Tuesday, October 23, 2018

शहाणपणाचं रूपकचित्रण

ओळख कलाकृतींची

शहाणपणाचं रूपकचित्रण

प्राचीन ग्रीस मध्ये 'सेरॅपीस' नावाच्या एका देवतेसोबत कधी कधी एक विचित्र प्राणी दाखवला जायचा. या प्राण्याला ३ डोकी होती. यातलं एक लांडग्याचं, एक सिंहांचं तर एक कुत्र्याचं डोकं होतं. हा प्राणी 'काळ' दर्शवायचा. यातला लांडगा भूतकाळाचं प्रतीक होता जो आपली स्मरणशक्ती वेगवेगळ्या आठवणींनी फस्त करतो. भुकेला सिंह (काहीतरी करण्याची भूक असणारा) वर्तमानकाळ दर्शवतो. तर पुढच्या दिशेनं पळणारा कुत्रा भविष्यकाळ दर्शवतो.

१५५० मध्ये इटलीमध्ये 'कॅमिलो' नावाच्या विचारवंताचं एक पुस्तक प्रकाशित झालं. या पुस्तकात त्यानं मानवी स्मरणयंत्रणेची तुलना त्यानं ग्रीक नाट्यगृहाशी केली होती. त्यानं मांडलेल्या 'theatre of memory'या संकल्पनेत एका स्तंभावर त्यानं तीन तोंडांचा प्राणी दाखवला होता - ही तीन तोंडं होती लांडगा, सिंह आणि कुत्रा यांची. हे पुस्तक बऱ्यापैकी गाजलं होतं.

याच दशकात 'टिटीयान' नावाच्या एका सुप्रसिद्ध चित्रकारानं एक चित्र काढलं. ते चित्र आज 'शहाणपणाचं रूपकात्मक चित्रण' म्हणून ओळखलं जातं. या चित्रात त्यानं माणसाचे तीन वयातले चेहरे आणि तीन प्राण्यांची तोंडं दाखवली आहेत. चेहऱ्यांना जे रंग दिलेत तेही त्या त्या काळाला अनुसरून आहेत. भविष्यकाळासाठी अगदी लखलखीत उजळलेला चेहरा आहे. वर्तमानासाठी मध्यम थोडा उज्ज्वल ,थोडी सावळी झाक असलेला आणि भूतकाळ मात्र गडद सावळा,जो निघून गेलाय कधीच परत न येण्यासाठी; म्हणजे त्यामधील तेज नाहीसे झाले आहे.

एका अर्थानं या चित्रात त्यानं मानवी जीवनातल्या तीन अवस्था  दाखवल्या आहेत. चित्राचा दुसरा असाही अर्थ लावण्यात येतो की यातला डावीकडचा वृद्ध चेहरा मागं भूतकाळाकडं पाहतो, मधला पोक्त चेहरा आपल्याकडं वर्तमानकाळात पाहतो तर उजवीकडचा युवक चेहरा येणाऱ्या भविष्यकाळाकडं पाहतो.

      याशिवाय या चित्राला एक तिसरा (आणि महत्वाचा) अर्थ आहे. चित्राच्या वरच्या भागात चित्रकारानं लॅटीन भाषेत अस्पष्ट प्रकारे अशा अर्थाचं काहीतरी लिहिलंय:
'भूतकाळातल्या अनुभवांच्या आधारे (हे वृद्धाच्या डोक्यावर लिहिलंय)
आपण वर्तमानात शहाणपणानं वागतो (हे मधल्या चेहऱ्यावर लिहिलंय) अणि
भविष्यातल्या समस्या टाळतो (हे उजवीकडच्या चेहऱ्यावर लिहिलंय).'



     म्हणूनच या चित्राला 'शहाणपणाचं रुपकचित्रण' असं नाव पडलं.

- दुष्यंत पाटील

#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#माझीशाळामाझीभाषा
#कारागिरी

संदर्भ:
http://www.artinsociety.com/titian-prudence-and-the-three-headed-beast.html
https://en.wikipedia.org/wiki/Allegory_of_Prudence

3 comments: