Saturday, July 28, 2018

अपयशी कलाकार

कुतुहल कलाविश्वातलं

अपयशी कलाकार

त्याला चित्रकलेची प्रचंड आवड होती.. खरंतर त्याला व्यावसायिक कलाकार बनायचं होतं..
व्हीएन्नामधल्या Academy of fine Arts मध्ये प्रवेश मिळवण्याचा त्यानं १९०७ आणि १९०८ मध्ये असा दोनदा प्रयत्न केला.. पण दोन्ही वेळा त्याच्या पदरी अपयश आलं..

परीक्षेचं स्वरुप असं काहीतरी होतं: पहिल्या परीक्षेत दिलेले बायबलमधले दोन प्रसंग रेखाटायचे होते.. तीन तीन तासांच्या २ टप्प्यांमध्ये ही रेखाटने पूर्ण करायची होती.. "खूप कमी चेहरे" असा एक प्रकारचा नकारात्मक शेरा परीक्षकांनी त्याच्या रेखाटनांवर मारला.. पण याचवेळी चित्रकलेऐवजी स्थापत्यशास्त्रात त्याला असणार्‍या गतीची मात्र परीक्षकांनी नोंद घेतली.. एका दयाळु परीक्षकाने त्याला School of Architecture मध्ये प्रवेश घ्यायला सांगितलं.. पण यासाठी ज्या शाळेतुन त्याला काढून टाकण्यात आलं होतं त्या शाळेत त्याला पुन्हा जायला लागणार होतं.. ते त्याला पसंत नव्हतं..

कलाविद्यालयात प्रवेश मिळाला नाही तरी आतली कलेची उर्मी त्याला स्वस्थ बसू देत नव्हती.. व्हिएन्नामधल्या जीवनाची चित्रं काढून (पोस्टकार्ड बनवून) विकण्याचा त्यानं बराच प्रयत्न केला.. एका मोठ्या शहरात जाऊन व्यावसायिक कलाकारांना भेटून आपल्याला कुणाकडं चित्रकला शिकता येईल का याची चाचपणी त्यानं चालूच ठेवली.. आपल्याला आयुष्य कलाकार म्हणून जगायचं आहे यात त्याला शंकाच नव्हती..

त्यानं व्हिएन्नामध्ये काढलेली काही चित्रं आज पाहायला मिळतात.. सोबत दिलेल्या त्याच्या ३ चित्रांपैकी १ व्हिएन्ना मधलं प्रसिद्ध ऑपेराहाउस आहे तर उरलेली २ वेगळ्या शहरातील वास्तुंची आहेत..
त्याच्या दुर्दैवानं तो चित्रकार झाला नाही.. खरंतर जगाच्या दुर्दैवानं तो चित्रकार झाला नाही असं म्हणावं लागेल.. तो सामान्य चित्रकार म्हणून जगला असता तरी आज जगाचा इतिहास वेगळाच झाला असता..
या अपयशी चित्रकाराचं नाव होतं अॅडॉल्फ हिटलर !!

- दुष्यंत पाटील

#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#माझीशाळामाझीभाषा
#कारागिरी


संदर्भ:
इंटरनेटवरील वेगवेगळ्या वेबसाईट्स







 
 

No comments:

Post a Comment