Saturday, December 29, 2018

कोळशाची कांगडी घेतलेली वृध्द स्त्री

कुतूहल कलाविश्वातलं

कोळशाची कांगडी घेतलेली वृध्द स्त्री

'पीटर पाॅल रुबेन्स' या चित्रकाराचं हिप्पोपोटेमसच्या शिकारीचं चित्र आपण अलिकडंच पाहिलं. चित्रामध्ये नाट्यमयता दाखवणं ही त्याची खासियत होती. त्या काळामध्ये (सतराव्या शतकात)  बहुतेक सारी चित्रं धार्मिक विषयांवर/ग्रीक पुराणांमधील विषयावर अाधारित असायची; पण रूबेन्स बऱ्याचदा दैनंदिन जीवनाचं चित्रण परिणामकारकरित्या करायचा. चित्रातल्या प्रकाश आणि छाया/अंधार यांच्यातल्या विसंगतीचा तो  चित्रात नाट्यमयता आणण्यासाठी उत्तम प्रकारे वापर करायचा. याचं एक उदाहरण म्हणजे त्याचं चित्र- 'Old woman with a basket of coal'. हे चित्र १६१६ ते १६१८ च्या दरम्यान काढलं गेलंय.

या चित्रात रात्रीचं वातावरण दाखवलंय. चित्रात पार्श्वभूमीला सारा अंधार आहे. चित्रामध्ये मध्यभागी आपल्याला एका वृध्द स्त्रीनं एक कांगडी घेतलेली दिसतीये. या कांगडीमध्ये विस्तव आहेत. एकूणच थंडी असल्याचं जाणवत असून ही वृद्ध स्त्री विस्तवाची ऊब घेताना दिसतीये. तिच्या चेहऱ्यावर पडणाऱ्या प्रकाशाच्या छटा, चेहऱ्यावरच्या सुरकुत्या यांच्यामुळं एक खास परिणाम साधला गेला आहे. या वृध्द स्त्रीच्या बाजूलाच आपल्याला एक लहान मूल दिसतंय. गोल चेहरा, गोबरे गाल असणारं हे मूल टोपलीतले विस्तव काडीनं हलवताना दिसतंय. ते विस्तवावर फुंकर मारताना दिसतंय. चित्रामध्ये या मुलाच्या डाव्या बाजूला एक माणूस विस्तवाकडं बघत काहीतरी विचार करताना दिसतोय.

या चित्राचं एक वैशिष्ट्य म्हणजे तिघांच्या चेहऱ्यावर असणारे वेगवेगळे भाव. तिघेही विस्तवाकडं पाहताना आपापल्या विश्वात गढून गेले आहेत. वृध्द स्त्री ऊबेचा आनंद घेताना दिसतीये तर लहान मूल विस्तावर फुंकर मारण्यात गढून गेलेलं दिसतंय. चित्रातला डावीकडचा पुरूष मात्र कुठल्यातरी विचारात हरवल्यासारखा दिसतोय. या लोकांच्या चेहऱ्यावर विस्तवाचा प्रकाश आणि पार्श्वभूमीचा अंधार यातली विसंगती अप्रतिमरित्या दाखवली आहे. काहींच्या मते हे चित्र एक प्रकारे माणसाच्या जीवनातल्या बाल्यावस्था, तारूण्य आणि वृध्दत्व अशा तीन अवस्था चित्रित करतं. 


हे चित्र ९२० सेमी X ११६० सेमी आकाराचं आहे. ते सध्या ड्रेस्डन (जर्मनी) मधल्या एका वस्तुसंग्रहालयात आहे.

- दुष्यंत पाटील
#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#माझीशाळामाझीभाषा
#कारागिरी
संदर्भ:

https://artsandculture.google.com/asset/old-woman-with-a-basket-of-coal/xwF2xLyfFFUMmQ

https://www.wga.hu/html_m/r/rubens/61other/01basket.html

https://en.m.wikipedia.org/wiki/Peter_Paul_Rubens?wprov=sfla1

2 comments:

  1. आजींच्या चेहऱ्यावरची रेष अन रेष बबोलकी आहे .पण नातू शेगडी फुंकत असताना त्यांचे लक्ष वास्तविक नातवाकडे हवे .तसे दिसत नाहीत .

    ReplyDelete