गादेवीचं जुनं शिल्प

कुतूहल कलाविश्वातलं

स्वात खोऱ्यातलं दुर्गादेवीचं जुनं शिल्प

हे शिल्प आहे आठव्या शतकातलं. आजच्या पाकिस्तानातल्या स्वात खोऱ्यातलं. हे शिल्प पितळेचं आहे. या शिल्पात दुर्गेनं महिषासुराचा केलेला वध दाखवलाय. पण ह्या शिल्पात सर्वसाधारणपणे दुर्गेच्या शिल्पांमध्ये दाखवतात, त्यापेक्षा काही गोष्टी वेगळ्या प्रकारे दाखवल्या आहेत.

पुराणातल्या कथेप्रमाणं, दुर्गेशी झालेल्या लढाईमध्ये हा दैत्य आपलं रूप बदलत होता. रूप बदलता बदलता त्यानं म्हशीचं रूप घेतलं. दुर्गादेवीनं म्हशीचं शीर धडापासून वेगळं केलं. मग त्या प्राण्याच्या कापलेल्या गळ्यातून दैत्य बाहेर आला. यानंतर देवीनं त्रिशूळानं त्याचा वध केला.          

उत्तर भारतात सर्वसाधारणपणे महिषासुराचा वध करणारी दुर्गा उभी, आक्रमक पवित्र्यात असते. पण ह्या शिल्पामध्ये असणारी दुर्गा बसलेली आहे. दक्षिण भारतात मात्र बसलेल्या अवस्थेत महिषासुराला मारणारी दुर्गा दिसू शकते. सातव्या शतकात बनवल्या गेलेल्या तामिळनाडूमधील 'ममलपूरम्' इथल्या मंदिरातली दुर्गा हे बसलेल्या दुर्गेच्या शिल्पाचं पहिलं उदाहरण मानलं जातं. दक्षिण भारतातल्या चोला घराण्याच्या कारकिर्दीत शिल्पांमध्ये बसलेली दुर्गा दाखवणं दुर्मिळ नव्हतं. अशा वेळी दुर्गा चौकोनी आसनावर बसलेली असायची. या शिल्पातलं तिचा डावा पाय चौकोनी आसनावरून जमिनीवर ठेवणं आणि तिनं उजव्या पायानं म्हशीवर दाब देणं हे वैशिष्ट्य मात्र इतर कुठही बघायला मिळत नाही.

म्हशीचा गळा कापल्यावर त्यातून छोटासा दैत्य बाहेर पडताना दिसतोय. तर त्याला बाहेर काढण्यासाठी दुर्गा त्रिशूळानं म्हशीच्या पाठीवर वार करताना दिसतीये. तिच्या वरच्या हातात तलवार आहे. एका हातात पात्रही आहे. तिच्या उजव्या कानात वेटोळं असणारी काहीतरी वस्तू (बहुतेक साप) आहे तर डाव्या कानात फुलांचं आभूषण आहे. डोक्यावरचा किरीटासारखा दागिना, त्याचे डावीकडचे आणि उजवीकडचे भाग ही काश्मीरमधल्या दागिन्यांची खासियत आहे. कपाळावर तिसरा डोळा ठळकपणे दिसून येतोय. केसांची असणारी एकच वेणी हेदेखील या शिल्पाचं खास वैशिष्ट्य आहे. 



हे पितळेचं शिल्प इ.स. ७०० दरम्यान (आजच्या पाकिस्तानातल्या) स्वात खोऱ्यात बनवलं गेलं असं मानण्याचं अजून एक कारण म्हणजे त्याच काळातल्या बौद्धधर्मातल्या बुद्ध आणि तारा यांच्या त्याठिकाणी सापडलेल्या मूर्ती! दुर्गेच्या मूर्तीत आणि या मूर्त्यांमध्ये बरंचसं साम्य आहे. बुद्धांच्या आणि दुर्गेच्या चेहऱ्याची ठेवण बरीचशी सारखी आहे. दोन्ही मूर्त्यांमध्ये नाक मोठं आहे. ताराच्या आणि दुर्गेच्या शरीराच्या वरच्या भागाची ठेवण सारखीच आहे.

- दुष्यंत पाटील

#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#माझीशाळामाझीभाषा
#कारागिरी

संदर्भ :
Indian sculpture - volume 2 - Pratapaditya Pal
https://en.wikipedia.org/wiki/Mahishasura

No comments:

Post a Comment