Monday, December 24, 2018

अंध मुलगी

ओळख कलाकृतींची

अंध मुलगी

'जाॅन मिलैस' या चित्रकारानं १८५६ या साली काढलेलं हे चित्र. या चित्रात त्यानं इंद्रियांचे अनुभव चित्रित केले आहेत.

या चित्रात त्यानं दोन बहिणी दाखवल्या आहेत. या दोन्ही बहिणी भिकारी असल्याचं त्यांच्या फाटक्या कपड्यांवरून ओळखून येतं. मोठ्या बहिणीच्या  गळ्यातल्या पट्टीवर 'Pity the blind' (अंध मुलीवर दया दाखवा) असं लिहिलंय. दोघी रस्त्याच्या कडेला बसल्या आहेत. नुकताच पाऊस पडून गेल्याचं जाणवतंय. त्या दोघींच्या मागं पाण्याचा ओढा वाहताना दिसतोय. मागं आकाशात इंद्रधनुष्यही दिसत आहेत.

तांबडे केस असणारी थोरली बहीण अंध आहे. तिनं चेहरा सूर्यप्रकाशाच्या दिशेनं ठेवलाय. ती सूर्यप्रकाशातला उबदारपणा अनुभवताना आपल्याला दिसतीये. तिच्या कपड्यांवर बसलेलं सुंदर फुलपाखरू ती पाहू शकत नाही. पण तिच्याजवळ एक संगीतवाद्य दिसतंय. त्यावरून तिला संगीताचा कान असल्याचं दिसतंय. तिची छोटी बहीण तिचा हात हातात घेऊन तिला टेकून बसली आहे. सूर्यप्रकाशाची ऊब घेण्यापेक्षा ती इंद्रधनुष्याचं सौंदर्य न्याहाळत आहे. मोठ्या बहिणीच्या उजव्या हातात एक विशिष्ट गंध असणारं फूल आहे.

चित्रात मागच्या बाजूला गवताचं कुरण आहे. त्यात गुरं फिरताना दिसत आहेत. जवळच पक्षीही बसलेले दिसत आहेत. दूर टेकडीवर गावातली घरं आहेत.


अंध आणि दृष्टी असणाऱ्या दोन बहिणींचे भिन्न अनुभव या एकाच चित्रात परिणामकारकरित्या दाखवलेले असल्यानं हे चित्र  खूप गाजलं.

- दुष्यंत पाटील

#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#माझीशाळामाझीभाषा
#कारागिरी

संदर्भ:

https://www.ncbi.nlm.nih.gov/pmc/articles/PMC2586854/

https://en.m.wikipedia.org/wiki/The_Blind_Girl?wprov=sfla1

http://www.victorianweb.org/painting/millais/paintings/may3.html

No comments:

Post a Comment