Tuesday, December 4, 2018

अश्वपरीक्षण

अोळख कलाकृतींची

अश्वपरीक्षण

नैनसुख (१७१०-१७७८) हा १८ व्या शतकात भारतात होऊन गेलेला एक महत्वाचा चित्रकार. याची चित्रं पहाडी शैलीमध्ये मोडतात. आज त्याची जवळपास शंभर चित्रं भारतीय आणि पाश्चिमात्य वस्तुसंग्रहालयात ठेवलेली आहेत.

त्याचे वडील आणि थोरला भाऊ हे देखील चित्रकारच होते. त्याच्या भावानं वडिलांनी शिकवलेल्या पद्धतीचं नेहमी काटकोरपणे पालन केलं. नैनसुखनं मात्र मुघल शैलीमधल्या काही गोष्टी आत्मसात केल्या (उदा. इमारती, पुस्तकं यांचं वास्तववादी चित्रण, चित्रांमध्ये खोली (depth) दाखवणं) आणि हिंदू धार्मिक विषयांवरची चित्रं काढताना त्यांचा वापर केला. त्यामुळं अठराव्या शतकाच्या मध्यामध्ये पहाडी शैलीचा विकास झाला. नंतर नंतरच्या काळात तो स्वतः चित्रं काढण्याऐवजी आपल्या मुलांना/पुतण्यांना चित्रं काढायला सांगायचा.

या नैनसुखच्या चित्रकलेची काही खास वैशिष्ट्ये होती. त्याला बिनरंगाची किंवा फिकट रंगाची जमीन दाखवायला आवडायची. एखाद्या बारीक अशा आडव्या रेषेनं तो जमीन आणि पार्श्वभूमी वेगवेगळी करायचा. त्याच्या चित्रांमध्ये, बऱ्याचदा खूप सारी हिरवीगार झाडं असायची. झुडूपांची पानं तो काहीशी गोलाकार दाखवायचा. बऱ्याचदा त्याच्या चित्रामध्ये हुक्कादाणीही यायची. 

नैनसुख राजाकडं काम करायचा. त्याच्या चित्रांमध्ये राजाच्या दैनंदिन जीवनातले प्रसंग प्रतिबिंबित व्हायचे. असाच एक प्रसंग आपल्याला सोबतच्या चित्रात दिसतोय. हे चित्र आहे राजा ध्रुवदेव याचं. चित्रात डाव्या बाजूला आपल्याला संगमरवराच्या गच्चीवर राजा बसलेला दिसतोय. तो गच्चीवर बसून अश्वपरीक्षण करतोय. चित्राच्या उजव्या बाजूला अश्व आणि त्याला दाखवणारी मंडळी आहेत. उजवीकडच्या भागात आपल्याला बारीकसारीक तपशील जास्त दिसतात. राजाला तो अश्व जास्त स्पष्ट दिसण्यासाठी पार्श्वभूमीला पांढऱ्या रंगाचं कापड धरलेलं आहे. अश्वाच्या समोरच्या बाजूला असणाऱ्या पिवळा कुर्ता घातलेल्या माणसाच्या हातात वेसण आहे. 

 
या चित्राचा आकार लहान (१८.५ सेमी X २६ सेमी) आहे. हे चित्र सध्या लंडनमधल्या एका वस्तुसंग्रहालयात आहे.

- दुष्यंत पाटील

#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#माझीशाळामाझीभाषा
#कारागिरी

संदर्भ:

https://www.metmuseum.org/art/collection/search/76038

https://en.m.wikipedia.org/wiki/Nainsukh?wprov=sfla1

http://blog.artoflegendindia.com/2010/12/kangra-paintings-painting-art-of-kangra.html?m=1

http://kangraarts.org/kangra-paintings/

No comments:

Post a Comment