Friday, July 27, 2018

प्राचीन इजिप्तमधली कला - २

कुतूहल कलाविश्वातलं

प्राचीन इजिप्तमधली कला - २

खूप पूर्वीच्या काळी इजिप्तमध्ये एक भयानक प्रथा होती.. कुणीतरी राजा वगैरे वारला की त्याला पिरॅमिडमध्ये ममी बनवून ठेवताना त्याच्या सोबत बऱ्याच जिवंत माणसांनाही (नोकर/गुलाम वगैरे) ठेवण्यात यायचं.. हेतू हा की मृत राजा नव्या दुनियेत जाईल तेंव्हा त्याच्या सोबत सारे नोकर चाकरही असतील.. त्याला नव्या दुनियेत काही अडचण यायला नको..

पण नंतरच्या काळात ही प्रथा बंद पडली.. एकतर ही प्रथा खूप क्रूर असल्याचं लोकांच्या ध्यानी आलं असावं किंवा जिवंत नोकरांना/गुलामांना पुरणं हे खूप महाग पडत असावं.. यावेळी खरंतर कलेनं लोकांचे जीव वाचवायला मदत केली.. आता खरोखरचे नोकर चाकर पिरॅमिडमध्ये ठेवण्यापेक्षा त्यांच्या प्रतिकृती (चित्रं  किंवा शिल्पं) ठेवायला सुरुवात झाली.. लोकांचा असा विश्वास होता ह्या प्रतिकृती मृत व्यक्तीला दुसऱ्या जगात गेल्यावर चाकरी करून मदत करतील !! एका विशिष्ट हेतूनं ही चित्रं काढली गेली होती.. लोकांचं मनोरंजन करणं हा या चित्रांचा हेतू कधीच नव्हता.. या चित्रांचा हेतू होता मृत व्यक्तीच्या आत्म्याला मदत करणं.. त्यामुळं चित्र सुंदर दिसण्यापेक्षा ते पूर्ण कसं असेल आणि ते कायमसाठी कसे टिकेल हे महत्वाचे मुद्दे होते.. हे मुद्दे लक्षात घेतले की आपल्याला पिरॅमिडमधली कला समजायला सोपं जाईल..

आता तुम्ही सोबत दिलेले 'The garden of Nebamun' हे चित्र पहा.. हे एक उद्यानाचं चित्र आहे.. यात भूमितीचे काहीच नियम पाळलेले दिसत नाहीत !! कारण उद्यानातल्या साऱ्या वस्तू/जीव चित्रात पूर्णपणे असणं त्यांच्या दृष्टीनं महत्वाचं होतं.. चित्रातली प्रत्येक वस्तू स्पष्ट असणं त्यांच्या दृष्टीनं महत्वाची होती... झाडं आपल्याला सर्वात जास्त बाजून स्पष्ट दिसतात.. (वर आकाशातून बघितलं तर आपल्याला झाडं स्पष्ट दिसत नाहीत).. तळं मात्र आपल्याला वरून बघितलं तर स्पष्ट दिसतं.. आणि मासे आणि इतर पक्षी बाजूनं  बघितलं तर स्पष्ट दिसतात.. चित्र नीट पहा - ह्या कलाकारानं चित्रामध्ये झाडं बाजूनं, तळं वरून तर मासे आणि पक्षी पुन्हा बाजूनं दाखवले आहेत !! आज आपल्याला हे कदाचित खूप विचित्र वाटू शकेल पण त्या काळाच्या लोकांना असा चित्रण चालत होतं..

ही सारी चित्रं स्मरणशक्तीच्या जोरावर काढलेली असायची.. माणसांच्या चेहऱ्यांवर हावभाव नसायचे.. पशूंच्या चित्रांमध्ये एक प्रकारची गती दिसून यायची.. चित्रांमध्ये रंगाच्या छटा किंवा प्रकाश ह्या गोष्टींना विचारात जायचं नाही.. पार्श्वभूमीला फिकट असा रंग वापरला जायचा..

आपण पुढच्या भागात या लोकांची अजून थोडी कला पाहू..

- दुष्यंत पाटील

#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#माझीशाळामाझीभाषा
#कारागिरी


संदर्भ:

1) History of Painting - JOHN C. VAN DYKE, L.H.D  (प्रकाशनवर्ष: 1894)
2) The Story of Art – E. H. Gombrich (प्रकाशनवर्ष: 1950)



 

No comments:

Post a Comment