Saturday, October 20, 2018

रॅलेचं बालपण

कुतूहल कलाविश्वातलं

रॅलेचं बालपण

    सोळाव्या शतकाच्या उत्तरार्धात इंग्लंडमध्ये एक कवी, लेखक आणि विद्वान असणारा साहसी दर्यावर्दी होऊन गेला. त्याचं नाव होतं वॉल्टर रॅले. एलिझाबेथ राणीच्या कारकिर्दीत त्यानं अमेरिकेच्या तीन सफरी केल्या.

     त्यानं अमेरिकेमध्ये इंग्रज लोकांच्या वसाहती बसवण्याचे  महत्वाचं काम केलं. पण एलिझाबेथ राणीनंतर गादीवर आलेल्या जेम्स राजाच्या हत्येच्या कटात तो पकडला गेला. त्यात त्याला मृत्युदंडाची शिक्षा झाली होती तरी नंतर त्यात बदल करून त्याला जन्मठेपेची शिक्षा मिळाली. काही वर्षांनी दक्षिण अमेरिकेमध्ये सोन्याचा शोध घेण्यासाठी त्याची मुक्तता करून त्याला सफरीवर पाठवण्यात आलं. पण त्यानं परस्परच तिकडं स्पेनच्या लोकांची जमीन बळकावली. राजा जेम्सनं त्याला परत इंग्लंडमध्ये आणून मूळची मृत्युदंडाची शिक्षा पुन्हा दिली. हा रॅले नंतर इंग्रज लोकांचा आवडता हिरो बनला. बीबीसीनं घेतलेल्या एका मतचाचणीप्रमाणं वॉल्टर रॅले हा इंग्रजांच्या इतिहासात सर्वात महान १०० शंभर इंग्रजांपैकी एक मानला जातो.

     एकोणिसाव्या शतकात होऊन गेलेल्या जॉन मिलैस नावाच्या एका विख्यात इंग्रज चित्रकारानं ह्या चित्रात त्याचं बालपण दाखवलंय. त्या काळात प्रकाशित झालेल्या रॅलेच्या एका चरित्राप्रमाणं रॅले लहानपणी खलाशी लोकांकडून समुद्रातल्या विस्मयकारक गोष्टी ऐकायचा. या गोष्टींमधूनच त्याला समुद्राविषयी आकर्षण वाटायला लागलं. चित्रकारानं या चित्रात रॅले आणि त्याचा भाऊ खलाशाकडून कथा ऐकताना दाखवलेत.



       खलाशी समुद्राकडं बोट दाखवतोय. छोट्या रॅलेनं डोळे विस्फारले आहेत. चित्रात डाव्या बाजूला एक खेळण्यातला जहाज दाखवलंय. भविष्यातील, रॅलेच्या समुद्रातल्या सफरींचे, ते प्रतीक आहे. उजव्या बाजूला एक जहाजाचा नांगर दिसतो. त्याचं टोक धारदार दाखवलंय. धारदार शस्त्रानं रॅलेचा शेवटी झालेला शिरच्छेद यातून सुचवलाय.

- दुष्यंत पाटील

#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#माझीशाळामाझीभाषा
#कारागिरी

संदर्भ:

https://www.tate.org.uk/art/artworks/millais-the-boyhood-of-raleigh-n01691

https://picturesinpowell.com/2013/06/29/the-boyhood-of-raleigh/

http://www.bbc.co.uk/history/historic_figures/raleigh_walter.shtml

https://www.history.com/topics/exploration/walter-raleigh

No comments:

Post a Comment