Saturday, July 28, 2018

इव्हान दि टेरिबल आणि त्याचा मुलगा

ओळख कलाकृतींची

इव्हान दि टेरिबल आणि त्याचा मुलगा

सोळाव्या शतकात रशियामध्ये एक राजा (झार) होऊन गेला.. त्याचं नाव इव्हान.. खरंतर हा 'इव्हान दि टेरिबल' म्हणजे 'भयानक इव्हान' या नावानं ओळखला जातो.. सारी सत्ता एकट्याच्या हाती घेणं, दहशत बसवणं, नुसत्या संशयावरून विरोधकांना संपवणं, कत्तल करणं या सार्‍या गोष्टींमुळे तो इव्हान दि टेरिबल म्हणून ओळखला जातो.. याच्या कारकीर्दिमध्ये रशियाच्या सीमा वाढल्या.. आयुष्यातल्या काही प्रसंगांनी याचं व्यक्तिमत्त्वंच बदलून गेलं.. त्याची पहिली बायको विषप्रयोगानं वारली असा संशय होता.. या घटनेचा इव्हानच्या व्यक्तिमत्वावर खूप परिणाम झाला असं मानण्यात येतं.. इव्हानचं मानसिक स्वास्थ्य म्हातारपणी अजुनच बिघडत गेलं..

ह्या इव्हानच्या मुलाचं नावही इव्हानच होतं.. या मुलाची बायको (येलेना) गर्भवती असताना म्हाताऱ्या इव्हाननं आपल्या सुनेला परिधान केलेला पोशाख नीट नाही या कारणासाठी चोप दिला.. येलेना किंचाळू लागली.. येलेनाचा नवरा आला.. त्याचं वडिलांशी भांडण झालं.. "तुमच्या मारहाणीमुळं तिच्या पोटातील मुलाचा मृत्यू होईल" असं तो वैतागून म्हणाला.. आणि कालांतरानं ते खरं झालं.. येलेनाचा गर्भपात झाला.. यानंतर मुलाचं वडिलांशी कडाक्याचं भांडण झालं.. वडिलांनी (म्हणजे इव्हान दि टेरिबलनं) आपल्या मुलावर वार केला.. मुलगा इव्हान बेशुद्ध पडला.. इव्हान दि टेरिबलला आपली चुक लगेच लक्षात आली.. त्यानं आपल्या मुलाला जवळ घेतलं.. पण आता खूपच उशीर झाला होता.. मुलगा पुढचे काही दिवस बेशुद्धावस्थेताच राहिला.. याकाळात इव्हान दि टेरिबलनं चमत्कार घडून मुलाचा प्राण वाचण्यासाठी खूप प्रार्थना केली.. पण मुलाचा मृत्यू झाला..

रशियन चित्रकार रेपीन यानं काढलेलं 'इव्हान दि टेरिबल आणि त्याचा मुलगा इव्हान' हे चित्र रशियामधल्या सर्वात जास्त प्रसिद्ध असणार्‍या चित्रांपैकी एक मानण्यात येतं.. या चित्रात इव्हान दि टेरिबलनं आपल्या मुलावर वार केल्यानंतर जखमी मुलाला जवळ घेतलेलं दिसतं.. बारीकसारीक तपशील आणि चेहऱ्यावरचे हावभाव सुंदरपणे दाखवण्यात आलेले आहेत.. दुसऱ्या चित्रात मुलगा  मृत्यूशय्येवर पडलेला असताना इव्हान दि टेरिबल बाजूला बसलेला दिसतो.. हे चित्र श्वार्झ यांनी काढलेलं आहे..

- दुष्यंत पाटील

#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान*
#माझीशाळामाझीभाषा*
#कारागिरी*


संदर्भ:

इंटरनेटवरील वेगवेगळ्या वेबसाईट्स



No comments:

Post a Comment