Saturday, July 28, 2018

व्होल्गा नदीवरचे बर्गहॉलर्स

ओळख कलाकृतींची

व्होल्गा नदीवरचे बर्गहॉलर्स

रशियामध्ये जुन्या काळात नदीतून खूप प्रमाणात मालवाहतूक व्हायची.. ही मालवाहतूक करणारी जहाजं माणसांना बऱ्याचदा नदीतून प्रवाहाविरुद्ध ओढावी लागत.. व्होल्गा नदीकाठी हा प्रकार चालायचा.. खरंतर हे काम अमानुष होतं, यात लोकांना भयानक कष्ट करायला लागायचं, पण गरीब लोक पोटापाण्यासाठी हे काम करायला तयार व्हायचे.. इतकं कष्ट करूनही या लोकांना मोबदला चांगला मिळायचा नाही..

१८७० मध्ये रेपिन हा चित्रकार सुट्टीमध्ये व्होल्गाकाठी फिरत असताना त्यानं हा प्रकार प्रत्यक्ष पाहिला. (हा तोच चित्रकार ज्याचं इव्हान दि टेरिबल, त्याच्या मुलाचं चित्र मागं एकदा पाहिलं होतं.) रेपिननं हे सारं वास्तव आपल्या कलेतून व्यक्त करायचं ठरवलं. अापल्या कलाकृतीतून नेमक्या भावना व्यक्त करण्यासाठी त्यानं कित्येक रेखाटनं, कच्ची चित्रं करुन बघितली.. त्यानं खऱ्याखुऱ्या काम करणाऱ्या लोकांना माॅडेल म्हणून वापरण्याचा प्रयत्न केला, पण त्याला लोकांकडुन (पैसे द्यायची तयारी असुनही) चांगला प्रतिसाद मिळाला नाही - कारण चित्रांसाठी असं माॅडेल म्हणून उभं राहणं आणि आपली प्रतिकृती कॅनव्हासवर बनणं हे आपल्यासाठी अशुभ आहे अशी त्यांची अंधश्रध्दा होती. ह्या चित्रावर काम चालु असताना त्याची ज्या लोकांशी ओळख झाली त्या लोकांवर चित्रामधली पात्रं बेतलेली आहेत.. त्यानं चित्रामध्ये जहाज खेचणारे ११ लोक दाखवले आहेत.. पूर्वी सैन्यात काम केलेला एक माणुस, पूर्वी धर्मगुरूचं काम केलेला माणूस, एक चित्रकार अशा समाजातल्या वेगवेगळ्या थरामधल्या लोकांना त्यानं चित्रामधल्या जहाज खेचणाऱ्या पात्रांमध्ये दाखवलं..

हे चित्र म्हणजे अमानुषपणे शोषण करून नफा मिळवण्याच्या प्रवृत्तीविरुध्द रेपिननं व्यक्त केलेला निषेध आहे.. चित्रातले लोक स्वेच्छेने जहाज खेचताना दिसत नाहीत.. लोक थकलेल्या अवस्थेत पडतील की काय असं चित्र पाहताना वाटतं.. चित्रात दूरवर एक वाफेवर चालणारी बोटही दाखवण्यात आली आहे.. कदाचित रेपिनला सुचवायचं आहे की त्या औद्योगिक युगाच्या काळात माणसांकडुन असं कष्ट करून घ्यायची काही गरज नव्हती.. रेपिननं जहाजावरचा रशियन ध्वजही अस्वस्थता वाढवत उलटा दाखवला आहे..

ह्या चित्राचं आंतरराष्ट्रीय पातळीवर चांगलंच कौतुक झालं.. ह्या चित्रानंच रेपिनच्या कारकिर्दीला सुरूवात झाली. हे चित्र नंतरच्या काळात साऱ्या युरोपभर प्रदर्शितही करण्यात आलं - त्यातून रशियन वास्तववादी चित्रकलेची सर्वांना ओळख व्हावी हा उद्देश होता..

- दुष्यंत पाटील

#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#माझीशाळामाझीभाषा
#कारागिरी


संदर्भ:
इंटरनेटवरील वेगवेगळ्या वेबसाईट्स

 

No comments:

Post a Comment