Saturday, December 8, 2018

पाल लघुचित्रशैली

कुतूहल कलाविश्वातलं

पाल लघुचित्रशैली

भारतामध्ये ११-१२ व्या शतकात चित्रकलेच्या एका नवीन प्रकाराला सुरूवात झाली. हा प्रकार होता 'लघुचित्र शैली'!

या काळात बंगालमध्ये 'पाल' घराण्याचं राज्य चालू होतं. काही  बौद्ध धर्मातल्या हस्तलिखित ग्रंथांची निर्मिती याच काळात झाली. ह्या ग्रंथांमध्ये चित्रं होती. चित्रं असणाऱ्या हस्तलिखित ग्रंथांची हीच सुरूवात होती असं म्हणता येईल. हे ग्रंथ लिहिले गेले ते ताडपत्रांवर. त्यावरची चित्रं अगदीच छोट्या आकाराची होती. मुळातच ही ताडपत्रं लांबट पट्टीसारखी (आकार २२ इंच X २.५ इंच) असायची. त्यामुळं त्यावरची चित्रं अजूनच लहान, सर्वसाधारण २ X २ (किंवा २ X ३ इंच) इतक्याच आकाराची असायची. ग्रंथातली ताडपत्रं एकत्र आणि क्रमानं राहावीत म्हणून कडेला दोन भोकं पाडून ओवली जायची. ग्रंथाच्या खाली आणि वर अशा लाकडाच्या फळ्याही असत आणि त्यावरही चित्रं काढली जायची.   

पाल घराण्यातले राजे 'धर्मपाल' आणि 'देवपाल' यांच्या कारकिर्दीत या लघुचित्रशैलीचा उदय झाला. त्यामुळं ह्या चित्रशैलीला 'पाल शैली' असंही म्हणतात. याकाळातला प्रमुख चित्रकार म्हणजे 'धीमान' आणि त्याचा मुलगा 'वित्तपाल'. हे दोघंही शिल्पकार आणि चित्रकार होते. दोघांच्या शैलींमध्ये मात्र फरक होता.

हे ग्रंथ बनवण्याचं एक खास तंत्र होतं. ही ताडपत्रं एक महिनाभर पाण्यात ठेवून चालवली जायची. ताडपत्रांवर आधी टोकदार लेखणीनं अक्षरं लिहिली जात. लेखणीत शाई नसायची पण ताडपत्रांवरचा अक्षरं उमटलेला भाग थोडासा खाली दबला जायचा. यानंतर काळी शाई साऱ्या कागदावर फासली जायची आणि मग ती ओल्या फडक्यानं पुसली जायची. यात अक्षरं असणाऱ्या ठिकाणी मात्र शाई अडकून राहायची. काही ठिकाणी चित्रांसाठी जागा राखून ठेवलेली असायची. मग चित्रकार मंडळी त्या ठिकाणी चित्रं काढून रंगवायचे. चित्रांचा आकार लहान असल्यानं ह्या चित्रांना 'लघुचित्र' असंच म्हटलं जायचं.

याकाळचे ग्रंथ बौद्ध धर्मातले असल्यानं ही सारी लघुचित्रं बौद्ध धर्मातल्या गौतम बुध्दांच्या जीवनावर आधारित आहेत. या चित्रांचं वैशिष्ट्य म्हणजे त्यातल्या व्यक्तींचे अर्धवट मिटलेले डोळे, चेहऱ्यावरचे शांत भाव आणि बऱ्यापैकी टोकदार नाक. ही सारी चित्रं द्विमितीय आहेत. त्यात ठराविक रंग वापरले जायचे - पिवळा, खडूसारखा पांढरा, आकाशी निळा, काजळीचा काळा, कुंकवाचा लाल आणि निळ्या आणि पिवळ्याच्या मिश्रणानं होणारा हिरवा. 


सोबतच्या चित्रात आपल्याला बौद्ध धर्मातली देवी हिरवी तारा दिसतीये. तिच्या आजूबाजूला आपल्याला भक्त मंडळी दिसत आहेत. एका भुकेल्या मृत जीवाला ती बोटांनी मध देत आहे. खायला न मिळाल्यानं मृत जीवाचं पोट सुजलेलं आहे.

ही शैली काही काळच टिकली पण पुढच्या काळात तिबेट, नेपाळ ह्या ठिकाणी विकसित झालेल्या चित्रशैलीची ही एका अर्थानं सुरूवात होती.

- दुष्यंत पाटील
#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#माझीशाळामाझीभाषा
#कारागिरी
संदर्भ:

http://en.banglapedia.org/index.php?title=Pala_Painting

https://www.metmuseum.org/art/collection/search/74909

दृक कला - प्रा. सौ. सुचरिता एम. जाधव

भारतीय कलेचा इतिहास - प्रा. जयप्रकाश जगताप

No comments:

Post a Comment