Tuesday, October 16, 2018

न्यायदेवता


ओळख कलाकृतींची

न्यायदेवता

'जस्टिशिया' हे रोमन संस्कृतीमधील न्यायाला दिलेलं व्यक्तिरूप. हीच जस्टिशिया पुढं रोमन संस्कृतीमधली न्यायदेवता बनली. या न्यायदेवतेची नंतर मंदिरं बांधली जाऊ लागली. या न्यायदेवतेची दोन वैशिष्ट्यं होती - तिच्या एका हातात तराजू असायचा तर दुसर्‍या हातात तलवार असायची !!

यातली तराजूची कल्पना प्राचीन इजिप्तमधल्या संस्कृतीमधून आली होती. प्राचीन इजिप्तमध्ये तराजूचा आणि न्यायाचा असणारा संबंध आपण पूर्वीच्या एका पोस्टमध्ये (प्राचीन इजिप्तमधली कला - ४) पाहिलाय.

दुसर्‍या हातात असणारी तलवार न्यायदेवतेचा असणारा अधिकार दाखवत होती. न्यायाची अंतिमता आणि वेग तलवारीमुळं दिसून येत होता.

न्यायदेवतेच्या याच संकल्पनेवर सोळ्याव्या शतकात स्वित्झर्लंडमधल्या एका शहरात एक कारंजाचा भाग असणारा एक पुतळा उभा करण्यात आला. या पुतळ्यात न्यायदेवतेच्या एका हातात तराजू आणि दुसऱ्या हातात तलवार होती. परंतु याशिवाय अजून एक नवीन गोष्ट या पुतळ्यात दाखवण्यात आली होती - ती म्हणजे देवतेच्या डोळ्यावर असणारी पट्टी! ही डोळ्यावरची पट्टी कायद्यासमोर असणारी सर्वांची समानता दाखवत होती. या न्यायदेवतेच्या पायाशी सम्राट, पोप, सुलतान आणि नगरपालिकाप्रमुख अशी अधिकार असणारी मंडळी दाखवली होती. या सर्वांपेक्षा न्यायदेवतेचे असणारे श्रेष्ठ स्थान त्यातून स्पष्ट होत होते.




स्वित्झर्लंडच्या राष्ट्रीय महत्त्वाच्या सांस्कृतिक वारशांमध्ये या कारंजाचा समावेश होतो.

- दुष्यंत पाटील

#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#माझीशाळामाझीभाषा
#कारागिरी

संदर्भ:
https://berninside.ch/en/talesofthecity/mein-lieblingsbrunnen-der-gerechtigkeitsbrunnen-in-bern/

https://en.wikipedia.org/wiki/Gerechtigkeitsbrunnen_(Bern)

No comments:

Post a Comment