Saturday, July 28, 2018

तुतानखामेनचा सोनेरी मुखवटा

कुतूहल कलाविश्वातलं

तुतानखामेनचा सोनेरी मुखवटा

तुतानखामेन हा प्राचीन इजिप्तमधला एक राजा.. जवळपास ३३-३४ शतकांपूर्वीचा.. याला फारसं आयुष्य लाभलं नाही.. वयाच्या अवघ्या १८ व्या वर्षी हा मरण पावला.. याच्या कबरीमध्ये याच्या मृत शरीराच्या चेहऱ्यावर एक सोनेरी मुखवटा मिळाला..( हा मुखवटा सध्या कैरोमधल्या वस्तुसंग्रहालयात आहे.)  प्राचीन इजिप्तमधल्या उत्खननात सापडलेल्या वस्तुंपैकी ही सर्वात प्रसिद्ध वस्तू.. याच्या कबरीचा शोध १९२२ मध्ये लागला.. शतकानुशतके ही कबर बंदच होती !!! त्यामुळं ही कबर इतकी सारी वर्षं जवळपास जशीच्या तशी होती.. या कबरीमध्ये अजूनही खूप काही गोष्टी मिळाल्या..

या सोनेरी मुखवट्यावर दु:खी पण शांत असे भाव आहेत.. हा मुखवटा कुशल कारागिरीचा एक उत्कृष्ट नमूना आहे.. मुखवट्याचं वजन १० किलो आहे.. सोन्याच्या प्लेटपासून हा बनवला आहे.. मुखवट्यावर दिसणार्‍या निळ्या पट्ट्या एक प्रकारच्या काचेपासून बनल्या आहेत.. भुवया आणि काजळ मात्र अफगाणिस्तानमधून नेलेल्या एका खास द्रव्यापासून बनल्या आहेत.. डोळे बनवताना एक प्रकारची काच वापरली आहे..

मुखवट्याच्या कपाळावर आपल्याला दोन देवी दिसतात. एकीचं डोकं गिधाडाचं आहे तर दुसरीचं नागाचं.. गिधाडाचं डोकं असणारी देवी इजिप्तच्या वरच्या भागात असायची तर नागाचं डोकं असणारी इजिप्तच्या खालच्या भागात.. तुतानखामेनचं इजिप्तच्या सर्व भागावर राज्य होतं असं या दोन देवींमुळं स्पष्ट होतं.
तुतानखामेनचे कान टोचलेले दिसतात.. त्याच्या लहानपणी, इजिप्तमधल्या इतर मुलांप्रमाणेच तोही कानामध्ये काहीतरी दागिना घालत असावा असं समजलं जातं.. तुतानखामेनची दाढी खोटी आहे..
शास्त्रज्ञांनी तुतानखामेनच्या ममीची डीएनए टेस्ट केली. त्याच्या ममीमध्ये मलेरियाच्या जीवाणूंचे पुरावे सापडले.. वयाच्या अवघ्या १८व्या वर्षी आलेल्या मृत्यूचं कारण समजलं..

एका संशोधनानुसार हा सोनेरी मुखवटा मुळात तुतानखामेनच्या आईसाठी बनवला गेला असावा असंही मानण्यात येतं..  

- दुष्यंत पाटील
#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#माझीशाळामाझीभाषा
#कारागिरी


संदर्भ:

http://www.timetrips.co.uk/ep-tutmask.htm
https://news.nationalgeographic.com/news/2010/02/100216-king-tut-malaria-bones-inbred-tutankhamun/
https://www.nytimes.com/2010/02/17/science/17tut.html
इंटरनेटवरील वेगवेगळ्या वेबसाईट्स





 

No comments:

Post a Comment