Friday, July 27, 2018

प्राचीन इजिप्तमधली कला - ३

कुतूहल कलाविश्वातलं

प्राचीन इजिप्तमधली कला - ३

प्राचीन इजिप्तमध्ये छोटी छोटी राज्य होती.. या राज्यांना प्रमुख प्रशासक असायचे.. राज्याचा सारा कारभार ही प्रशासक मंडळी बघायची.. या मंडळींना बरेचशे अधिकार होते.. आपण जवळपास ४००० वर्षांपूर्वी होऊन गेलेल्या एका प्रशासकाची माहिती घेऊ.. मग त्याच्या थडग्याला भेट देऊ.. आणि त्यानंतर त्याच्या थडग्यातील २-३ चित्रे पाहू..

जवळपास ४००० वर्षांपूर्वी होऊन गेलेल्या या प्रशासकाची नाव नुमोटेप - २ .. हा माणूस 'पूर्व वाळवंटाचा प्रशासक','(इजिप्तच्या) राजाचा घनिष्ट मित्र', 'होरसचा (प्राचीन इजिप्त मधली एक देवता) धर्मगुरू','अनुबिसचा धर्मगुरू','धर्मगुरूंचा अधीक्षक','दैवी गुपितांचा प्रमुख' आणि महत्वाचं म्हणजे 'ट्युनिक्सचा (म्हणजे त्याकाळची एक प्रकारची वस्त्रं)  मालक'  (master of tunics) अशा बिरुदांनी ओळखला जायचा.. तो होरस (किंवा अनुबिस) देवतेचा धर्मगुरू होता याचा अर्थ होरस (किंवा अनुबिस) या देवतेचं पृथ्वीवरील वास्तव्य चालू राहावं, सारे लोक सुखामध्ये राहावेत म्हणून होरस देवतेच्या मंदिरात पूजाअर्चा, धार्मिक विधी करण्याचे अधिकार त्याच्याकडे होते.. त्याच्या साऱ्या बिरुदांमधूनच आपल्याला त्याच्याविषयी माहिती मिळते..
वैयक्तिक आयुष्यामध्ये त्याला दोन बायका होत्या.. यापैकी पहिली राजघराण्यातून आली होती.. तिलाही बरीचशी बिरुदं होती..  ती देखील देवतांची (आनंद, संगीत, स्त्रीचं प्रेम, मातृत्व यांची एक देवी आणि युद्धाची देवी अशा 2 देवींची) धर्मगुरू होती.. राजकीय सोय लक्षात घेऊन त्यानं हिच्याशी लग्न केलं असावं असं मानण्यात येतं.. दुसऱ्या बायकोलाही बिरुदं होती पण ती साध्या प्रकारची होती.. दुसरी बायको त्याचं खरं प्रेम असावं असं मानतात..

इजिप्तमध्ये बेनी हसन या ठिकाणी या नुमोटेपचं थडगं आहे.. आपण या थडग्याला आधी भेट देऊया.. या व्हिडीओमध्ये ३७ व्या सेकंदापासून ४७ व्या सेकंदापर्यंत एक भिंत दाखवली आहे.. त्या भिंतीवरची चित्रं आपण जवळून बघणार आहोत.. हीच चित्रं  ०२:०१ ते ०२:३४ या दरम्यान जवळून बघायला मिळतात..



हा नुमोटेप (शिकारीतला) पाठलाग करण्याच्या देवीचा भक्त म्हणूनही ओळखला जायचा..
डावीकडच्या चित्रात आपल्याला नुमोटेप शिकार करताना दिसतोय. सोबत नौकेमध्ये त्याची बायको आणि मुलगाही आहे. शिकार  केलेले पक्षी त्याच्या डाव्या हातात दिसतात.  उजव्या हातात पक्ष्यांना  फेकून मारण्याचं एक हत्यार आहे.  याच चित्रात खालच्या बाजूला  आपल्याला कोळी लोक मासे पकडताना दिसतात.
मुख्यद्वाराच्या वर असणाऱ्या चित्रात आपल्याला नुमोटेप पुन्हा पक्ष्यांना जाळ्यात अडकवताना दिसतोय. तो लपून बसलाय पण जाळ्याची दोरी त्याच्या हातात  आहे. या चित्रात आपल्याला त्या काळात वापरात असणारं जाळं बघायला मिळतं.

उजवीकडच्या चित्रात आपल्याला नुमोटेप माशाची शिकार करताना दिसतोय. त्याच्या हातात भाल्यासारखी एक काठी असून त्याला पुढच्या बाजूला दोन टोके आहेत. या चित्राच्या खालच्या बाजूला एक चित्र आहे त्यामध्ये मासे पकडताना पडलेल्या कोळ्याला इतर कोळी वाचवताना दिसत आहेत.

- दुष्यंत पाटील

#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#माझीशाळामाझीभाषा
#कारागिरी


संदर्भ:

1) Archaeological survey of Egypt - Percy Newberry (प्रकाशनवर्ष: १८९३)
2) The Story of Art – E. H. Gombrich (प्रकाशनवर्ष: १९५०)






 

No comments:

Post a Comment