Saturday, July 28, 2018

इझाबेला

ओळख कलाकृतींची

इझाबेला

सर्वसाधारणपणे दोनशे वर्षांपूर्वी एक प्रसिद्ध इंग्रज कवी जॉन कीट्स यानं रचलेल्या एका कवितेचं कथानक अगदी थोडक्यात असं होतं:

फ्लोरेन्स नावाच्या शहरात ही गोष्ट घडते. एका श्रीमंत व्यापार्‍याची मुलगी इझाबेला त्यांच्याच कुटुंबात नोकरी करणार्‍या लोरेंझो नावाच्या तरुणाच्या प्रेमात पडते. तिला "चांगलं" स्थळ मिळावं अशी तिच्या भावांची  इच्छा असते. घराची/कुटुंबाची प्रतिष्ठा त्यांना अर्थातच महत्वाची असते. लोरेंझोसोबतच्या तिच्या प्रेमाची कल्पना भावांना आल्यानंतर ते लोरेंझोचा खून करतात आणि त्याचं प्रेत जंगलात पुरतात. यानंतर लोरेंझो तिच्या स्वप्नात येतो आणि तिला घडलेलं सर्वकाही सांगतो. लोरेंझोचं भूत तिला जंगलातला रस्ता दाखवते. ती जंगलात जाऊन जमीन खोदून त्याचं प्रेत पाहते. त्याचं (म्हणजे प्रेताचं) मस्तक कापते आणि ते आपल्याजवळच्या एका प्रकारच्या कुन्डीत पुरते, त्यात एक रोपते लावते. सतत त्या रोपट्याजवळ ती रडत असते. तिच्या अश्रूंनी रोपट्याची वाढ होते.. आता तिच्या भावांना शंका येते.. ते ती कुंडी चोरून नेतात. आत काय आहे ते बघताना त्यांना लॉरेंझोचं सडणारं डोकं सापडतं.. ते घाबरून फ्लोरेन्स सोडून पळुन  जातात.. आणि आपला प्रियकर आणि ती कुंडी दोन्हीही गमावलेली इझाबेला वेडी होते आणि शेवटी मरुन जाते..
हे सारं कथानक १४व्या शतकातल्या इटालियन भाषेतल्या 'डेकामेरॉन' नावाच्या एक प्रकारच्या कथासंग्रहातल्या कथेवर आधारित आहे. (डेकामेरॉनमध्ये वेगवेगळ्या छटा असणार्‍या खूप सार्‍या प्रेमकथा आहेत)

विल्यम हंट ह्या चित्रकारला ही कविता तशी आधीपासूनच साद घालत होती.. पण लग्न झाल्यानंतर तो इटलीमध्ये गेल्यानंतर त्यानं गांभीर्यानं या चित्राचा विचार सुरू केला. तिथं त्याच्या पत्नीचा प्रसुतीनंतर मृत्यू झाला.. यानंतर (१८६८) विल्यमनं तिच्या स्मृतिमध्ये इझाबेलाचं चित्र काढलं.. यातली इझाबेला त्यानं आपल्या पत्नीसारखी दाखवली..

मिलैस नावाच्या दुसऱ्या एका चित्रकारानं काढलेल्या 'लोरेंझो आणि इझाबेला' नावाच्या चित्रात (१८५०च्या आसपास) आपल्याला काही गोष्टी प्रतिकांमध्ये दिसतात. इझाबेलाचा भाऊ एक प्रकारे लाथ मारताना दिसतो. तर लोरेंझो इझाबेलाला कापलेली मोसंबीची फोड असं काही देतो की जणू काही आपलं कापलेलं मस्तक !!

- दुष्यंत पाटील

#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#माझीशाळामाझीभाषा
#कारागिरी


संदर्भ:

इंटरनेटवरील वेगवेगळ्या वेबसाईट्स



 

No comments:

Post a Comment