Saturday, December 15, 2018

बीआटा बीट्राईस

कुतूहल कलाविश्वातलं

बीआटा बीट्राईस

मध्ययुगीन काळात इटलीमध्ये होऊन गेलेल्या 'डांट अलीघीएरी' नावाच्या कवीची एक साहित्यकृती आहे  'ला विटा नुओवा' (नवीन जीवन). यामध्ये खूप साऱ्या कवितांसोबत मध्ये मध्ये गद्यही आहे. कवीच्या स्वतःच्या जीवनावर आधारित असणारी प्रेमकथा यामध्ये बघायला मिळते. या साहित्यकृतीचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे त्याकाळात लिखाणासाठी वापरल्या जाणाऱ्या लॅटिन भाषेऐवजी त्यानं वापरलेली इटालियन भाषा. आपल्या प्रेमिकेच्या झालेल्या मृत्यूमुळं यातलं एक काव्य अपूर्ण आहे. नंतरच्या शतकांमध्ये या साहित्यकृतीनं बऱ्याच कलाकारांना साद घातली. त्याच्या प्रेमिकेचं नाव होतं 'बीट्राईस'.

या साहित्यकृतीचा प्रभाव असणारा एक इंग्रज चित्रकार होता रोझेटी. आपल्या चित्रांसाठी मॉडेल बनणाऱ्या आपल्या पत्नीवर याचं प्रचंड प्रेम होतं. लग्नानंतर त्याच्या पत्नीची प्रकृती बिघडत गेली आणि नंतर गर्भपातही झाला.. यानंतर ,मात्र त्याची पत्नी नैराश्यात बुडाली. तिला अफूसेवनाचं व्यसन लागलं.. आणि यामुळंच तिचा एके दिवशी मृत्यू झाला.. आपल्या पत्नीचा मृत्यू रोझेटीसाठी धक्कादायक होता.. तिचा मृतदेह कफनामध्ये ठेवताना त्यानं रचलेल्या बऱ्याचशा कविता तिच्या तांबूस केसांमध्ये बांधल्या..

अलीघीएरीच्या 'ला विटा नुओवा' (नवीन जीवन) या साहित्यकृतीतलं एक दृश्य रोझेटीनं नंतरच्या काळात काढलं. या चित्राचं नाव होतं 'बीआटा बीट्राईस'. या चित्रात त्यानं साहित्यकृतीतल्या नायिकेच्या मृत्यूक्षणीचं चित्रण केलंय. नायिकेच्या रूपात त्यानं आपल्या पत्नीला दाखवलंय. हे चित्र त्यात वापरलेल्या प्रतिकांमुळं अजरामर झालं..

चित्रामधली नायिका डोळे मिटून एक प्रकारे वर स्वर्गाकडं पाहतीये. चित्रात दिसणारा लाल रंगाचा पक्षी तिच्या मृत्यूचा संदेश घेऊन आलाय.. त्या पक्ष्यानं अफूच्या झाडाची फांदी पकडली आहे.. आणि ती नायिका तळहात वर करत त्याचा स्वीकार करताना दिसत आहे.. चित्रात मागच्या बाजूला उजवीकडं आपल्याला मूळ इटालियन साहित्यकार प्रतीकात्मक रूपानं दिसतोय तर डाव्या बाजूला प्रेमाची देवता दिसतीये.. हे चित्र वास्तववादी नसून आपल्याला काहीसं स्वप्नवत भासतं..


हे चित्र सध्या लंडन मधल्या "टेट ब्रिटन, नावाच्या सुप्रसिद्ध वस्तुसंग्रहालयात आहे.

*- दुष्यंत पाटील*

#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#माझीशाळामाझीभाषा
#कारागिरी

संदर्भ:

http://www.rossettiarchive.org/docs/s168.raw.html

https://www.tate.org.uk/art/artworks/rossetti-beata-beatrix-n01279

https://www.khanacademy.org/humanities/art-history/becoming-modern/victorian-art-architecture/modal/a/rossetti-beata-beatrix

https://en.wikipedia.org/wiki/Beata_Beatrix

No comments:

Post a Comment