Monday, December 10, 2018

आनंदी कुटुंब

ओळख कलाकृतींची

आनंदी कुटुंब

सतराव्या शतकातला एक महान चित्रकार म्हणजे 'जॅन स्टीन'.तो बायबलमधली, तिकडच्या पुराणामधली, इतिहासातली, दैनंदिन जीवनामधली चित्रं काढायचा. त्यानं काढलेली दैनंदिन जीवनातली चित्रं लोकप्रिय झाली. बऱ्याचदा आपल्या चित्रांमधून तो काहीतरी संदेश द्यायचा. काही वेळेला त्या काळातल्या म्हणींशी संबंधित हे संदेश असायचे. असाच संदेश देणारं त्याचं एक गाजलेलं चित्र म्हणजे 'आनंदी कुटुंब'.

या चित्रात चित्रकारानं एका सामान्य घरातलं दृश्य दाखवलंय. चित्रात दिसणारी खोली नीटनेटकी नाहीये, त्यात आपल्या वेगवेगळ्या वस्तू पसरलेल्या दिसत आहेत. जमिनीवर चक्क अंड्याचं कवचही पडलेलं दिसतंय;पण ज्याप्रकारे सारे लोक आनंदी दिसत आहेत, त्याप्रकारे त्यांना नीटनेटकेपणा खूप महत्वाचा वाटत नसावा!

चित्रातले आजोबा एका हातात मद्याचा पेला तर दुसऱ्या हातात व्हायोलिन घेऊन मोठ्यानं गाताना दिसत आहेत. बाजूलाच आजी आणि मुलांची आई आनंदानं गाताना दिसत आहेत. खिडकीबाहेर एक मुलगा उजव्या हातात एक वाद्य घेऊन डाव्या हातानं, पाईपनं धूम्रपान करताना दिसतोय. चित्रात पुढच्या बाजूला बहीण आपल्या छोट्या भावाला जगमधली वाईन (मद्य) देताना दिसतीये. हे बहीणबाऊ उंचीच्या मानानं अधिक प्रौढ वाटतात. मागच्या बाजूला एक मुलगा बासरी तर एक बॅगपाईप वाजवताना दिसतोय. उजव्या बाजूला आपल्याला एक मुलगा आणि एक मुलगी धुम्रपान करताना दिसत आहेत. टेबलच्या पुढं एक कुत्रं टेबलवरचं काहीतरी पडेल या आशेनं वर पाहताना दिसतंय.

वरवर या चित्रात आनंदी कुटुंब दिसत असलं तरी या चित्रात एक संदेश देण्यात आलाय. चित्रातली महत्वाची गोष्ट म्हणजे भिंतीवर अडकवलेला कागद.
त्यावर जे काही लिहिलंय की त्याचं शब्दशः भाषांतर असं काहीतरी होतं: 'जसं मोठे लोक गातात, तसं मुलं पाईप ओढतात'.याचा अर्थ असा आहे की लहान मुलं मोठ्यांचं अनुकरण करतात. वाईट सवयी मुलं पटकन उचलतात. मोठ्या लोकांनी लहान मुलांसमोर काळजीपूर्वक वर्तन करायला हवं !!
      

हे चित्र सध्या अँमस्टरडॅममधल्या एका वस्तुसंग्रहालयात आहे.

- दुष्यंत पाटील

#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#माझीशाळामाझीभाषा
#कारागिरी

संदर्भ:

https://artsandculture.google.com/asset/the-merry-family/PgG66BfO4KGbiA

https://en.m.wikipedia.org/wiki/The_Happy_Family_%28painting%29?wprov=sfla1

https://www.tripimprover.com/blog/the-merry-family-by-jan-steen

No comments:

Post a Comment