Saturday, July 28, 2018

चार ऋतु आणि चार तत्वे

ओळख कलाकृतींची

चार ऋतु आणि चार तत्वे

गिऊस्पी अर्किम्बोल्डो या कलाकाराचा जन्म १५२७ मध्ये इटलीमधल्या मिलान या ठिकाणी झाला. त्याचे वडील बीयुजीओ हे एक सामान्य चित्रकार होते. १५६२ पर्यंत अर्किम्बोल्डोनं बरीचशी कलेशी संबंधीत छोटीमोठी कामं केली. पण १५६२ मध्ये त्याचं नशिब पालटलं. त्याच्यासमोर एक खास प्रस्ताव आला - व्हिएन्नामधल्या नोकरीचा.

व्हिएन्नाच्या दरबारामध्ये त्याला एक (पोर्ट्रेट काढणारा) चित्रकार म्हणून नोकरी मिळाली. याकाळात मिलानमध्ये असणारा धर्मगुरू बराच कडक होता. त्यानं कलाकारांवर बरीचशी बंधनं आणली होती. कलाकारांच्या सर्जनशीलतेच्या दृष्टीनं ही फारशी चांगली गोष्ट नव्हती. त्यामुळं नव्या  नोकरीचा प्रस्ताव स्विकारुन तो व्हिएन्नाला गेला. व्हिएन्नामध्ये प्रबोधन काळातील वेगळंच वारं वाहत होतं. तिथं त्याला आघाडीचे खगोलतज्ञ, वनस्पतीतज्ञ, वैद्य मंडळी, किमायागार असे प्रज्ञावंत लोक भेटले. ह्या सगळ्यांची त्याच्यावर एक प्रकारची जादू झाली.. त्याच्यातली सर्जनशीलता फुलू लागली.. डोक्यात सुपीक कल्पना येऊ लागल्या.. पोर्ट्रेट चित्रकार ह्या कामशिवाय तो आता कपड्यांचं डिझाईनसुद्धा करू लागला.. एका प्रसंगी तर त्यानं घोड्याभोवती गुंडाळायच्या कापडामध्येही सर्जनशीलता दाखवत एक वेगळेच (त्रिमुखी ड्रॅगन असणारे) डिझाईन केले.. नंतर नंतरच्या काळात तो सर्वत्र लोकप्रिय होत गेला..

त्याच्या दोन चित्रमालिकांसाठी तो कायमचा प्रसिद्ध झाला.. ह्या चित्रमालिकांमधुन आपल्याला त्याच्या सर्जनशीलतेची कल्पना येते.. एक आहे "चार ऋतू" आणि दुसरी मालिका म्हणजे "चार तत्वे".. यापैकी पहिल्या मालिकेत त्यानं वेगवेगळ्या फळांपासुन, फुलांपासून बनलेले चार चेहरे काढले.. ते चार ऋतू दर्शवतात - वसंत, ग्रीष्म, हेमंत आणि शिशिर.. आणि आपल्या पंचमहाभूतांसारखी तिकडं असणारी चार तत्वं म्हणजे हवा, पाणी, पृथ्वी आणि अग्नी.. त्यानं प्राण्यांच्या, पक्ष्यांच्या चित्रांचा वापर  करत चार तत्वे रंगवली.. (अग्नीमध्ये आगीशी संबंधीत वस्तु, पृथ्वीमध्ये पृथ्वीवरचे प्राणी, हवामध्ये हवेत उडणारे पक्षी तर जलमध्ये जलचर प्राणी दिसतात.) त्याचा प्राणी आणि वनस्पतींचा अभ्यास चांगला होता.. उदा. पाणी या चित्रात त्यानं वेगवेगळे ६२ प्रकारचे जलचर वापरले आहेत.. तर वसंत मध्ये ८० जातीच्या वनस्पतींचं ज्ञान वापरलं आहे.. ही चित्रं झूम करून पहा.
आपण ही चित्रं थोडीशी जवळून पाहुया..

 - दुष्यंत पाटील

#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#माझीशाळामाझीभाषा
#कारागिरी


संदर्भ:

इंटरनेटवरील वेगवेगळ्या वेबसाईट्स

चार ऋतु







चार तत्वे







No comments:

Post a Comment