Saturday, October 6, 2018

महिषासूराचा वध करणारी दुर्गादेवी

कुतूहल कलाविश्वातलं

महिषासूराचा वध करणारी दुर्गादेवी

हे वालूकाश्मातलं शिल्प आहे मूळचं राजस्थानातलं. सर्वसाधारण १० व्या शतकात हे शिल्प बनवलं गेलं. एखाद्या मंदिराच्या बाहेरच्या भिंतीवर बाहेरच्या बाजूला ठेवण्यासाठी हे शिल्प बनवलं असावं असं मानण्यात येतं. दुर्गादेवी आणि महिषासूर यांच्यामधली लढाई या शिल्पात दाखवण्यात आली आहे. देवीला ६ हात दाखवलेले आहेत. जाणकारांच्या मते तिच्या वेगवेगळ्या हातात दिसणार्‍या गोष्टी म्हणजे बाणांचा भाता (उजवा खालचा हात), धनुष्य (डावा मधला हात), तलवार (उजवा मधला हात), त्रिशूळ (उजवा वरचा हात), घंटा (डावा वरचा हात) आणि ढाल (डावा खालचा हात) अशा आहेत. तिचं वाहन असणारा सिंहदेखील लढण्यामध्ये सहभागी झालेला दिसतोय. दैत्य महिषासूर याच्याकडं तलवार हे एकमात्र शस्त्र आहे. 


शिल्पकारानं सुचवल्याप्रमाणं दुर्गादेवी आणि महिषासूर यांच्यात कसलीच बरोबरी नाही. अशा प्रकारच्या कलाकृतींमध्ये देवीला प्राणी आणि दैत्य यांच्यापेक्षा मोठं स्थान देण्यासाठी त्यांचा आकार मोठा दाखवण्यात येतो. त्यामुळं हे आकार प्रतीकात्मक असतात. दैत्य हल्ला चढवण्यासाठी तयार दिसतो, पण तोपर्यंत देवीचं वाहन असणार्‍या सिंहानं मागून म्हशीवर हल्ला केलेला दिसतो. दोन्हीही योद्ध्यांच्या चेहऱ्यावर शांत भाव दिसतात.    

या शिल्पात देवीची हालचाल, तिची गती जाणवते  तर दैत्य वळलेला दिसतो..

नस्ली हिरामानेक आणि त्याची बायको अॅलिस हे  दांपत्य आशियाई कलाकृतींच्या व्यापारात होते. (नस्ली मुळचा मुंबईत जन्मलेला पारशी-अमेरिकन, पण नंतर तो अमेरिकेत जाऊन स्थायिक झाला). त्यांच्याकडच्या संग्रहात हे शिल्प होतं.

- दुष्यंत पाटील
#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#माझीशाळामाझीभाषा
#कारागिरी

*संदर्भ :
Indian sculpture - volume 2 - Pratapaditya Pal
https://en.wikipedia.org/wiki/Mahishasura

No comments:

Post a Comment