Saturday, December 22, 2018

कालीघाट शैली

कुतूहल कलाविश्वातलं

कालीघाट चित्रशैली

एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धातली गोष्ट. इंग्रजांच्या राज्याच्या या काळात बंगालमध्ये एक खास लोककला प्रसिद्ध होती. ह्या कलेचा भाग म्हणून खेडेगावातली कलाकार मंडळी घरी बनवलेल्या कागदावर चित्रं रंगवायची. हे कागद २० फूटापर्यंत लांब असायचे. ते 'पटचित्र' म्हणून ओळखले जायचे. या लांब पटचित्रातला प्रत्येक भाग पट म्हणून ओळखला जायचा आणि ह्या कलाकारांना लोक 'पाटुआ' म्हणायचे. ही चित्रं प्रामुख्यानं रामायण, महाभारत यातल्या प्रसंगावर आधारित असायची. त्यानंतर ही मंडळी गावोगाव ही चित्रांची गुंडाळी घेऊन फिरायची आणि रामायण-महाभारतातल्या प्रसंगावर आधारित गीतं गाऊन दाखवायची. मुख्यत्वे गावातल्या उत्सवांदरम्यान, जत्रेच्या वेळी हे कार्यक्रम चालायचे.

कालांतरानं इंग्रजांनी कलकत्ता कलामहाविद्यालय (Calcutta school of Art) सुरू केलं. या महाविद्यालयामुळं खूप सारे खेडेगावातले पारंपारिक 'पाटुआ' कलाकार शिक्षण घेण्यासाठी कलकत्त्याला येऊ लागले. ही कलाकार मंडळी कलकत्त्यातल्या कालीघाट इथं जायची. या कालीघाटावर धार्मिक विषयांवर काढलेल्या चित्रांना चांगलीच मागणी होती. गंमत म्हणजे कलकत्ता कला महाविद्यालयात शिकलेल्या नवनवीन तंत्रांचा वापर आता ही कलाकार मंडळी कालीघाटावर काढलेल्या चित्रांमध्ये वापरू लागली. हे लोक काही प्रयोग करू लागले आणि यातूनच *कालीघाट चित्रशैली* चा जन्म झाला. भारतीय आणि पाश्चिमात्य कलेचा यामध्ये संगम होता.

या चित्रांमध्ये सहसा देवदेवींची चित्रं दाखवली जातात. कालीमातेचं चित्र आपल्याला ह्या चित्रमालिकेत सर्वात जास्त प्रमाणात दिसून येतं. राधाकृष्ण, रामसीता यांचीही चित्रं यात असायची. नवरात्रीदरम्यान हे लोक दुर्गा, सरस्वती यांचीही चित्रं दिसायची. हे लोक धर्माशी कसलाही संबंध नसणारी देखील चित्रं काढायचे. स्वातंत्रलढ्याशी संबंधित असणारी अशीही चित्रंही यात असायची. चैतन्य महाप्रभू आणि त्यांचे शिष्य हेदेखील या चित्रांमध्ये दिसायचे. त्यावेळच्या समाजातल्या वाईट प्रवृत्तींवर बऱ्याचदा या चित्रांमधून टीका व्हायची. तत्कालीन समाजातल्या खळबळजनक घटनांवर आधारित अशीही चित्रं रंगवली जायची.

चित्रामधला साधेपणा, रेषांमधली लयबद्धता , ठसठशीत रंगांचा वापर ही या चित्रशैलीची खास वैशिष्ट्ये. ही चित्रं काढताना बऱ्याच वेळेला घरातली बरीच मंडळी सहभागी व्हायची. कुणीतरी चित्राचं रेखाटन करायचं, कुणीतरी त्यात छटा ठरवायचं, कुणीतरी रंग भरायचं. 

सुरूवातीच्या काळात चित्रात वापरले जाणारे रंग भारतीय पद्धतीनं नैसर्गिक पदार्थांचा वापर होऊन तयार व्हायचे. उदा. हळदीच्या मुळांपासून पिवळा रंग तयार व्हायचा, अपराजिता फुलांच्या पाकळ्यांपासून निळा रंग तयार व्हायचा. काजळीपासून काळा रंग बनवला जायचा. हे सर्व रंग टिकून राहावेत म्हणून त्यामध्ये डिंकही मिसळला जायचा. (बेलफळाचा डिंक काही वेळा वापरला जायचा.) ब्रशमध्ये बोकडाच्या शेपटीचे केस (किंवा खारीचे केस) वापरले जायचे. नंतरच्या काळात मात्र इंग्लंडमधून आयात झालेले स्वस्तात मिळणारे रंग वापरायला सुरूवात झाली.      

विसाव्या शतकाच्या सुरूवातीच्या काळात ह्या चित्रांची मागणी कमी होऊ लागली. चित्रांमधला तोचतोचपणा, साधेपणाचा अतिरेक आणि स्वस्तामध्ये मिळणारी छापील चित्रं यामुळं ही मागणी कमी झाली होती. बंगालच्या खेडेगावांमध्ये आज ही कला अस्तित्वापुरती शिल्लक आहे.

या शैलीमध्ये पूर्वीच्या काळी काढलेली चित्रं आज जगभरच्या वस्तुसंग्रहालयात उपलब्ध आहेत. यामध्ये लंडनमधल्या 'व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियम'चा विशेष उल्लेख करावा लागेल. इथं कालीघाट शैलीमधली तब्बल ६४५ चित्रं आहेत !! 

बालगणेशला घेतलेली पार्वती 

ह्या कलेचा भारतातल्या आधुनिक कलेवर मात्र चांगलाच प्रभाव पडला.

- दुष्यंत पाटील

#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#माझीशाळामाझीभाषा
#कारागिरी

संदर्भ:

http://chitrolekha.com/kalighat-paintings-review/

https://theculturetrip.com/asia/india/articles/a-brief-history-of-kalighat-paintings-in-kolkata-india/

मराठी विश्वकोश

https://en.m.wikipedia.org/wiki/Kalighat_painting?wprov=sfla1

No comments:

Post a Comment