Friday, July 27, 2018

दि मीटिंग

ओळख कलाकृतींची

दि मीटिंग

मेरी बॅश्किर्तसेफ हिला अवघं २४ वर्षांचं आयुष्य मिळालं.. तिच्या वाट्याला संघर्षच जास्त प्रमाणात आला.. खरंतर आपल्या छोट्याशा आयुष्यात  तिनं आधी संगीताचं (गायनाचं) शिक्षण घेतलं होतं, पण एका आजारानं तिचा आवाज बिघडून गेला.. पण कलाकार बनण्याचा निश्चय असल्यानं तिनं मग चित्रकलेचं शिक्षण घेतलं.. चित्रकलेत ती चांगली चमकली..  तिची बरीचशी चित्रं पुढं दुसऱ्या महायुद्धात नाझी लोकांनी उद्ध्वस्त केली असली तरी जवळपास ६० चित्रं अजूनही उपलब्ध आहेत.. तिला दैनंदिनी लिहायची सवय होती आणि नंतर ती स्वत:च्या दैनंदिनीमुळं सर्वांच्या कायमची लक्षात राहिली...

३ एप्रिल १८८३ रोजी ती आपल्या दैनंदिनीत असं काहीतरी लिहिते -  "बाहेर वातावरण सुंदर आहे.. मला एक शक्ती जाणवत आहे.. काहीतरी छान असं निर्माण करण्याची ताकत माझ्यात आहे असं मला जाणवतंय.. जे काही मला खरोखर भावेल ते कॅनव्हासवर उतरण्याची क्षमता माझ्यात आहे असं मला जाणवतंय.. पूर्वीपेक्षा तिप्पट काम करण्याची क्षमता देणारं बळ, आत्मविश्वास मला माझ्यात जाणवतोय.. उद्या मला जे काही भावेल त्याचं चित्र मी काढेन.."

 4 एप्रिल १८८३ रोजी ती लिहिते  - "सहा लहान मुलं एका गटामध्ये जवळ जवळ उभी आहेत.. सर्वात मोठा १२ वर्षांचा आहे तर सर्वात लहान ६ वर्षांचा आहे.. सर्वात मोठा असणारा मुलगा काहीसा पाठमोरा उभा आहे आणि त्यानं हातामध्ये पक्ष्याचं घरटं धरलं आहे.. बाकीची मुलं वेगवेगळ्या आणि अकृत्रिम नजरेनं न्याहाळत आहेत..
हे वर्णन अगदी सामान्य वाटेल, पण प्रत्यक्षात या सर्वांचा एकत्र गट एक खूप रोचक चित्र बनू शकेल.."
मेरीच्या 'दि मीटिंग' या चित्राची अशी निर्मिती झाली.. हे चित्र १८८४ मध्ये प्रदर्शित झाल्या झाल्या साऱ्या युरोपमध्ये गाजलं..

पॅरिसच्या रस्त्यांवर तिनं जे काही पाहिलं ते सारं नेहमीच तिच्या चित्रांसाठी प्रेरणा बनलं..

- दुष्यंत पाटील

#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#माझीशाळामाझीभाषा
#कारागिरी


संदर्भ:

१. Famous Paintings - G. K. Chesterton (प्रकाशन वर्ष १९१३)
२. Marie Bashkirtseff - the journal of a young artist  (प्रकाशन वर्ष १८८९)




 

No comments:

Post a Comment